गच्चीतल्या बागेत परदेशी फुलांचा बहर

घरातल्या घरात अगदी करवंटीपासून कमाल दीड फूट उंचीच्या विविध आकाराच्या कुंडय़ांमध्ये निरनिराळ्या वृक्षांची जोपासना करणाऱ्या ठाण्यातील डॉ. नंदिनी बोंडाळे यांच्या बागेत सध्या बँकॉकमधील अ‍ॅडेनियम जातीची फुले फुलली आहेत. भारतात अ‍ॅडेनियम जातीची एकेरी फुले बघायला मिळतात. मात्र ठाण्यातील त्यांच्या या घरातल्या बागेत आलेली ही फुले बहुरंगी आणि बहुपदरी आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात डॉ. नंदिनी यांनी बँकॉकमधून फुलांचे रोप आणून आपल्या गच्चीतील बागेत लावले. त्याला आता एक वर्षांनी फुले आली आहेत.

टाटा मूलभूत संशोधन केंद्रात संशोधक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. नंदिनी बोंडाळे यांनी गेली अनेक वर्षे चरई विभागातील त्यांच्या घरातील गच्चीत बागेची जोपासना केली आहे. त्यांच्या या बागेत तब्बल ३०० प्रकारच्या वनस्पती आहेत. त्यात सर्वसाधारणपणे घरात आढळणाऱ्या तुळस, गुलाब, मोगरा, जास्वंद, सोनचाफा, कवठी चाफा, सायली, कुंद, कामिनी, डबल तगर आदी औषधी तसेच सुगंधी फुलझाडांबरोबरच अन्य वैशिष्टय़पूर्ण वनस्पतीही आहेत. त्यात पंचमुखी पांढरी गोकर्ण, पंचमुखी निळी गोकर्ण आदींचा समावेश आहे. आळू, कढीपत्ता, गवती चहा, कारले एवढेच काय त्यांच्या बागेत अगदी आंबे हळदही आहे. याशिवाय एरवी जंगलातच आढळणारे वड, पिंपळ आणि उंबर आदी महाकाय वृक्षांचे बोन्सायही त्यांच्या बागेत असून उंबराला नेहमी एक-दोन फळेही आलेली असतात.


सध्या त्यांच्या या बागेतील केळ फुलली आहे. तसेच आसाममध्ये आढळणारी सर्वाधिक तिखट मानली जाणारी नागा मिरचीही त्यांच्या बागेत आहे. नागा मिरचीची ख्याती अशी की अवघी एक मिरची १५ व्यक्तींच्या स्वयंपाकासाठी पुरेशी ठरते. बोंडाळे दाम्पत्य पाचव्या मजल्यावर राहते. सदनिकेची ओपन टेरेस त्यांनी बागेसाठी राखीव ठेवली आहे. या हिरवाईमुळे अनेक प्रकारचे पक्षी त्यांच्या या टेरेस गार्डनमध्ये येतात.

नारळाची कुंडी सर्वात छोटी कुंडी
गेली अनेक वर्षे घरातील बागेची जोपासना करताना येणाऱ्या अनुभवावर डॉ. नंदिनी बोंडाळे यांनी एक पुस्तकही लिहिले आहे. तसेच घरच्या घरी बाग करू इच्छिणाऱ्यांना त्या मार्गदर्शनही करतात. नारळाची करवंटी ही सर्वात छोटी नैसर्गिक कुंडी आहे. कारण तिला खालच्या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी छोटे भोक असते, असे त्या म्हणतात.

स्रोत


No comments:

Post a Comment