अ‍ॅक्वापोनिक्स : एक अफलातून लघुउद्योग

मत्स्य-जल-भाजीपाला चक्रीउद्योग म्हणजे आधुनिक विज्ञानाच्या आधारे सुरू करता येणारा, सध्याच्या महागाईच्या भडक्याला आटोक्यात ठेवण्यास उपयुक्त ठरावा असा एक पर्यावरणपूरक लघुउद्योग आहे. ‘अ‍ॅक्वापोनिक्स’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जोडधंद्याच्या विकासाला शासनाने पद्धतशीरपणे चालना देणे आवश्यक ठरते. संतुलित आहारपोषणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशा या उद्योगाला इंग्रजी भाषेमध्ये अ‍ॅक्वापोनिक्स, असे संबोधले जाते. अ‍ॅक्वापोनिक्स हा शब्द अ‍ॅक्वाकल्चर आणि हायड्रोपोनिक्स या दोन अर्थपूर्ण शब्दांच्या संयोगाने बनलेला शब्द आहे.

या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी प्रथम अ‍ॅक्वाकल्चर आणि हायड्रोपोनिक्स या दोहोंचा अर्थ माहीत करून घेणे आवश्यक आहे. अ‍ॅक्वाकल्चर म्हणजे विशेषत: गोडय़ा पाण्यातील मत्स्यशेती ज्यामध्ये मेजर कार्प, रोहू किंवा म्रिगल या प्रकाराच्या गोडय़ा पाण्यात वाढणाऱ्या माशांची किफायतशीरपणे पैदास केली जाते. आता हायड्रोपोनिक्स म्हणजे काय ते पाहू. मातीशिवाय केवळ पाण्यातून दिलेल्या पोषणद्रव्यातून भाजीपाला, भेंडी, वांगी टोमॅटो यांसारखी वनस्पती उत्पादने भरभरून काढणे.

आता अ‍ॅक्वापोनिक्सच्या लघुउद्योगाला आधुनिक विज्ञानाच्या आधारे सुरू करता येणारा एक अफलातून उद्योग, असे का म्हणू शकतो, ते पाहू. पाण्यात वास्तव्य करणाऱ्या अन्य जीवांप्रमाणे माशांच्या अमोनोटेलिझम प्रकारच्या, उत्सर्जन संस्थेच्या अभ्यासातून असे माहीत झाले की, मासे आपल्या प्रथिनी-चयापचय क्रियेतून उत्पन्न होणारा टाकाऊ आणि सर्वात जास्त उपद्रवी भाग म्हणजे अमोनिया जसाचा तसा सभोवतालच्या पाण्यात सोडतात. सॉइल मायक्रोबायॉलॉजीच्या आधुनिक विज्ञानातून असे समजून आले की, मातीतील नायट्रोसोमोनॉस जातीचे अणुजीव अमोनियावर आपली गुजराण करतात आणि अखेरीस त्या अमोनियाचे नायट्राइटमध्ये रूपांतर करतात. त्यानंतर असेही निदर्शनास आले की, मातीतीलच नायट्रोबॅक्टर नावाचे दुसऱ्या एका जातीचे अणुजीव नायट्राइट्सवर गुजराण करीत, नायट्राइट्सचे नायट्रेट्समध्ये रूपांतर करतात. अनेक प्रकारच्या वनस्पती नायट्रेट्सचा वापर करून जोमाने वाढतात, हे याआधी माहिती होतेच. त्यामध्ये भेंडी, वांगी, टोमॅटोबरोबर अनेक प्रकारच्या पालेभाज्यांचाही समावेश होतो. असे हे ‘जीवो जीवस्य जीवनम्’चे अजब चक्र वेगळय़ाच पद्धतीने सिद्ध करणारे आधुनिक आणि अफलातून विज्ञान. या आधुनिक विज्ञानातील माहितीवरून अ‍ॅक्वापोनिक्स हा लघुउद्योग निर्माण झाला. या अत्यंत उपयुक्त उद्योगासंबंधी जेवढी जागरूकता आपल्याकडे असायला हवी होती तेवढी ती दिसत नाही.


पश्चिम बंगालमध्ये गोडय़ा पाण्यातील मत्स्यशेतीचा मोठय़ा प्रमाणात प्रसार झालेला दिसतो. तरी अन्यत्र म्हणजे महाराष्ट्रातही छोटय़ा प्रमाणावर करता येऊ शकणारा, हाती थोडय़ा वेळात पैसा मिळवून देणारा हा उद्योग एक उपयुक्त लघुउद्योग म्हणून अद्याप मान्यता पावलेला दिसत नाही. आता यामागील कारणांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू. पश्चिम बंगालमध्ये गंगा नदीच्या मुखाजवळ फुटणाऱ्या असंख्य फाटय़ांमुळे स्वाभाविकरीत्या असंख्य गोडय़ा पाण्याचे लहान-मोठे जलाशय निर्माण झालेले आढळतात. त्यामुळे फार पूर्वीपासून तेथल्या लोकांना, गोडय़ा पाण्यातील मत्स्यशेती माहीत झाली आहे, अवगत झाली आहे. इतरत्र तसे नसल्याने, गोडय़ा पाण्यातील लहानमोठय़ा मत्स्यशेती-उद्योगांस हेतुपुरस्सर चालना देण्याची जरूर असते. या लेखात नमूद केलेल्या अ‍ॅक्वापोनिक्स उद्योगाला राज्य सरकारच्या लघुउद्योग विभागाने चालना द्यायला हवी. म्हणजे निधीची सहजपणे उपलब्धता निर्माण होईल आणि अल्प भूधारकांना अल्पशा पाणीपुरवठय़ावर एक पूरक लघुउद्योग अंगीकारता येईल. त्यासाठी शेतीला लागते तशी किंवा तेवढी पाण्याची उपलब्धता आवश्यक नसल्याने दुष्काळी भागातही या जोडव्यवसायास चालना देता येईल.

या लघुउद्योगामध्ये शाकाहारी उद्योजक मुख्यत्वे, भाजीपाला उत्पादनावर लक्ष केंद्रित करू शकतील तर इतर मत्स्यसंवर्धनावर भर देऊ शकतील. भाजीपाल्यावर लक्ष केंद्रित केल्यावर या चक्री उद्योगात भाजीपाल्याच्या उत्पादनाबरोबर दुसऱ्या म्हणजे मत्स्यसंवर्धनाच्या बाबतीत मत्स्योत्पादनाऐवजी केवळ मत्स्य-बीज संगोपनाकडे लक्ष देऊन पुरेल. यासंबंधात थोडे सविस्तर सांगायचे म्हणजे, मत्स्यसंवर्धनामध्ये मत्स्योत्पादनाकडे लक्ष म्हणजे निदान पाचशे-सहाशे ग्रॅम वजनाच्या खाण्यासाठीच्या माशांचे उत्पादन करणे. मत्स्य-बीज संगोपनाबाबत असे सांगता येईल की त्यामध्ये मत्स्य-बीज ज्याला मत्स्यजिरे असेही संबोधले जाते, त्यांची अध्र्या बोटांएवढी वाढ करणे आणि ते अर्धबोटुकल्याएवढे मासे दुसरीकडे म्हणजे ‘अ‍ॅक्वापोनिक्स’मध्ये मत्स्योत्पादनावर लक्ष केंद्रित करणाऱ्यांकडे पाठवावयाचे. ‘अ‍ॅक्वापोनिक्स’च्या व्यवसायात तिसराही एक लघुउद्योग दडला आहे. तो म्हणजे शेतीसाठी लागणाऱ्या गांडूळ-खताचे उत्पादन. भाजीपाल्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अ‍ॅक्वापोनिक्स-उद्योजकाला भाजीपाला विक्री करताना उपलब्ध होऊ शकणाऱ्या टाकाऊ भागांचा वापर करून व थोडेफार शेण-गोमूत्र आणि मातीचा उपयोग करून, लहान-मोठय़ा प्रमाणात गांडूळ-खत निर्माण करता येईल.

अ‍ॅक्वापोनिक्स हा एक चक्रीउद्योग आहे आणि तो तशाच पद्धतीने केल्यास कमी खर्चात करता येतो. मासे आपल्या कल्ले आणि मुखाद्वारे सभोवतालच्या पाण्यातून अन्न व प्राणवायू मिळवून जगतात. त्याचप्रमाणे त्वचा व कल्ल्यापासून पाण्यातच त्यांना विषारवत असणारा अमोनिया सोडतात. तसेच त्यांच्या चयापचय क्रियेतून निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ, न वापरता आलेला अन्नांश म्हणजे विष्ठाही पाण्यातच उत्सर्जित करतात. जसजसे हे त्या उत्सर्जित अमोनियाचे प्रमाण वाढू लागते तसतसे माशांना ते घातक ठरू लागते. ते अमोनिया- संपृक्त पाणी थोडे थोडे काढून त्यात स्वच्छ आणि गार नवीन पाणी टाकणे आवश्यक असते. दिवसभरातून माशांच्या टाक्यातील एकूण पाण्याच्या १० टक्के पाणी जरी बदलले गेले तरी पुरते. कारण अमोनिया-संपृक्त पाण्यात फारच थोडय़ा प्रमाणात जीवनास आवश्यक प्राणवायू उपलब्ध होऊ शकतो. यानंतरची वैज्ञानिक बाब म्हणजे शेवाळ व नायट्रोसोमोनास् व नायट्रोबॅक्टर अशा दोन्ही प्रकारच्या सूक्ष्म अणुजीवांची जोमाने वाढ होऊ लागते. हे अणुजीव कीमोऑटोट्रॉप्स प्रकारचे असतात. अ‍ॅक्वापोनिक्सच्या उद्योगात ते दूषित म्हणजे अमोनिया-संपृक्त पाणी दगडगोटे भरलेल्या एखाद्या ट्रेमध्ये थेंबथेंब संततधाराने सोडता आल्यास शेवाळे व दगडांच्या आधारे हिरव्या शेवाळ्यासारख्या वाढतात. दगडावर हिरवा रंग येऊन तेथे नायट्रोसोमोनास आणि नायट्रोबॅक्टर प्रजातींच्या सूक्ष्म अणुजीवांची भराभर वाढ होऊ लागते. अशा नायट्रीफाइंग अणुजीवांचे भरभरून वास्तव्य असलेल्या अशा निदान दोन ट्रेमधून म्हणजे दोन बायॉलॉजिकल् फिल्टर्समधून अमोनिया संपृक्त पाणी जाऊ दिले असता, त्यातील सर्वच्या सर्व विरघळलेल्या अमोनियाचे आधी नायट्रोइटस व त्यानंतर अखेरीस नायट्रेट्समध्ये रूपांतर होते.

