राणीचे फूल

वृक्ष, फुलं, पक्षी,प्राण्यांच्या देशा - भाग २ इथे

दर एक मे रोजी उत्साहाने ‘जय महाराष्ट्र’ म्हणताना आपल्याला आपल्या राज्याचा वृक्ष म्हणजेच राज्यवृक्ष, तसंच राज्यपक्षी, राज्यप्राणी, राज्यफुलपाखरू माहीत असायला हवेत.

लहानपणी भूगोल हा रटाळच असतो अशी धारणा बाळगून शिकल्यावर, शालेय जीवनातलं भूगोलाचं पुस्तक, शाळा सुटली पाटी फुटली उक्तीप्रमाणे आपल्यापासून दूर जातं ते कायमचं. शालेय जीवनात असल्या ‘बोअरिंग गोष्टी’ पुढे जनरल नॉलेजच्या पेपरला दत्त म्हणून समोर येतात आणि आपल्या मेंदूला कामाला लावतात. हे जनरल नॉलेजचे पेपरवाले काय काय विचारत बसतात. विविध स्पर्धा, वेगवेगळे देश, त्यांचे झेंडे, त्यांची प्रतीकं वगरे वगरे. असला डोकेबाज अभ्यास करताना जाणवतं की बहुतांश देशांना, त्यातल्या प्रांतांना, राज्यांना स्वत:ची मानचिन्हं आणि प्रतीकं असतात. ही मानचिन्हं तिथल्या संपदेशी, निसर्गाशी जोडलेली असतात. नुकताच एक मे, अर्थात महाराष्ट्र दिन साजरा झाला. १ मे १९६० साली स्थापन झालेल्या महाराष्ट्राची जैविक संपदा वाखाणण्याजोगीच आहे. आज आसमंतातल्या गप्पांमध्ये महाराष्ट्राची चिन्हं अर्थात स्टेट सिम्बॉल्स बघताना नक्की जाणवेल की महाराष्ट्र नसíगक संपदेने किती समृद्ध आहे.

वसंतात बेभानपणे फुलणाऱ्या ठळक झाडांमध्ये निसर्ग बहुतांश लाल पिवळा रंग भरभरून उधळत असताना कुठेतरी हळूच नाजूक गुलाबी, जांभळा रंग दिसायला सुरुवात होते. ‘प्राइड ऑफ इंडिया’, क्वीन ऑफ फ्लॉवर अशी विविध इंग्रजी नावं मिरवणारां हा सुंदर जांभळा मोहोर आपल्या राज्याचं फुलं म्हणून ओळखला जातो. मराठीत जारूळ, तामण म्हणून ओळखलं जाणारं हे झाड महाराष्ट्राचं राज्य फूल, अर्थात स्टेट फ्लॉवर म्हणून सन्मानित झालंय.

चत्रातला पळसाचा सरता पुष्पोत्सव भर उन्हाळ्यात तामणाला जणू खो देतो नि हे मध्यम आकाराचं हिरवं डेरेदार झाड जांभळट गुलाबी फुलांनी बहरून जातं. शंभर टक्के भारतीय असलेलं झाड महाराष्ट्रात बहुतेक सर्व भागांत आढळतं. ‘ल्यॅगरस्ट्रोमिया रेगिनी’ असं वनस्पतीशास्त्रीय नाव धारण केलेलं, मेंदीच्या लिथ्रेसी कुटुंबातलं हे झाड. त्याचं नाव एका स्विडिश निसर्ग अभ्यासकाच्या नावाचं स्मरण देतं.


प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ लिनियस जेव्हा झाडांचं वर्गीकरण करत होता तेव्हा त्याच्या म्यॅग्नस वान लॅगरस्ट्रोमन या स्विडिश निसर्ग अभ्यासक मित्राने, या झाडाचे नमुने नेऊन दिले म्हणून आपल्या मित्राच्या सन्मानार्थ त्याने या झाडाच्या प्रजातीचं नाव मित्राच्या नावावरून ठेवलं.

या झाडाच्या नावाची उकल खुप सुंदर आहे. ‘फ्लॉस रेगिनी’ म्हणजे राणीचे फूल! साधारण पन्नास फुटांची उंची गाठणारं हे देखणं झाड लांबुळक्या पानांनी समृद्ध असतं. वरून हिरवीगार नि खालच्या बाजूने फिक्कट हिरवी पानं आणि गुलाबी जांभळी फुलं हे या झाडाचं वैशिष्टय़ म्हणता येऊ शकतं. या झाडाची साल साधारण पिवळट भुरकट रंगाची आणि गुळगुळीत असते. या सालीचे अगदी नियमित पेरूच्या झाडासारखे पापुद्रे गळून पडतात. वसंतात नाजूक कोवळी पानफूट सुरू होतानाच फुलांनाही बहर यायला सुरुवात होते. निष्पर्ण फांद्यांच्या टोकाला साधारण तीस सेंमी लांब फुलाचे घोस यायला सुरुवात होते. या जांभळट गुलाबी फुलांचं वैशिष्टय़ म्हणजे ही खालून वर उमलत जातात. ही पूर्ण उमललेली पाच-सहा सेंमी फुलं जणू गुलाबी झालरींचा गुच्छच वाटतो. साधारण सहा-सात झालरींच्या गुलाबी जांभळ्या पाकळ्या व त्यात उजळ पिवळ्या रंगाचे नाजूक पुंकेसर हे तामणीचं वैशिष्टय़ म्हणता येऊ शकतं.
उन्हाळ्याच्या शेवटी या झाडाची फळं अर्थात बोंड धरायला सुरुवात होते. साधारण तीन सेंमी आकाराची होणारी ही फळं टोकाकडे टोकदार आणि वर कडक आवरण असलेली ठळकपणे दिसून येतात. ही बोंड सुकून साधारण काळसर तपकिरी होतात. यात सुकलेल्या अगदी पातळ चपटय़ा असतात. यांना म्हातारीच्या बियांसारखे कापूस पंख असतात जे या बीजांना दूरवर वाऱ्यावर वाहून घेऊन जातात.


तामण झाडाचं लालूस चमकदार छटेचं लाकूड उत्तम आणि मजबूत सदरात मोडतं. अनेक मोठय़ा बांधकामांसाठी यांचा वापर केला जातो. या झाडाचे अनेकविध उपयोग आहेत. याच्या सालींचा उपयोग आयुर्वेदात ताप उतरवण्यासाठी केला जातोच, पण याची पानंदेखील उपयोगी समजली जातात. पानात असलेल्या कोरोसॉलिक आम्लामुळे त्यांचा वापर पूर्वेकडच्या अशियाई देशांमध्ये चहामध्ये केला जातो. फिलिपाइन्स या देशात तर चक्क याचा उल्लेख सरकारी झाड असं केला जातो. आपल्याकडे या झाडाचा उपयोग हल्ली सुशोभीकरणाचा वृक्ष म्हणूनच केला जातो. हे झाड अगदी सहज कुठेही रुजतं आणि फुलतं. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात हे झाड फुलतं. विविध भागांतल्या हवा, पाणी व जमिनीच्या फरकांमुळे याच्या फुलांच्या रंगछटांमध्ये वैविध्य जाणवतं. कणखर, राकट दगडांचा देश असलेल्या महाराष्ट्राचं राज्यीय फुलं इतकं सुंदर, इतकं देखणं असणं याहून दुसरी रसिक गोष्ट काय असू शकते?

स्रोत

No comments:

Post a Comment