आंबा मोहरेना

सर्वसाधारणपणे आंब्याच्या झाडाला सुरुवातीची आठ ते दहा वर्षे फळधारणा होते. पुढे जसजसे झाडाचे वय वाढत जाते, तसतसे बहर येण्यामध्ये अनियमितता आढळून येते आणि नंतर एक वर्षाआड फळधारणा होते. हा प्रकार सर्वच फळझाडांमध्ये आढळतो. या कारणाने शेतक-यांचे आर्थिक नुकसान होते. देशात निरनिराळय़ा भागात झालेल्या संशोधनावरून अनियमित फळधारणा होण्याची पुढील काही कारणे स्पष्ट झाल्यामुळे उपाययोजना करणे फायद्याचे ठरणार आहे. तोतापुरी, नीलम आणि बारमासी या जाती सोडल्यावर तर इतर सर्व प्रमुख जातींमध्ये (हापूस, दशेरी,पायरी, केसर, लंगडा, नागीन) आदी फळे एक वर्षाआड येतात. तोतापुरी, नीलम आणि बारमासी या जातीत दरवर्षी फळे येत असल्याने या जातींची लागवड काही प्रमाणावर करावी. म्हणजे बागायतदारांना नुकसान सहन करावे लागणार नाही.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठाने विकसित केलेली रत्ना आणि नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेली आम्रपाली या संकरित जाती दरवर्षी फळे देतात. हापूस जातीमध्ये एक वर्षाआड फळधारणा होते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आंब्याच्या झाडांना कल्टार (२५ टक्के पॅक्लोब्युट्रॅझोल) हे रसायन देण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार दहा ते तीस वष्रे वयाच्या झाडाला २० मिली (५ ग्रॅम मुख्य घटक) ३ ते ५ लि. पाण्यात मिसळून झाडाच्या बुंध्याभोवती मातीत मिसळावी.

कल्टार दिलेल्या झाडापासून दरवर्षी उत्पादन अपेक्षित असल्यामुळे अशा झाडांना उत्पादनानुसार खताच्या वाढीव मात्रा तसेच कीड किंवा रोग संरक्षणासाठी औषधांचे फवारे देणे आवश्यक असते. काही फांद्यांवरील फुलोरा पूर्णपणे काढून टाकल्यास त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्या फांद्यांवर काही फळे मिळू शकतात. जातीपरत्वे ती कमी-अधिक प्रमाणात मिळत असून दशेरी जातीमध्ये चांगले परिणाम आढळून येतात. फुलोऱ्याच्या काळात ढगाळ हवामान आणि पाऊस पडत असल्यामुळे भुरी, करपा, तुडतुडय़ांचा उपद्रव कमी करण्यासाठी संरक्षणात्मक कीटक किंवा बुरशीनाशकांची फवारणी करावी. आंब्याच्या झाडांना दरवर्षी नियमित खते देणे अथवा औषधांची फवारणी करणे अशी काळजी क्वचितच घेतली जाते.


बहुतेक करून बिगर खतपाण्यावरच झाड वाढवले जाते. आंब्याच्या बागेची चांगली मशागत करून खते दिल्यास रोग/किडीचा बंदोबस्त केल्यास बागेचे स्वास्थ्य चांगले राहून अनेक वर्षे नियमितपणे चांगले उत्पादन मिळते. रोग व कीड हे एकमेकांशी संबंधित असल्याने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने बुरशीनाशक व कीटकनाशक फवारणी वेळापत्रकाची शिफारस केली आहे. फळे न लागणे, फळांची गळ वा कमी फळधारणा या समस्या बागांमध्ये आढळून येतात.

याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत. इतर अनेक कारणांपैकी फुलोरा येण्याचा काळ, निरनिराळय़ा जातींमध्ये नर व उभयलिंगी फुलांचे प्रमाण, स्वपरागीभवनाची क्षमता यावर प्रामुख्याने फळधारणेचे प्रमाण अवलंबून असते. उभयलिंगी फुलांपासून फळे मिळतात. अशा फुलांचे प्रमाण जातीपरत्वे आणि वातावरणाप्रमाणे कमी-अधिक प्रमाणात आढळते. केसर जातीमध्ये उभयलिंगी फुलांचे प्रमाण जास्त आढळते. दशेरी, लंगडा, चवसा आणि नागीण या जातींमध्ये स्वपरागीकरणामुळे फळधारणा होत नाही. अशा जातींमध्ये परपरागीकरणाची आवश्यकता असते. फुलोरा येण्याच्या व नंतरच्या काळात असणारे हवामान आणि रोग व किडींचा प्रादुर्भाव यावर फळधारणेचे प्रमाण अवलंबून असते. फळधारणा झाल्यानंतर फळे तयार होईपर्यंत निरनिराळय़ा अवस्थेत फळगळ होत असते. सुरुवातीची फळगळ बऱ्याच वेळा नैसर्गिक असते. परंतु फळे अर्धवट मोठी वाढल्यानंतर गळणे अधिक नुकसानकारक ठरते. या समस्यांवर सुरुवातीपासून पुढील प्रकारे उपाययोजना करणे उचित ठरेल.

बागा लावताना निव्वळ जातीची लागवड करू नये. काही प्रमाणात इतर एक अथवा दोन जाती त्यामध्ये लावाव्यात. यामुळे फळधारणा वाढण्यास मदत होते. शिवाय एकाच जातीमुळे होणारे संभाव्य नुकसान कमी होऊ शकते. फुलोरा निघत असताना आणि त्यानंतरच्या काळात तुडतुडे, भुरी इत्यादींच्या बंदोबस्तासाठी कीटकनाशकांची/ बुरशीनाशकांची वेळोवेळी फवारणी करावी.

संजीवकाचे फवारे देऊन फळगळ कमी करता येते. यासाठी एन.ए.ए. १० पी.पी.एम. किंवा २-४ डीचे १५ पी. पी. एम. दोन फवारे द्यावेत. फळे वाटाण्याएवढय़ा आकाराची असताना एक आणि फळे बोराएवढय़ा आकाराची असताना दुसरा फवारा द्यावा.

पांढरा साका (स्पॉजी टिश्यू)
फळाच्या (विशेषत: पिकलेल्या अवस्थेत) गरामध्ये लिबलिबीत स्पंजासारखा भाग तयार होतो. ही विकृती हापूस आंब्याच्या फळांत जास्त आढळते. या विकृतीची कारणे अद्याप सापडलेली नाहीत. परंतु असे दिसून आले की, फळे जसजशी अधिक जून होतात तसतसे पिकवल्यानंतर उन्हात अगर तापलेल्या जमिनीवर राहिल्यास अशा फळांत साक्यासारखी विकृती तयार होते. उपलब्ध संशोधन आणि अनुभवातून आंब्याच्या फळांतील पांढरा साका कमी करण्यासाठी उपाय सुचवलेले आहेत.

शेतक-यांनी फळे ८५ टक्के तयार झाल्यावर काढावीत.

झाडावरून फळे काढल्यानंतर ती उन्हात अथवा तापलेल्या जमिनीवर ठेवू नयेत.

बागेमधील झाडाखालचे तापमान वाढू नये म्हणून जमिनीवर गवत वाढवावे किंवा जमिनीवर आच्छादन करावे.

नीलम आणि हापूस यांच्या संकरातून तयार केलेल्या ‘रत्ना’ जातीची लागवड करावी.

मँगो मालफॉर्मेशन

मँगो मालफॉर्मेशन ही आंब्यावरील एक भयंकर समस्या आहे. विशेषत: उत्तर भारतातील आंब्याच्या जातींमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर आढळून येतो. रोगमुक्त झाडावर पर्णगुच्छासारखे झुपके तयार होतात. झाडावर फुलांचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते आणि फळधारणा होत नाही.

या विकृतीचे निश्चित कारण समजलेले नाही. निश्चित उपाययोजना जरी सापडली नाही तरी पण रोगट भागाची सुरुवातीलाच छाटणी करून कीटकनाशकांची/बुरशीनाशकांची फवारणी केल्यास आणि ऑक्टोबरमध्ये एनएए या संजीवकाचा २०० पीपीएम तीव्रतेचा फवारा दिल्यास अशा प्रकारच्या पर्णविकृतीचे प्रमाण कमी करता येते. कलमकाडय़ा घेताना वा कलमे खरेदी करताना शक्यतो स्थानिक भागातून घेणे इष्ट ठरते. रोगग्रस्त भागातून तसेच रोगट झाडावरील कलमकाडय़ा वापरू नयेत.

स्रोत

No comments:

Post a Comment