आता नायट्रेट्सने संपृक्त असलेले हे पाणी, त्यातील माशांच्या विष्ठेतून आलेल्या अन्य विविध पोषणार्कामुळे टोमॅटो, वांगी, भेंडी, फुलकोबी, पत्ताकोबी, पालक, गवारसारख्या अनेक प्रकारच्या भाजीपाला-वनस्पतींची झपाटय़ाने होणाऱ्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरते. म्हणून हे भाजीपाला खाद्यान्न-पूरक पाणी लहान मोठय़ा टबमध्ये जमा करून त्यावर तरंगते लहान-मोठी भोके केलेले थर्मोकोल शिट वापरून भाजीपाल्यांची बियाणे पसरून ठेवल्यास त्याचे अंकुर तयार करता येऊ शकतील. म्हणजे हायड्रोपोनिक्स पद्धतीने भाजीपाल्यांचे उत्पादन घेता येईल. तेही नायट्रेट्सवर अजिबात खर्च न करता.

आता हीच बाब दुसऱ्या शब्दात सांगायची म्हणजे मत्स्यसंवर्धनातून निर्माण होणारे एका दृष्टीने टाकाऊ पदार्थ, भाजीपाल्यासारख्या वनस्पतींच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असतात. त्याचबरोबर भाजीपाला विक्री-व्यवस्थापनातून उपलब्ध टाकाऊ पदार्थ आणि थोडी माती भरून ते एखाद्या जुन्या टायरच्या किंवा जुन्या एक्साइडच्या बॅटरीच्या खोक्यात भरून ठेवून त्यामध्ये छोटय़ा अथवा मोठय़ा जातींच्या गांडुळाची पैदास करता येते. असे गांडूळ खत मोठय़ा प्रमाणात निर्माण करून शेतीसाठी वापरात आणता येऊ शकते. अशी गांडूळ-निर्मिती अल्प प्रमाणात उपलब्ध होत असल्यास त्यांचा भाजीपाल्याच्या तुकडय़ात मिसळून मत्स्योत्पादनात त्यांना अन्न म्हणूनही वापर करता येतो. आर्थिक दृष्टय़ा परस्परावलंबी या दोन लघुउद्योगांमुळे, स्वतंत्ररीत्या फक्त अ‍ॅक्वाकल्चर (गोडय़ा पाण्यातील मत्स्योत्पादन) किंवा हायड्रोपोनिक्स (जमीन-मातीशिवाय फक्त पाण्यातून भाजीपाला-उत्पादन) घेण्यापेक्षा हे दोन्ही लघुउद्योग संयुक्तपद्धतीने अ‍ॅक्वापोनिक्स म्हणचे चक्रीउद्योग पद्धतीने केल्यास अधिक किफायतशीर ठरते हीच या जोडधंद्याची विशेष आकर्षक बाब आहे. त्यात पाणी रिसायकल पद्धतीने वापरले जाते. पाण्याचा वापरही विशेष किफायतशीरपणे केला जातो. अन्नाची समस्या आणि तीही आरोग्यसंवर्धनाचे दृष्टीने हितकारी ठरते ही या अ‍ॅक्वापोनिक्सची आणखी मोठी जमेची बाजू.

म्हणून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात, लहान-मोठय़ा शहरी भागंच्या बाहेरील ३ ते ५ कि.मीच्या पठय़ात अ‍ॅक्वापोनिक्सच्या जोडधंद्यातून युवक बेरोजगारीवर तोडगा निघू शकेल. महागाईही काबूत ठेवण्याला हातभार लावता येईल. रुपयाच्या घसरणीच्या संकटात पेट्रोल, डिझेलच्या त्यासाठीच्या इंधनाच्या वापरात बचत करता येईल. अर्थात त्यासाठी शासनाने पद्धतशीरपणे या जोडधंद्यास चालना देणे अत्यंत जरुरीचे वाटते.

स्रोत

No comments:

Post a Comment