हा छंद जीवाला लावी पिसे

बागकामाची आवड मला लहानपणीच निर्माण झाली. कळायला लागल्यापासून घरात एकही रोपटं नाही असं आठवतच नाही. बागकामाची आवड मला माझ्या आई-वडिलांमुळेच निर्माण झाली. तुळस तर आपल्या दारी असतेच पण मला सर्वात जास्त आठवते ती, बटण शेवंती!

मी अगदीच लहान म्हणजे अडीच-तीन वर्षांची असताना माझ्या बाबांनी बटण शेवती लावली होती. आंब्याच्या लाकडी पेटीत, हिरव्या मखमलीवर पिवळे ठिपके दिल्यासारखी वाटणारी बटण शेवंती, तो पिवळाधमक रंग आणि सुंगध मला अजूनही स्मरणात आहे.

त्यानंतर माझ्या आई-बाबांनी निरनिराळ्या रंगांमधली जास्वंद, जाई-जुई, गणेशवेल, गुलबक्षी, गुलाब, चिनी गुलाब, बटमोगरा असं बरंच काही लावलं होतं. बाबांना गुलाबांची कलमं करण्यात फार रस होता आणि त्यांचा त्यात हातखंडाही होता. मी खूपच लहान होते तेव्हा. कळायचं काही नाही पण बघताना छान वाटायचं कि देठाला कापून त्यात दुसरा देठ जोडला कि त्याच गुलाबाची नवीन छटा पहायला मिळते. ठाण्यातल्या महेश रोझ नर्सरीमध्ये निदान महिन्यातून एकदा तरी बाबांची फेरी ठरलेलीच आणि जोडीला मी उड्या मारत. ती एकच नर्सरी तेव्हा मला माहित होती.

आईनेसुद्धा कोथिंबीर, कढीपत्ता लावला होता. आमच्या शेजारी-पाजारी म्हणायचे कि माझ्या आईच्या हाताला गुण आहे. तिने झाड लावलं तर रूजणारच. आईसुद्धा हौसेने जास्वंदीच्या निरनिराळ्या जाती कुणा-कुणाकडून मागून घेत असे. मीसुद्धा आईच्या जोडीने फिरायचे. NRB, Blue Star कंपनीपासून ते ग्लॅक्सो कंपनीपर्यंत चालत गेलं कि निरनिराळ्या जास्वंदीची फुलं पहायला मिळायची. कधी वॉचमनला विचारून एखादी निराळी जात मिळाली तर आम्ही घेऊन यायचो. अलिबागला सहलीला गेलो असताना तिथून परतताना निराळ्याच जातीची मोठी जास्वंद पाहिली होती. तीसुद्धा आईने रूजवली होती पण आईचं मुख्य काम होतं ते अधिक वाढलेल्या फांद्या छाटणीचं आणि मला काम असायचं झाडांना पाणी घालण्याचं.

चाळीत असताना कुणाकडे नसतील इतकी फुलझाडं आमच्याकडे होती. नंतर आम्हाला ते सगळंच " माळ्यावर कुंड्यांचं वजन होत आहे" ह्या सोसायटीच्या नोटीसखाली काढून टाकावं लागलं. मग अगदीच काही नाही तर माझ्या आईने एक तुळस आणि कोरफड ठेवून दिली होतीच.

शहरात राहिलेल्या माणसांना आपल्या गावाची ओढ असते आणि ती माती आपल्याला कधी ना कधी तिकडे बोलावून घेतेच. माझ्या बाबांचं तसंच झालं. गावी गेलेले असताना त्यांनी पाहिलं कि पाणी भरताना अधिकचं पाणी नुसतंच वाहून जातंय. मग त्यांनी काही अंतरावर जमीनीत वाफे तयार केले. त्यात निरनिराळ्या भाज्या लावल्या. पाणी भरताना वाफ्यांना आपसूकच पाणी मिळत गेलं. सहज पेरलेल्या बियांमुळे उत्पन्न इतकं आलं कि घरात पुरून, शेजारी-पाजारीही देऊनही उरू लागलं. बाबा गावाहून परतताना इकडेही थोड्या भाज्या घेऊन आले होते. तरीही भाज्या संपेचनात. शेवटी माझ्या आतेभावाला आणि वहिनीला आठवड्याच्या बाजारात जाऊन ते विकावं लागलं. घरच्या भाजीची चवच न्यारी!

माझ्या गावच्या घरी गावठी गुलाबाचा पसरलेला डोलारा विसरता येणार नाही. एकाच ठिकाणी इतकी गुलाबाची फुलं मी कधीच पाहिलेली नाहीत. माझ्या बाबांच्या खिशात कधी पैसे पुरेसे नसायचे पण बी-बियाणं पुरचुंडीत बांधून तयार! पक्षाघातानंतर बाबांच्या हालचाली मंदावल्या तसा त्यांचा बागकामामधला रसही कमी झाला पण आजही त्यांचं जुनं सामान वरखाली केलं तर कसल्या ना कसल्या बिया सापडतीलच. आता बाबा नाहीत पण त्यांच्यामुळे लागलेली बागकामाची आवड स्वस्थ बसू देत नाही.

update:

लग्नानंतर मी माझ्या घरी टोमॅटो, मिरची, मेथी असं बरंच काही लावलं होतं. पैकी मिरच्या सोडल्या तर बाकी सगळ्याची कबूतरांनी नासधूस केली. खूप उपाय केले पण जी कबुतरं कशालाही न जुमानता घरात शिरायची, ती बाल्कनीपासून काय लांब राहाणार? शेवटी घरातच लसूण पात वगैरे असं उगवलं पण त्याने बागकामाची उर्मी आणखीच दाटून यायची. आत्ताच्या आत्ता किमान धणे तरी पेरावेच असा विचार मनात यायचा पण कबुतरांचा त्रास आठवला कि मन निराश व्हायचं.

कबुतरांचा त्रास टाळण्यासाठी झाडांची वाढ खुजी ठेवली तर तेवढ्या कुंडीपुरती तरी जाळी बसवता येईल असा विचार करून बोन्सायचा काही उपयोग होतो का, ह्या दृष्टीने माहिती गोळा केली पण माहिती निराशाजनक होती. आपल्याला भाज्यांचं उत्पन्न घ्यायचं असेल तर बोन्सायचा उपयोग शून्य आहे.

कधीतरी मोसंबी खाल्ल्यावर गंमत म्हणून मी बी पेरली होती तर त्यातून रोप उगवलं. थोडा उत्साह आला. मग बी मधून उगवलेल्या झाडाला फळ लागणार नाही, अशीही माहिती मिळाली. आता हे मोसंबीचं रोप थोडं मोठं झालं तर त्यावर लिंबाचं कलम करून पहाणार आहे.

कितीही केलं तरी लहानपणापासून फुलांचे निरनिराळे रंग आणि सुगंध अनुभवलेली माझ्यासारखी स्त्री एका रोपट्यावर समाधानी राहाणं कठीण आहे. शेवटी कालपरवाच थोडी राई आणि टोमॅटोच्या बिया पेरल्याच! आता हिरव्या कचऱ्याचंही नियोजन सुरू केलं आहे. पाहू मुंबईचं हवामान आणि कबुतरं किती साथ देतात ते!

© Kanchan Karai

2 comments: