काळय़ा मुसळीचं फूल

‘येऊर’चं जंगल हे चिरतरुण जंगल आहे. एक पाऊस पडला आणि ते वनचैतन्याने सळसळायला लागलं. अक्षरश: या जंगलाने कात टाकली. उन्हाळ्यात या जंगलातल्या पांगारा, काटे-सावर, साग, ऐन, कौशी अशा प्रकारच्या झाडांनी स्वत:ची पाने गाळली होती. बिनपानाच्या पांगारा आणि काटे-सावरीचे काटे जरा जास्तच अंगावर येत होते. पण या जंगलातली सर्वच झाडे काही पानझडीची नाहीत. इतर अनेक झाडे ज्यांना वर्षभर पाने असतात, जी सदाहरित असतात अशी झाडे तुलनेने बरीच असल्याने ‘येऊर’चं जंगल कधी भकास वाटत नाही. सर्व जंगल दाट-हिरव्या पानांनी भरलेलं असतं तेव्हा पक्षी असूनही दिसत नाहीत. त्यांचे आवाज कानावर पडतात, त्यांची पळापळ जाणवते. पण प्रत्यक्षात पक्ष्यांचं दर्शन होत नाही. याउलट जेव्हा पानगळ होते तेव्हा बिनपानाच्या झाडावर बसलेले पक्षी आणि त्यांच्या हालचाली स्पष्ट दिसतात. हे जंगल अशा पानगळीच्या आणि सदाहरित अशा झाडांच्या समन्वयाने तयार झाल्यामुळे, इथली जैवविविधता आपल्या कल्पनेपलीकडची आहे. ती लपून न राहता नजरेस पडते.

पाऊस पडला तशी इथली तापलेली जमीन शांत झाली. झाडांवर आणि त्यांच्या पानावर पाणी पडले, त्याबरोबर धुळीने माखलेली पाने स्वच्छ झाली. आपल्या अंगावरची माती पानांनी वाया न घालवता पावसाच्या पाण्याबरोबर खाली जमिनीवर थेंबाथेंबांनी सोडली. या सर्वातून जुन्या पानांना एक स्वच्छ, हिरवा टवटवीतपणा आला आणि अगदी याच वेळी पिटुकल्या रानफुलांनी आणि त्यांच्या पानांनी जमिनीच्या पोटातून बाहेर यायला सुरुवात केली. आणि ‘येऊर’च्या जंगलाने अगदी सर्वागाने हिरवाई पांघरायला घेतली.


सध्या अत्यंत लगबगीने जमिनीच्या पोटातून बाहेर येणारं फूल आहे ‘काळी मुसळी’चं. नवीन उगवलेलं फूल बिनपानाचं असतं म्हणून अगदी उघडय़ावर पडल्यासारखं ओकं-बोकं वाटतं. त्याचं खरं सौंदर्य फुलतं ते पानांच्या परडीत. जाडजूड मुळं असणाऱ्या या मुसळीची पानं फूटभर लांबीची असतात. सर्व बाजूंनी पसरवलेल्या या लांब पानांच्या झुपक्यात आरामात बसलेल्या एक ते दीड सें.मी.च्या या पिवळ्या फुलांचा रुबाब काय वर्णन करावा? जमिनीवरचा तारा तो. म्हणूनच त्याचं कॉमन इंग्लिश नाव आहे golden eye-grass. तारे जसे आकाशाला चिकटलेले असतात अगदी तसंच काळ्या मुसळीचं फूल जमिनीला चिटकलेलं असतं. याची फूटभर लांबीची पानं थेट जमिनीतून बाहेर येतात. त्यासाठी त्यांना खोडाची तर नाहीच पण देठाचीही गरज भासत नाही. ही पाने ऑर्किडच्या पानासारखी दिसतात. म्हणजे या पानावर देठापासून टोकाकडे जाणाऱ्या समांतर रेषा असतात. ऑर्किडच्या पानाला असते तशी घडी या पानांना असते. अर्थात ती पानाच्या लांबीवर अवलंबून असते. ऑर्किडचा आणि याचा काहीच संबंध नाही. पण ऑर्किडचा आभास निर्माण करणारी पानं म्हणून शास्त्रीय भाषेत ही काळी मुसळी झाली.

सहा पाकळ्यांच्या या पिवळ्या रंगाच्या ताऱ्यात पाकळ्यांइतकेच म्हणजे सहा पुंकेसर असतात आणि त्यांच्यावर परागकणांनी भरलेल्या पिवळ्या पिशव्या आपला तोल सांभाळत आडव्या झालेल्या असतात. त्यामुळे मोठय़ा पिवळ्या फुलांत लहान पिवळं फूल उगवल्यासारखं वाटतं. हिरव्या पानांच्या गोलाकार पवडीतून डोकावणारे हे पिवळे तारे त्यांच्या परस्पर विरोधी रंगांमुळे लपून राहात नाहीत. तिच्यातील औषधी गुणधर्मामुळे आज ती प्रमाणाबाहेर उपटली जात आहे. आपला हा ठेवा आपणच जतन केला पाहिजे.

स्रोत

No comments:

Post a Comment