शहर शेती: घरीच पिकवा पालेभाज्या

आपण आपल्या घरात, गॅलरीत केवळ शोभेच्या नव्हे तर दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या वनस्पतींचीही लागवड करू शकतो. त्याचे अनेक फायदे आहेत. मात्र सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे समाधान. आपण आवडीने लावलेले, मेहनतीने वाढवलेले झाड जेव्हा फुलते, फळते तेव्हा होणारा आनंद हा कोणत्याही तराजूत मोजता न येणारा असतो. या वनस्पतींना लागणारी माती आणि खते आपल्याला आवारातच सहज उपलब्ध होतात.

आपल्या दैनंदिन आहारात लागणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पतींची लागवड करून आपण स्वकष्टाने काही प्रमाणात का होईना आरोग्यदायी अन्न मिळवू शकतो. ‘आम्ही आमच्या घरात पिकविलेले आहे बरे का’ असे अभिमानाने सांगू शकतो. कारण सध्या बाजारात उपलब्ध असणारा भाजीपाला आरोग्याच्या दृष्टीने किती उपयुक्त आहे, याबाबत साशंकताच आहे. कारण अधिक प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेता यावे म्हणून वापरण्यात आलेल्या रासायनिक खतांचे आणि कीटकनाशकांचे घातक अंश त्यात असतात. त्याचप्रमाणे भाजीपाला जिथे पिकतो, तिथून आपल्या घरी येईपर्यंतच्या प्रवासात त्याची उपयुक्तता कमी होते. अनेकदा भाज्या घाणेरडय़ा पाण्यात धुतल्या जातात. शक्यतो पालेभाज्या घेताना विशेष काळजी घ्यावी. कारण त्यांचे आयुष्य अल्पजीवी असते. त्या भराभर वाढतात. सांडपाण्यातून पारा, शिसे, लोह असे शरीराला घातक पदार्थ त्या शोषून घेतात. त्यामुळे आपल्या गरजेपुरती लागणारी पालेभाजी शक्यतो घरीच पिकवावी. गॅलरीत, गच्चीत, छोटय़ा जागेत आपण आपल्या कुटुंबापुरती पालेभाजी वाढवू शकतो.

गॅलरीत भाजीपाला पिकविण्यासाठी किमान चार तास सूर्यप्रकाश आणि स्वत:चा किमान अर्धा तास वेळ हे दोन घटक आवश्यक असतात. भाजीपाला उत्पादनाचे तीन टप्पे आहेत. १. कुंडी भरणे. २. हंगामानुसार योग्य भाजीचे बीजारोपण करणे ३. भाजीचे पोषण व संरक्षण करणे.

ज्यात आपण भाजीपाला लागवड करणार आहोत, त्या कुंडीची अथवा पिशवीची उंची किमान एक फूट असावी. त्यात माती भरताना तळाशी भोके पाडावीत. त्यावर विटांचे तुकडे टाकून मग हळूहळू कुजणारे सेंद्रिय घटक टाकावेत. उदा. नारळाच्या शेंडय़ा, उसाचे चिपाड (रसवंतीगृहात मिळेल), सुका पालापाचोळा इ.ने कुंडीचा अर्धा भाग भरावा. त्यावर पावभाग मातीचा थर व नंतर शेणखत, कंपोस्टखत, गांडुळ खत (जे उपलब्ध होईल ते) सर्व मिश्रण कुंडीत दाबून भरावे. त्यानंतर त्यावर पाणी टाकावे. दोन दिवसांनंतर त्यात बिया टाकाव्यात. अशा प्रकारे आपण घरच्या घरी वेगवेगळ्या पालेभाज्यांची लागवड करू शकतो.


ऋतुमानानुसार वेगवेगळ्या पालेभाज्यांची लागवड करता येते. उन्हाळ्यात मुळा, पालक, कोथिंबीर, माठ इ. पावसाळ्यात लाल माठ, हिरवा माठ, अंबाडी, अळू इ. तर हिवाळ्यात मेथी, करडई, चाकवत, शेपू आदी भाज्या घरच्या घरी मिळू शकतात.

साधारणत: ताटाएवढय़ा आकाराच्या कुंडीसाठी अर्धा चमचा बी पुरेसे होते. भाजेपाल्यांच्या बिया मोहरीपेक्षा बारीक असतात. पालक आणि धणे रात्रभर पाण्यात भिजत घालून सकाळी पेरावे. बिया अगदी वरचेवर अथवा खोल पुरू नयेत. मधोमध राहतील अशा बेताने त्यांची पेरणी करावी. त्यामुळे चांगले पीक येते. बी पेरणी झाल्यावर हलक्या हाताने कुंडीवर पाणी शिंपडावे. पाणी शिंपडताना त्यात शक्य झाल्यास चिमूटभर हळद व दोन चमचे गोमूत्र मिसळावे. पेरणी केल्यानंतर तीन ते चार दिवसांनंतर अंकुर येतात. बीजांकुर लहान असताना पक्षी ते खाऊन टाकण्याची भीती असते. त्यासाठी संरक्षण म्हणून कुंडीभोवती काटय़ा टोचून ठेवाव्यात. त्यामुळे पक्ष्यांची चोच बीजांकुरापर्यंत पोहोचत नाही.

पालेभाजी बोटभर उंचीची होईपर्यंत त्याला नियमितपणे संध्याकाळी पाणी घालावे. सकाळच्या वेळी जर पालेभाजी मलूल दिसली तर पाणी कमी पडतेय असे समजावे. अशा परिस्थिती पाण्याची मात्रा वाढवावी. स्वयंपाक करताना आपण डाळ, तांदूळ धुवून घेतो. ते धुतलेले पाणी असेच वाया न घालविता कुंडीमध्ये टाकावे. त्यामुळे पालेभाज्या अधिक जोमाने वाढतात.

भाजी काढताना ती शक्यतो खुडून घ्यावी. कारण त्यामुळे त्यांची मुळे कुंडीतच राहतात व जागीच त्याचे खत होते. पालक, कोथिंबीर, माठ, अंबाडी यांची पाने खुडून घेता येतात. पुन्हा एकदा त्यापासून काही प्रमाणात पाने मिळू शकतात. तीव्र उन्हाळा वगळता इतर वेळी आपण दहा-बारा दिवसांच्या अंतराने पालेभाज्यांची खुडणी करू शकतो.

साधारणत: पालेभाजीला कीड लागत नाही. एक लिटरभर पाण्यात वाटीभर ताक मिसळून ते दिल्यास पालेभाज्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचप्रमाणे एक लिटर पाण्यात चिमूटभर हळद पावडर, अध्र्या कप निरसे दूध याचे मिश्रणही पालेभाज्यांसाठी लाभदायक असते.

चिमण्या व कबुतरे कोवळी पाने कुरतडून टाकतात. त्यांच्या त्रासातून पालेभाज्यांना वाचवण्यासाठी त्यावर मच्छरदाणी घालावी. अशा पद्धतीने आपण घरच्या घरी वर्षभर ताज्या आणि सकस पालेभाज्या मिळवू शकतो.

स्रोत

No comments:

Post a Comment