बहुगुणी शेवगा

शेवग्याच्या गोड शेंगांची चव आपल्या सर्वांना माहितच आहे. Moringa oleifera असं शास्त्रीय नाव असलेला हा शेवगा मॉरिंगेशिए कुळामधील मॉरिंगा ह्या प्रजातीमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर आढळणारी वनस्पती म्हणून ओळखला जातो. त्याच प्रजातीमधील बहावा हा ह्या शेवग्याचा भाऊ. ढोलावर नाद काढणाऱ्या टिपरीसारख्या लांबलचक आकारामुळेच सर्वसाधारण इंग्रजीमध्ये शेवग्याच्या शेंगांना म्हणतात Drumstick (ड्रमस्टिक) आणि झाडाला म्हणतात, Drumstick Tree (ड्रमस्टिक ट्री). किती सोपं ना!

अंगाने तसा कमजोरच असलेला व स्वभावाने उष्ण असलेला हा शेवगा आहे मात्र बहुगुणी वनस्पती. ह्याची पानं, फुलं, शेंगा, साल अगदी मुळांचाही उपयोग होतो. ह्याचं संस्कृत नाव शोभांजन असं आहे.

ह्याची वाढ जास्तीत जास्त ३० ते ३२ फूट म्हणजे १० मीटर इतकी होऊ शकते.शेवग्याला घोस लटकल्याप्रमाणे पांढरी शुभ्र फुले लागतात आणि नंतर लांबलचक शेंगा येतात. शेवग्याच्या दोन जाती आहेत - काळा आणि पांढरा. ह्यापैकी काळा शेवगा जास्त उग्र असतो.

लागवड:
शेवगा उष्ण किंवा सौम्य तापमानात चांगला रूजतो. शक्यतो पावसाळ्याच्या जून, जुलै महिन्यात शेवगयाची कलमं लावावीत. कलम लावल्यावर आजूबाजूची माती पायाने चांगली दाब देऊन बसवावी. जमीन कशीही असू द्या, शेवगा आढेवेढे न घेता उगवतो. भरपूर पाऊस असलेल्या ठिकाणी डोंगरउताराची जमीन असेल तर तीदेखील शेवग्याला मानवते पण फक्त कलम लावलं तरच शेवग्याचं झाड रूजतं असं मात्र नाही. मातीत पेरलेल्या बी पासून रोप तयार अक्रून किंवा हिरवीगार फांदी रोवून लावली तरी शेवगा रूजतोच. बी पेरून शेवगा रूजवायचा असेल तर शक्यतो दिवाळीच्या सुमारास बी पेरावे. बी मधून रोप उगवायला १०-१२ दिवसांचा काळ जातो व रोपाची वाढदेखील एक ते दीड महिन्यापर्यंत संथ गतीने होते.

डिसेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळ्याचा काळ असल्याने ह्या काळात बिया रुजवून शेवग्याची रोपे तयार करणे उपयुक्त नाही.

बहर:
एकदा शेवगा रूजला कि अंदाजे ६ ते ७ महिन्यांत त्याला फुलोरा धरतो. पांढऱ्या शुभ्र मोगऱ्यासारख्या दिसणाऱ्या फुलांनी झाड बहरून जातं. अतिथंड वातावरण किंवा खूप पाणी दिल्यास फूलं टिकाव धरू शकत नाहीत.तसंच अतिउष्ण हवामान देखील फुलांना मानवत नाही. फुलांचा दांडा अतिशय नाजूक असतो, अगदी टाचणीसारखा. त्यामुळे त्याच्या आतलं पाणी सुकलं कि फूल वाऱ्याच्या झोताने उडून जातं. ह्या गोष्टींमुळे शेवग्याला लागणाऱ्या शेंगांचं प्रमाण कमी होतं. फुलांसाठी आदर्श तापमान आहे २५ ते ३० डिग्री सेल्सिअस. तापमान आदर्श असेल तर भरपूर शेंगा लागतात.


पाणी देताना:
शेवगा जमिनीत रूजवला असो कि कुंडीत, त्याला पाणी देताना एकादम भसाभसा पाणी ओतू नये. शक्यतो रोपाभोवती आळे करून भोवताली हळू-हळू पाणी ओतावे म्हणजे मुळे पाण्याच्या दिशेचा शोध घेत पुढे सरकतात. ह्यामुळे झाड काटक रहायला मदत होते.

शेंगा:
फुलोऱ्याचा मोसम कमी झाला कि शेवग्याला लहान, लहान शेंगा लटकलेल्या दिसतात, ह्या पोपटी रंगाच्या असतात. फूलगळीनंतर साधारणपणे एक-दीड महिन्यात शेंगांची पूर्ण वाढ होते व त्या तोडणीलायक होतात. पूर्ण वाढ झालेल्या शेंगांचा रंग काळपट हिरवा असतो व त्यांचा स्पर्श खरखरीत असतो. शेंगांची लांबी एक ते सव्वा फूट इतकी असू शकते. शेंगा काढण्यासाठी शक्यतो लांब काठीला चाप बसवून काढाव्या. शेवग्याचे झाड मूळचेच कमजोर असल्याने मनुष्याचे वजन सहन करू शकत नाही.

काढणी:
शेंगा शक्यतो सकाळी ८ च्या आधी किंवा संध्याकाळी उन्हं उतरल्यावर पण सूर्यास्ताच्या आधी काढाव्यात. तयार झालेल्या जितक्या शेंगा काढल्या जातात तेवढ्याच झाडावरच्या शेंगा पोसल्या जातात. तयार झालेल्या शेंगांमध्ये गर व बी दोन्ही असतात त्यामुळे शेंगा शक्यतो खाली पडू देऊ नये. सावलीत जमा करून ठेवाव्यात.

शेवग्याचे उपयोग:
समजा, दुर्दैवाने झाडाला शेंगा जास्त लागल्याच नाहीत तरी निराश होऊ नका. आधीच म्हटल्याप्रमाणे शेवगा ही बहुगुणी वनस्पती आहे. ह्याची कोवळी पानं कोशिंबीरीत वापरता येतात. तसंच शेवग्याच्या पाल्याची उत्तम भाजी करता येते. तूरडाळ, मूगडाळ किंवा चणाडाळ टाकून बनवलेली शेवग्याची भाजीदेखील चवीष्ट असते.

फक्त पानांचीच का, शेवग्याच्या फुलांचीदेखील भाजी करता येते. भाजी करण्याच्या दोन निरनिराळ्या कृती इथे आणि इथे दिलेल्या आहेत.

शेवग्याच्या शेंगांबद्दल मी अधिक लिहित नाही. असा एखादाच मनुष्य असेल ज्याने शेवग्याच्या शेंगेतला गोड, चविष्ट गर कधी चाखलाच नाही. शेंगाची भाजी पोटातील जंत नष्ट करण्यासाठी व पुन्हा होऊ न देण्यासाठी उत्तम.

शेवगा उत्तम दीपक पाचक असल्याने अग्निमांद्य असलेल्या व्यक्तीने जरूर खावा. ह्यामुळे जठराग्नी प्रदीप्त होऊन आहार द्रव्याचे पचन होण्यास मदत होते. शेवग्याच्या पानांमध्ये अ, ब व क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते.

शेवग्याची फूलं आणि पानांचे इतरही उपयोग आहेत. उदाहरणार्थ:
* कान वहात असल्यास सावलीत वाळवलेल्या शेवग्याच्या फुलांचे वस्त्रगाळ चूर्ण कानात घालावे.
* शेवग्याच्या पानांचा काढा उचकी व दम्यावर औषधी आहे.
* जीभ लुळी पडल्यास शेवगा खावा.
* लैंगिक दुर्बलता असल्यास शेवग्याच्या शेंगांचे सेवन गुणकारी असल्याचे बोलले जाते.
* केसगळतीवरही शेवग्याच्या शेंगा गुणकारी आहेत.

शेवग्याच्या इतर अंगांचे उपयोग:
* ताप, खोकला, जुलाब व संधिवात ह्यावर काळ्या शेवग्याच्या मुळाच्या सालीची पावडर गुणकारी आहे.
* शेवग्याची साल उगाळून गळूवर लावल्यास गळू जिरून जातं.
* शेवग्याच्या वाळवलेल्या बियांचं चूर्ण करून पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरता येतं.
* ’बेन ऑईल’ म्हणजेच शेवग्याच्या बियांपासून निघणाऱ्या तेलाचा वापर घड्याळात वंगण म्हणून व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये केला जातो.

महत्त्वाचे:
*शेवगा प्रकृतीने उष्ण असल्याने आहारात वारंवार वापर करू नये अन्यथा, नाकातून किंवा मुत्रामागे रक्तस्त्राव होऊ शकतो.
*वर सांगितलेले सर्व औषधी उपयोग डॉक्टर किंवा जाणकारांच्या सल्ल्याशिवाय प्रयोगात आणू नयेत.

© Kanchan KaraiNo comments:

Post a Comment