कृष्ण तुळस ज्यांचे दारी आरोग्य नांदे त्यांचे घरी

भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे. हिंदू धर्मात तुळशीला मांगल्याचे प्रतिक मानले जाते. केवळ भारतातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात तुळशीच्या विविध जाती आढळतात.

प्राचीन आयुर्वेद ग्रंथांमध्ये तुळशीच्या चार प्रमुख जातींचा उल्लेख केलेला आढळतो:
१) कृष्ण तुळस, २) राम तुळस, ३) रान तुळस, ४) कापूर तुळस

या लेखामधून आपण या सर्व जातींमधील सर्वात प्रभावी अशा कृष्ण तुळशीबद्दल माहिती मिळवणार आहोत:

कृष्ण तुळशीचे शास्त्रीय नाव Ocimum Tenuiflorum (उच्चार: ऑसिमम्‌ टॅन्युईफ्लोरम्‌) असे आहे. कृष्ण तुळशीला भगवान कृष्णांच्या "श्याम" ह्या नावावरून व त्यांच्या सावळ्या रंगाशी असलेल्या साधर्म्यामुळे श्याम तुळस असेही म्हटले जाते. ह्या तुळशीची पानांचा रंग जांभळा असतो व देठही त्याच रंगाचा पण गडद असतो. कृष्ण तुळशीची पाने चावताना कुरकुरीत व चवीला किंचीत तिखट लागतात. भारताच्या बहुतांश भागात ही तुळस उगत असली तरी इतर तुळशींच्या मानाने ही चटकन उपलब्ध होत नाही.


तुळशीच्या इतर जातींच्या तुलनेत कृष्ण तुळशीचे रोप मंद गतीने मोठे होते. पानांचा कुरकुरीतपणा व तिखट चवीला ही मंद वाढच कारणीभूत आहे, असं मानलं जातं. कृष्ण तुळशीची पाने चवीला इतर तुळशींच्या मानाने कमी तुरट असतात.

जर घरी कृष्ण तुळस लावणार असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा:
१) कृष्ण तुळशीच्या मंजीऱ्यांपासून रोप उगवण्यास एक ते दोन आठवड्यांचा अवधी लागतो म्हणून धीर धरा.
२) शक्यतो वसंत ऋतूमध्ये मंजीऱ्या पेरा.
३) मंजिऱ्या पेरल्यावर नियमीत पाणी द्या.
४) कसदार माती वापरा.
५) कृष्ण तुळशीला सुर्यप्रकाशाची आवश्यकता असते.
६) कृष्ण तुळशीला समशीतोष्ण हवामान चांगले मानवते.

औषधी वनस्पती म्हणून तुळस फार मौल्यवान आहे. अनेक लोक तुळशीचा ताज्या पानांचा रस नियमित पितात. अनेक दुखण्यांवर गुणकारी औषध म्हणून शतकानुशतके तुळशीचा वापर केला गेला आहे.

कृष्ण तुळशीचे काही औषधी फायदे:
१) घशाचे विकार, श्वसनाचे विकार, नाकाच्या आतील जखमेचे व्रण, कानाचे दुखणे व त्वचारोग यावर गुणकारी. तुळशीचा काढा करून प्यावा.
२) कानात औषध म्हणून तुळशीच्या तेलाचे थेंब टाकता येतात.
३) मलेरियासारख्या आजाराला दूर करण्यासाठी तुळशीचा उपयोग होतो.
४) अपचन, डोकेदुखी, निद्रानाश, फेफरे येणे व पटकी सारख्या आजारांवरदेखील तुळशीचा काढा हे गुणकारी औषध आहे.

अनेक लोक, विशेषत: वारकरी संप्रदायाचे लोक गळ्यामध्ये तुळशीच्या मण्यांची माळ घालतात. नकारात्मक शक्तींपासून बचाव करण्यासाठी तुळशीच्या माळा उपयुक्त असतात, असे मानले जाते. हल्ली तर तुळशीच्या मण्यांपासून बनलेल्या आधुनिक माळाही गळ्यात घालण्यासाठी बाजारात उपलब्ध आहेत.

संदर्भ: हा लेख इंग्रजी लेखाचा स्वैर मराठी अनुवाद आहे.© Kanchan Karai
स्रोत

1 comment:

  1. माहिती चांगली दिली.. धन्यवाद

    ReplyDelete