आंब्याचे शत्रू वाढलेत

मागील आठवडयात आपण आंब्यावर घोंगावणा-या संकटांची माहिती घेतली. आज त्याला विळखा घालणा-या आजारांची माहिती घेऊ यात. फांद्या वाळणे हा एक असाच रोग आहे. त्याला पीक रोग असेही म्हणतात.

सुरुवातीच्या फांद्यावर पांढ-या रंगाचे गोलाकार ठिपके पडतात. कालांतराने ते एक मेकोंत मिसळून झाडाचा जोम कमी होतो. लागण झालेला भाग खरवडून टाकावा. त्यावर बोडरेपेस्ट लावावी. वाळलेल्या फांद्या कापून टाकून कापलेल्या फांद्या जाळून टाकाव्यात.

आंब्यावर हा आजार हंगामात अधिक असतो. फळकुज हा प्रमुख बुरशीजन्य काढणीपश्चात रोग असून फळे काढल्यानंतर पिकण्याच्या अवस्थेपर्यंत फळांवर तपकिरी रंगाचे चट्टे दिसून फळे कुजतात आणि मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. त्यासाठी फळे काढणीनंतर लगेच ०.०५ टक्के तीव्रतेच्या कार्बेडेझीमच्या द्रावणात १० मिनिटे बुडवून ठेवावीत आणि सावलीत वाळवावी. अशी फळे खोक्यात भरावीत अथवा पिकण्यासाठी आढीत ठेवावी.


शेंडामार: रोपावस्थेत अथवा नवीन पालवी आल्यावर प्रादुर्भाव वाढतो. पानावर तांबूस रंगाचे ठिपके पडतात. सुरुवातीच्या काळात रोगाची लक्षणे जरी सहजासहजी दिसत नसली तरी रोगाचे प्रमाण जास्त वाढल्यावर पाने काळी पडतात व नंतर गळतात. लहान रोपाचा शेंडा वरून खाली वाळत जातो व नंतर कलम मरते.
उपाय: लागवडीसाठी निवडलेल्या कोयी पाण्याने स्वच्छ धुऊन त्या ३० मिनिटे २ टक्के बोडरे मिश्रणात (२०० गॅ्रम मोरचूद +२०० गॅ्रम चुना+ १० लिटर पाणी) बुडवाव्यात. रोगाची लागण झालेली रोपे काढून नष्ट करावीत.

रोपमर: जमिनीतील पाण्याचा निचरा नीट झाला नाही किंवा कलमाचे रोप बदलून कायम ठिकाणी लावताना मुळांना इजा झाली तर मुळावर बुरशी वाढून रोपमर होते. रोप लहान असेल तर त्यावरील पाने सुकून कलम मरते.
उपाय: रोपमर होऊ नये म्हणून रोपांच्या पिशव्यांमध्ये पाणी साचू देऊ नये. रोप लागवडीसाठी पॉलिथिनच्या पिशव्या मातीच्या मिश्रणाने भरण्यापूर्वी पाण्याचा निचरा होण्यासाठी पिशव्यांच्या तळाशी प्रत्येकी सहा भोके पाडावीत. पावसाळय़ात कलमावर पॉलिथिन कोगदाचे आच्छादन ठेवावे आणि पाऊस नसताना तसेच उन्हात हे आच्छादन काढून टाकावे. कलमावर एका महिन्याच्या अंतराने १ टक्के बोडरेमिश्रणाची (१०० गॅ्रम मोरचूद +१०० गॅ्रम चुना +१० लि.पाणी) फवारणी करावी.

फांदीमर: या रोगाची पांढरट अथवा किंचित गुलाबी रंगाची बुरशी फांदीच्या जोडात आढळते. या बुरशीमुळे फांदीच्या गाभ्यात आणि बाजूने बुरशी वाढल्यामुळे फांदीतून होणारा अन्न आणि पाणी यांचा पुरवठा बंद होतो. फांदीवरील पाने व शेंडे सुकतात व कालांतराने फांदीमर होते.
उपाय: रोगाची लक्षणे दिसताच रोगट फांदी तळापासून कापून काढावी व जाळून नष्ट करावी. कापलेल्या भागावर बोडरे मिश्रणाचा लेप लावावा.

मूळ कुजवा: हा बुरशीजन्य रोग आहे. कोय कलमासाठी गादीवाफ्यावर लावलेल्या कोयीपासून तयार झालेल्या, तांबडय़ा पानांच्या अवस्थेपर्यंतचे रोप या रोगास बळी पडते. बुरशीची लागण होताच रोपाचा जमिनीलगतचा भाग काळा पडतो आणि कुजतो. रोपाची मुळे कुजल्याने पाने सुकतात आणि रोप मरते.
उपाय: रोपे तयार करण्यासाठी चांगल्या कोयींची निवड करावी. त्यासाठी कोयी पाण्यात टाकल्यावर ज्या कोयी पाण्यात टाकल्यावर तळाशी बसतील अशा कोयी पाण्याने स्वच्छ धुऊन गादी वाफ्यावर पेराव्यात. गादीवाफ्यावर पेरण्यापूर्वी ५ ग्रॅम ब्लायटॉक्स किंवा फायटेलॉन १ लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या बुरशीनाशकाच्या द्रावणात कोयी अर्धा तास बुडवून ठेवाव्यात. रोगग्रस्त रोपे आणि मुळालगतची माती गोळा करून नष्ट करावी.

आंब्यावरील बांडगूळ: आंब्याच्या फांदीवर वाढणारी ही परोपजीवी वनस्पती आंब्याच्या फांदीतून रस शोषून घेते. बांडगुळाचे बी पावसाळय़ात झाडाच्या फोंदीवर रुजते. त्याची मुळे सालीतून सरळ आत जातात. आतील गाभ्यावर वेष्टन तयार करतात. अशा ठिकाणी फांदीवर गाठ दिसते. बांडगुळाचा प्रादुर्भाव झालेल्या आंब्याच्या झाडाने तयार केलेले अन्न बांडगूळ स्वत:साठी वापरते. त्यामुळे आंब्याच्या फांद्या, झाडे अशक्त होतात, फळेही कमी लागतात.
उपाय: बांडगुळे झाडावर दिसताच ती ताबडतोब संपूर्णपणे कापून त्यावर ३० टक्के क्रियोसीट तेल लावावे.

स्रोत

No comments:

Post a Comment