पाचटापासून गांडूळ खत कसे तयार करावे?

  • जागेची निवड व शेड उभारणी :-
गांडूळ खतनिर्मितीसाठी खड्ड्यावर दिवसभर सावली राहण्यासाठी छप्पर करावे. त्याकरिता शेतावर उपलब्ध असणार्‍या वस्तू बांबू, लाकडे, उसाचे पाचट यांचा वापर करावा. त्याची मधील उंची ६.५ फूट; बाजूची उंची ५ फूट व रुंदी १० फूट असावी. छपराची लांब आपल्याकडे उपलब्ध असणार्‍या उसाच्या पाचटानुसार कमी-जास्त होईल. अशा छपरामध्ये मध्यापासून १-१ फूट दोन्ही जागा सोडून ४ फूट रुंदीचे व १ फूट उंचीचे दोन समांतर वाफे वीट बांधकाम करून तयार करावेत व आतील बाजूने प्लॅस्टर करावे. तसेच खालील बाजूस कोबा करून घ्यावा. जादा झालेले पाणी जाण्यासाठी (व्हर्मीवॉश) तळाशी पाइप टाकावा. वाफे तयार करण्याची दुसरी पद्धत म्हणजे वाफे जमिनीच्या वर बांधण्याऐवजी ८-९ इंच खोलीचे दोन समांतर चर काढावेत. खड्यातील माती चांगली चोपून टणक करावी.

  • पाचट कुजविणे :-
छपरामध्ये खोदलेल्या चरांमध्ये अथवा वीट बांधकाम केलेल्या टाकीमध्ये उसाचे पाचट भरावे व त्याची उंची जमिनीपासून/वीट बांधकामापासून २०-३० सेंमी ठेवावी. पाचट भरताना एक टन पाचटासाठी युरीया ८ किलो, सिंगल सुपर फॉस्फेट १० किलो व ताजे शेणखत १०० किलो वापरावे. या सर्वांचे पाण्यात मिश्रण करावे. पाचटाला ५-१० सेंमी थर दिल्यानंतर त्यावर शेणखत, युरीया, सुपर फॉस्फेट द्रावणास पातळ थर द्यावा. याचबरोबर पाचट कुजविण्याची प्रक्रिया लवकर होण्यासाठी पाचट कुजविणारे संवर्धक एक टनास एक किलो या प्रमाणात प्रत्येक थरावर थोडेसे वापरावे. अशा पद्धतीने खडा/वाफा भरल्यानंतर त्यावर पुरेसे पाणी मारावे व पाण्याने भिजवून घेतलेल्या पोत्याने झाडून टाकावे. दररोज त्यावरती पाणी मारण्याची दक्षता घ्यावी. असे एक महिना पाणी मारल्यानंतर पाचट अर्धवट कुजलेले दिसेल. शिवाय उष्णता कमी झाल्याचे आढळून येईल. असे अर्धवट कुजलेल्या एक टन पाचटासाठी २,००० हसिनिया फोटेडा जातीची गांडुळे सोडावीत. गांडूळ सोडल्यानंतर सर्वसाधारणपणे २.५ ते ३ महिन्यांनी उसाच्या पाचटापासून उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार झाल्याचे दिसेल.


  • गांडूळ खत तयार झाल्याची चाचणी :-
    १) सर्व पाचटापासून अंडाकृती लहान विफेच्या गोळ्या झाल्याचे दिसून येते.
    २) गांडूळ खताचा सामू सातच्या दरम्यान असतो.
    ३) गांडूळ खताचा वास हा पाणी दिल्यानंतर मातीचा वास येतो तसा येतो.
    ४) खताचा रंग गर्द काळा असतो.
    ५) कार्बन : नायट्रोजन गुणोत्तर १५-२०ः१ असे असते.
  • चांगले गांडूळ खत :-
    १) कार्बन नायट्रोजन गुणोत्तर १६ः१
    २) नत्र प्रमाण २.४९ ते ३.५९%
    ३) स्फुरद प्रमाण ०.८९ ते २.२८%
    ४) पालाश प्रमाण ०.४४ ते ८.२१%
    ५) सेंद्रिय कार्बन २३%

 याशिवाय नत्र, स्फुरद स्थिर करणारे जिवाणू तसेच बुरशी असते. गांडूळ खताचे फायदे :-
      १) जमीन : – जमिनीचा पोत सुधारतो. पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते. जमिनीत हवा खेळती राहते. जमिनीचा सामू सातच्या आसपास योग्य पातळीवर राखला जाते. जमिनीची धूप व बाष्पीभवन कमी होते.
२) झाडे व किडे : – पिकांना सर्व प्रकारचे अन्नघटक सहज व योग्य प्रमाणात उपलब्ध होतात. पिकांची जोमदार वाढ होऊन कीड व रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. मिळालेल्या उत्पन्नाचा दर्जा उत्तम प्रतीचा असतो. फुले, फळे, भाजीपाला यांची टिकाऊ क्षमता वाढते. त्यामुळे दूरवरच्या बाजारपेठांत माल पाठविणे शक्य होते.
     ३) शेतकरी :- जमिनीचा पोत सुधारल्याने उत्पादन वाढते. पाण्याची बचत होते. त्यावर येणारा खर्चही वाचतो. उत्पादित मालाचा दर्जा चांगला असल्याने बाजारभाव चांगला मिळतो.
४) पर्यावरण :- पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते.
५) देश :- रासायनिक खते आयातीसाठी येणारा खर्च कमी होतो. प्रदूषणविरहित मालास परदेशात मागणी असल्याने परकीय चलनही मिळते.

स्रोत

No comments:

Post a Comment