नाद "बागे"श्री - Eco Living

कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी ..... ही विठाई अवतरली आहे मयूर भावे यांच्या गच्चीत!

सुरण, रताळी, कारली, मोहरी, मका, अळू, पापडी, पपई, वाल, ओवा, अंजीर, डाळिंब, दुधी, टोमॅटो, यादी न संपणारी आहे. या सगळ्या झाडांचे संमेलन भावे यांच्या गच्चीत भरले आहे.

बैठकीच्या खोलीला लागून असलेलं मोठे अंगण आणि दोन मोठ्या टेरेस यांचा पुरेपूर वापर मयूर भावे यांनी आपला छंद जोपासण्यासाठी केला आहे. चार वर्षांपूर्वी जेंव्हा त्यांनी गच्चीत बाग करायचे ठरवलं तेंव्हा बाहेरून माती न आणता बाग वाढवण्याचे निश्चित केलं. त्यासाठी घराच्या ओल्या कचऱ्या पासून compost करायचे ठरवले. घरातला ओला कचरा (कापलेल्या भाज्या, चहाचा चोथा, निर्माल्य, फळांची साले) पुरेसा नाही हे लक्षात आल्यावर भाजीवाल्या कडून ओला कचरा घ्यायला सुरवात केली. हळू हळू composting ची क्षमता वाढली, आणि आता रोज भाजीवाल्या कडून आणलेला ५ ते ८ किलो ओला कचरा यात जिरवला जातो.

यासाठी गच्चीत विटांचा कप्पा करून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी जागा केली. आता मोठ्या प्रमाणावर खत तयार होऊन सगळ्याच बागेची गरज भागते.

ओल्या कचऱ्याचा उपयोग ते खालच्या टेरेसमध्ये बसवलेल्या बायो गॅस प्लांटसाठी सुद्धा करतात. त्यात भर म्हणून कॅन्टीन व हॉटेलमध्ये वाया जाणारे अन्न वापरतात. ६ जणांच्या कुटुंबाचा निम्म्याहून जास्त स्वयंपाक या गॅस वर होतो. या प्लांट मधून जी स्लरी बाहेर पडते ती झाडांना खत म्हणून दिली जाते. या सगळ्या साठी त्यांचे पूर्ण कुटुंब तर मदत करतच पण त्यांच्या घरी काम करणाऱ्या मावशी ही भाजी धुतलेले पाणी आणि ओला कचरा आवर्जून बागेत खतासाठी टाकतात.


मयूर भावे यांची निसर्गात रमण्याची आवड आणि त्याची जपणूक करण्याची धडपड छोट्या छोट्या गोष्टीतून दिसते. समारंभा मध्ये थर्माकॉल / प्लास्टिकचा वापर टाळणे, हॉटेल मध्ये गेल्यावर आवश्यकतेनुसारच पाणी वापरणे, घरात सोलर energy चा वापर, सर्व प्रकारचा plastic चा कचरा recycling साठी संस्थेला देणे, शाडूचा गणपती आणि घरात बादलीतच विसर्जन, सोसायटी मधल्या स्नेहभोजनाला सगळ्यांना ताट वाटी पाणी आणि भांडी आणायला सांगणे, कमी अंतरासाठी सायकलचा वापर, घरातील पाण्याचा पुनर्वापर या सारख्या कृती मधून निसर्गाची हानी टाळता येते हे त्यांनी दाखवून दिलंय.


मयूर भावे यांचे पर्यावरण पूरक काम फक्त घरापुरतच मर्यादित नाही. घरोघरी छोट्या बागांसाठी लागणाऱ्या खताची गरज भागवण्यासाठी त्यांनी 'कचरा खाणारी टोपली''पालापाचोळा खाणारा पिंजरा' तयार केला आहे. त्या बद्दल अधिक माहिती आपण पुढल्या लेखात घेऊ ...

स्रोत

No comments:

Post a Comment