गांडूळ खत कसे तयार करावे ?

आपण कंपोस्ट खत तयार करण्याची पद्धत पाहिलेली आहे. आता सर्वत्र चर्चेला असलेले गांडूळ खत म्हणजे काय आणि ते कसे करावे हे बघणार आहोत. गांडूळ खत तयार करण्यासाठी शेड तयार करण्याचा सल्ला दिला जात असतो. ज्यांच्याकडे शेड घालण्यासाठी खर्च करण्याची ऐपत असेल त्यांनी पत्र्याचे किंवा तसले मजबूत शेड तयार करायला काही हरकत नाही. परंतु गांडूळ खत तयार करण्यासाठी शेड आवश्यक नाही. गांडुळाला उन्हापासून त्रास होतो म्हणून त्याला सावली पाहिजे आहे. ती छपराने सुद्धा देता येते. साधे कुडाचे शेड जरी केले तरी गांडूळ खत तयार करण्यात काही अडचण येत नाही. या छपराखाली आपल्या गरजेनुसार एक मोठा गादी वाङ्गा करावा आणि त्यात गांडूळ सोडून द्यावेत. या गांडुळांना खायला काही तरी देत रहावे. म्हणजे त्या वाफ्यावरच त्या खाल्लेल्या वस्तूपासून ती गांडुळे खत तयार करत राहतील. हेच गांडूळ खत होय. या वाफ्यावर पाचट किंवा गव्हाचे काड असे आच्छादन टाकावे. म्हणजे गांडुळाला उन्हापासून आणखी संरक्षण मिळेल. या वाफ्यावरच्या गांडुळाला खायला काय दिले पाहिजे ? आपल्या शेतातल्या खताच्या खड्ड्यातील ७० टक्के पर्यंत कुजलेला कचरा त्याला दिला तरी चालतो. किंवा त्याला खायला सोपा जाईल असा हलका सेंद्रीय कचरा दिला तरी ते तो कचरा खाऊ शकते.

आपल्या शेतामध्ये खुल्या जमिनीत सुद्धा गांडूळ असतातच आणि ते शेतातले खत, कचरा सारे काही खाऊन त्याची विष्ठा शेतात टाकत असतातच. परंतु शेतातली ओल कायम टिकत नसते. जस जशी जमिनीची ओल कमी होत जाईल तस तशी गांडुळांची संख्या घटायला लागते. मोठ्या प्रमाणावर गांडूळ मरतात. गांडूळ साधारणपणे सात ङ्गूट खोलीपर्यंत जाऊन राहतात. परंतु त्याही खोलीपर्यंत ओल टिकली नसेल तर गांडूळ मरून जातात. त्यामुळे शेताच्या ऐवजी असा विशेष वाङ्गा तयार करून तिथे खत तयार केले म्हणजे खत तयार करण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू राहते. या वाफ्यामध्ये आपण आवश्यक तेवढी ओल टिकवू शकतो. एकदा अशा वाफ्यात थोडी गांडुळे सोडली तरी काही दिवसात त्यांची संख्या प्रचंड वाढते. एक गांडूळ वर्षाला साधारणत: ४ हजार पिली तयार करते. त्यातली काही मेली तरीही ही संख्या प्रचंड आहे. तेव्हा एकदा गांडूळ खत तयार करायला सुरुवात केली की, त्यांना भरपूर खाद्य देता आले पाहिजे. खाल्लेल्या वस्तूचे खत तयार करण्याची त्याची क्षमता अफलातून असते.


एका पूर्ण वाढलेल्या गांडुळाचे वजन १० ग्रॅम असते आणि ते आपल्या वजनाएवढी माती खात असते. त्या मातीतला दहा टक्के अंश त्याला अन्न म्हणून उपयोगी पडतो मात्र बाकीचा ९० टक्के मातीचा अंश ते अन्नाचे पचन करणारा एक घटक म्हणून ते पोटात घेत असते. या पचनाच्या प्रक्रियेत मातीवर काही संस्कार होतात आणि एका गांडुळाच्या वजनाच्या ९० टक्के एवढी खतवड माती त्याच्या पोटातून बाहेर पडते. या प्रक्रियेमध्ये मातीचे रुपांतर खतवड मातीत होते. एका एकरामध्ये साधारण एक लाख गांडुळे असतील तर त्यांच्या पचनाच्या प्रक्रियेतून १२० टन खतवड माती निर्माण होत असते. हा झाला शेतातला हिशोब. परंतु आपल्या गादी वाफ्यावर म्हणजेच गांडूळ खत तयार करण्याच्या युनिटमध्ये दहा-बारा हजार तरी गांडुळे तयार होऊ शकतात. त्यांच्या वजनाच्या दहा टक्के एवढे अन्न आपण त्यांना पुरवले तर या गादी वाफ्यावर १२ टन खतवड माती वर्षाला तयार होते. दर तीन-चार महिन्यांनी या गांडूळ निर्मिती प्रकल्पातील माती चाळून काढावी. त्यासाठी वाळूची चाळणी वापरली जाते. चाळणीतून खाली पडलेली माती म्हणजेच गांडूळ खत. ही माती गांडूळ खत म्हणून विकली जाते. ती शेतात टाकली जाते. या चाळणीत वर राहिलेली गांडुळे पुन्हा गादी वाफ्यावर सोडावीत. खाली राहिलेली माती म्हणजे गांडूळ खत चाळून काढल्याबरोबर शेतात टाकावे. त्यात गांडूळाची अंडी असतात आणि ती मरण्याच्या आत हे खत शेतात टाकले की, शेतामध्ये गांडुळाची वाढ व्हायला मदत होते. सेंद्रीय शेतीचा आता बर्‍यापैकी प्रचार झालेला आहे. शेतकर्‍यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटायला लागले आहे आणि सेंद्रीय खते, तणनाशके, संजीवके, जैविक पीकनाशके यांचा वापर सुद्धा वाढत चालला आहे. या सार्‍या गोष्टींचा विचार करून काही धंदेवाईक लोकांनी सेंद्रीय खते तयार करून ती विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे आणि बरेच शेतकरी ती खते विकत घ्यायला लागले आहेत.

सेंद्रीय शेती हा शेतीतले उत्पादन खर्च कमी करण्याचा एक प्रभावी इलाज आहे. ही खते शेतात वाया जाणार्‍या काडी-कचर्‍यापासून आणि शेणा-मुतापासून तयार केलेली असावीत असे गृहित धरलेले आहे. आपल्या शेतातला काडी-कचरा वाया घालवून आपण लोकांच्या काडी-कचर्‍याचे तयार केलेले सेंद्रीय खत वापरत असू तर आपले उत्पादन खर्च वाढणार आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे सेंद्रीय खत हे आपण आपल्या शेतात स्वत:च तयार केलेले असले पाहिजे. एवढेच नव्हे तर ते सेंद्रीय खत कमीत कमी खर्चात कसे तयार होईल याबाबतही शेतकर्‍यांनी दक्ष असले पाहिजे.

स्रोत

No comments:

Post a Comment