गृहवाटिका : घरच्या घरी कंपोस्ट खत

आपल्या गृहवाटिकेसाठी आतापर्यंत आपण झाडासाठी घरातली योग्य जागा कुठली, कुंडी कशी असावी, माती कोणती वापरायची, झाड कसं लावायचं अर्थात कुंडी कशी भरायची , पाणी कसं आणि केव्हा घालायचं, कोणती साधने लागणार इत्यादी गोष्टी समजून घेतल्या. कुंडीतल्या मातीची क्वालिटी वाढवण्यासाठी कम्पोस्टोपयोगी पदार्थ’ उदा. फळे, भाज्या यांच्या साली, डेखं , बिया, खराब निघालेली भाजी, तसेच निर्माल्य म्हणजे सुकलेली फुले, पाने, इत्यादी कसे वापरायचे हेही समजून घेतलं.

सर्व कुंडय़ांमध्ये कम्पोस्टोपयोगी पदार्थ घालूनसुद्धा जर घरात कम्पोस्टोपयोगी पदार्थ उरत असतील तर कंपोस्ट तयार करण्यासाठी वेगळी कुंडी करावी. या कुंडीला आपण खतकुंडी म्हणूया !

खतकुंडीसाठी शक्यतो मातीची आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी चांगली भोकं असलेली कुंडी वापरावी. प्लास्टिकची कुंडीपण आपण वापरू शकतो. मात्र तिला सर्व बाजूंनी चांगली भोके पाडून घ्यावी. मातीची कुंडी किंवा प्लास्टिकची जास्तं भोकं असलेली कुंडी घेण्यामागचे कारण म्हणजे खताच्या कुंडीत भरपूर हवा खेळणं आवश्यक आहे. निवडलेल्या कुंडीला आतून नायलॉनच्या बारीक जाळीने कव्हर करावे. डास न येण्यासाठी वापरतात ती जाळी योग्य आहे. जाळी सरकू नये म्हणून जाळीचा काही भाग सर्व बाजूने कुंडीच्या बाहेर काढून तो कुंडीला बांधून घ्यावा .

खतकुंडीत तयार होणारे कीटक, गांडुळे बाहेर येण्याची शक्यता जाळीमुळे पूर्णपणे नाहीशी होते. त्यामुळे खतकुंडीतून कीटक, गांडुळे बाहेर येतील की काय ही शंका उरत नाही . आतल्या बाजूने नायलॉनच्या जाळीने आच्छादलेल्या खतकुंडीत, ‘कुंडी भरताना’ जसा नारळाच्या शेंडय़ांचा थर सर्वात खाली दिला, तसा नारळाच्या शेंडय़ांचा जाड थर सर्वात खाली द्यावा. त्यावर माती आणि शेणखत या मिश्रणाचा पातळ थर द्यावा. शेणखत नसल्यास फक्त मातीचा थर द्यावा. अशावेळी एखाद्या मोठय़ा वृक्षाखालची, जिथे जास्त झाडझूड होत नाही, अशी माती वापरावी. कारण अशा मातीत गांडूळांची अंडी असण्याची शक्यता जास्त असते. शेणखत किंवा गांडूळयुक्त माती नसेल तर जी असेल त्या मातीचा पातळ थर द्यावा.

खतकुंडीसाठी शक्यतो मातीची आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी चांगली भोकं असलेली कुंडी वापरावी.

झाडं असलेल्या सर्व कुंडय़ांमध्ये कम्पोस्टोपयोगी पदार्थ घालून उरलेले कम्पोस्टोपयोगी पदार्थ या कुंडीत टाकावे. खतकुंडीला सुद्धा पाणी घालावं. म्हणजे टाकलेले सर्व कम्पोस्टोपयोगी पदार्थ ओले होतील . ही कुंडी उघडी असलेली चांगली. झाकण ठेवायचं असल्यास तारेची मोठी जाळी ठेवावी. कम्पोस्टोपयोगी पदार्थ टाकल्यावर त्यावर माती टाकू नये. घरातील रोजचे कम्पोस्टोपयोगी पदार्थ टाकून कुंडी हळूहळू भरेल. केव्हाही पदार्थ वर खाली करू नयेत किंवा उकरू नयेत. अशाप्रकारे कंपोस्ट तयार करत असतांना काहीही वास, घाण येत नाही. त्याबद्दल निश्चिंत असावे.

३ माणसांच्या कुटुंबात, १ फूट व्यास आणि १ फूट उंचीची खतकुंडी भरण्यासाठी तीन ते चार महिने लागतात. चार महिन्यांनी सुरुवातीला टाकलेल्या कम्पोस्टोपयोगी पदार्थाचे कंपोस्ट मध्ये रुपांतर झालेले असते . कंपोस्ट खत कुंडीतून काढायच्या चार-पाच दिवसआधी कुंडीत पाणी घालू नये किंवा नवीन पदार्थही कुंडीत टाकू नयेत. खत काढायच्या वेळी, प्रथम वरचे न कुजलेले पदार्थ बाहेर काढावेत. एक थर काढल्यावर जरा थांबावे म्हणजे तिथल्या कीटकांना खाली जायला वेळ मिळेल. नंतर पुढचा थर काढावा. न कुजलेले पदार्थ संपल्यावर, काळ्या रंगाचा थर दिसेल. हा थर म्हणजे कुजून तयार झालेल्या मातीचा अर्थात कंपोस्टचा. सगळ्यात खालच्या थरात भरपूर कीटक व गांडुळे असतील . हा थर तसाच ठेवावा आणि सुरुवातीला बाहेर काढलेले न कुजलेले पदार्थ परत कुंडीत घालावे. घरी तयार केलेल्या कंपोस्टचा आनंद नक्कीच घेऊन बघा .

स्रोत

No comments:

Post a Comment