जरबेरा

जरबेराची छोटी झाडे साधारण १५ ते २० सेंमी आकाराच्या कुंडय़ांमधून सहज वाढवता येतात. प्लस्टिकच्या पिशवीतील जरबेराची रोपे साधारणपणे १५ ते ३० रुपयांपर्यंत नर्सरींमधून उपलब्ध असतात. जरबेराच्या जुन्या जाती नव्या हायब्रीड जातींपेक्षा जास्त कणखर असतात. जुन्या जातीचे एक रोप लावल्यास वर्षांअखेर त्यातून आपल्याला कमीत कमी ५ ते ६ नवी रोपे मिळतात. कारण जरबेराच्या रोपाला जमिनीतून नवे फुटवे फुटतात; त्यांचे विभाजन करून अधिक रोपे बनवता येतात. जुन्या जातींमध्ये सिंगल फुलांच्या (पाकळ्यांची एकच रांग) व डबल फुलांच्या (भरगच्च पाकळ्यांच्या) असे अनेक रंगांतील प्रकार मिळतात.

या फुलांचे देठ मात्र जरा बारीक असले तरी लांब देठांवर ही साधारण शेवंतीसारखी दिसणारी फुले फारच आकर्षक दिसतात. यांना जवळजवळ वर्षभर फुले येत असतात. पूर्ण उन्हाची जागा यांना मानवते. मातीत ओलावा नेहमीच टिकून राहील हे पाहावे, परंतु पाणी फार जास्त झाल्यास किंवा पाण्याचा निचरा बरोबर न झाल्यास जरबेराची रोपे कुजण्याची शक्यता असते.

नव्या हायब्रीड जातीत खूप रंगाच्या, मोठय़ा व जाड देठाच्या जाती उपलब्ध असतात. ही फुले जास्त आकर्षक दिसत असली तरी ह्य हायब्रीड जाती जरा नाजूकच असतात. त्या पॉलीहाऊसमध्ये वाढविलेल्या असल्याने त्यांना जास्त ऊन सोसत नाही. तसेच पाणी जरा जास्त/कमी झाले तरीही ती मरून जाण्याची शक्यता अधिक असते. यांना नवे फुटवेही फार कमी फुटतात; त्यामुळे त्यांची अभिवृद्धीही लवकर होत नाही. तसेच यांची रोपेही बहुतेक फक्त कोकोपीटमध्येच लावलेली मिळतात.


कोकोपीटमधून जरबेराच्या रोपांना कसलेही अन्नांश मिळत नसल्याने, एक तर त्याचे खत-मातीच्या मिश्रणात पुनरेपण करावे लागते किंवा त्यांना नियमितपणे रासायनिक खते पुरवावी लागतात. जुन्या जातींपेक्षा यांच्या किमतीही जरा जास्तच असतात, म्हणजे रु. ५० ते रु. ७५. जुन्या किंवा हायब्रीड ह्य दोनही जातींना जवळजवळ वर्षभर फुले धरतात. तसेच एका कुंडीत एकाच वेळी ५ ते ६ फुलेही धरतात. अशी फुलांनी डवरलेली कुंडय़ांतील रोपे फारच मनमोहक दिसतात. एक फूल झाडावर साधारण ८ ते १० दिवस टिकून राहते. फूल कापून फुलदाणीत ठेवले तरी ते ५-६ दिवस ताजेतवाने राहते; म्हणून पुष्परचनेसाठीही या फुलांना चांगलीच मागणी असते.


फुले उमलल्यानंतर साधारण ७ ते ९ दिवसांत मरगळलेली दिसू लागतात. अशी मरगळलेली फुले झाडावर ठेवण्यात काहीही हशील नसते. फूल मरगळल्याची चिन्हे दिसताच ती अगदी बुडापासून कापून टाकावीत. मरगळलेली किंवा सुकलेली फुले झाडावरच रहिली तर नवी फुले धरण्यास विलंब लागतो.

स्रोत

No comments:

Post a Comment