नाद "बागे"श्री - बागेतील प्रयोग

विंदांची कविता आहे. "तेच ते आणि तेच ते". या कवितेत वर्णन केल्यासारखाच तुमचा आमचा दिनक्रम असतो. थोडा फार एकसुरी आणि कंटाळवाणा! या पासून सुटकेची पळवाट आपणच फुलवलेल्या बागेकडे जाणार असेल तर त्या सारखं सुख कोणतं?

व्यवसायाने अभियंता असणाऱ्या श्रीकांत काळे यांनी आपल्या छोट्याशा गच्चीत हे सुख निधान फुलवले आहे.

गच्ची लहान पण कुंड्यांची रचना व्हर्टीकली केल्यामुळे त्या जागेत अबोली, रातराणी, कण्हेर, सोनचाफा, कडीपत्ता, लिंबू ते अगदी बांबूच्या झाडापर्यंत जवळपास ५० कुंड्यांनी आपले बस्तान बसवले आहे. या सगळ्या झाडांची देखभाल करताना त्यांनी वेगवेगळे प्रयोगसुध्दा केले आहेत.


आईचा पाणी घालण्याचा त्रास वाचावा म्हणून छोटासा पंप त्यांनी गच्चीत ठेवला आहे आणि प्रत्येक कुंडीत स्प्रिंकलर्स सोडले आहेत. त्यामुळे पाण्याची बचत होते आणि कुंडीत दिवसभर ओलावा राहून झाडेही टवटवीत राहतात. प्रत्येक कुंडीत गांडूळ खताचा वापरही केलाय. दिवसभरातला ओला कचरा बारीक करून या कुंड्यांमध्ये टाकण्यात येतो. हे काम त्यांच्या पत्नी सौ. वैशाली अगदी नेमकेपणानी आणि आनंदाने करतात.


गॅलरीच्या बाहेर अडकवलेल्या नारळाच्या करवंटी पासून तयार केलेल्या बागेतल्या खाऊ घराची आणि साखरेच्या गोड़ पाण्याची चटक पक्षांना लागली आहे. कावळा, चिमणी, बुलबुल आणि खार या मंडळींची त्याला अगदी आवर्जून भेट असते. त्यांच्या येण्याने ही गच्चीतली हिरवाई अगदी जिवंत होऊन जाते.


नारळाच्या करवंटीपासून बनविलेला खाऊ घर

काळे यांच्या आवडीला प्रयोगशीलता आणि तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे विंडमिल, बायोगॅस व सोलर energy चे यशस्वी प्रयोग त्यांनी आजवर केले आहेत.


गोड पाण्याची बाटली

आपल्या स्वयंपाक घराशेजारील बाल्कनीमध्ये २०० लिटर क्षमतेचा बायोगॅस प्लांट त्यांनी बसवला आहे. त्यामध्ये रोज ओला कचरा टाकला जातो. "बायो गॅस वर माझा रोजचा एक वेळचा चहा होतो." असे त्यांच्या मातोश्रींनी आवर्जून सांगितले. या प्लांट मधून बाहेर पडणाऱ्या slurry चा उपयोग ते झाडांसाठी खत म्हणून करतात.

या शिवाय त्यांनी ८ सोलर पॅनेल्स बसवून घरगुती वापरासाठी वीजनिर्मिती ही केली आहे. घरातले दिवे आणि पंखे या सौरऊर्जेवरच चालतात. पदोपदी दिवे पंखे बंद करायला विसरणाऱ्या आमच्यासारख्यांना हा उत्तम पर्याय!

काळे दाम्पत्यानी झाडांवर म्युझिक थेरपीचे ही प्रयोग केलेत. पण त्यामुळे होणाऱ्या फायद्या बद्दल मात्र ते जरा साशंक आहेत.


यांच्या चिकाटीने नवनवीन प्रयोग करण्याला त्यांच्या पत्नी व आईची विनातक्रार साथ असते. मात्र कामाच्या व्यापामुळे आता बागेकडे म्हणावे तेव्हढे लक्ष देता येत नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. त्यांच्या गच्चीतून दिसणाऱ्या सिमेंटच्या जंगलाच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही गच्चीतली बाग बघून डोळे आणि मन अगदी तृप्त होतात.

स्रोत

No comments:

Post a Comment