निसर्गाची माया

पुण्यातील मध्यवर्ती भागातील इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सुनील-प्रिया भिडे या दाम्पत्याने हिरवीगार बाग फुलवली आहे. गेल्या वर्षी केळीच्या एका घडाला ८८ केळी लागली आणि भोपळ्याच्या नाजूकशा वेलीला ५० भोपळे लगडले. आवळा घेऊन कोहळा देणारी ही निसर्गाची माया त्यांनी आपल्याबरोबरच परिसरातील लोकांमध्येही मुरवली आहे, या दाम्पत्यांविषयी..

पुण्यातील डेक्कन जिमखाना या वलयांकित परिसरात, मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका देखण्या इमारतीमधील पाचव्या मजल्यावरील घरालगतच्या गच्चीत रोज संध्याकाळी चुलीवर स्वयंपाक होतो, यावर तुमचा विश्वास बसेल? भुवया उंचावतील अशी इथली दुसरी वस्तुस्थिती म्हणजे या घराने आजपावेतो दूरचित्रवाहिनीचं दर्शन घेतलेलं नाही. याउपर त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित होणारी आणखी एक गोष्ट म्हणजे या घरातील उच्च शिक्षण घेणाऱ्या दोघी महाविद्यालयात जातानाही कापडी पिशव्या घेऊन जातात.

या पर्यावरणप्रेमी घरातील चारही सदस्य कायम लक्षात राहतील असेच. कुटुंबप्रमुख सुनील भिडे यांची पदवी चार्टर्ड अकाउंटंट, व्यवसाय जमीन व्यवहारात कायदेशीर सल्ला देण्याचा आणि आवड झाडा-माडांची. त्यांच्या पत्नी प्रिया भिडे या फिजिओथेरपिस्ट. पुण्यातील विशेष मुलांसाठीचं पहिलं उपचार केंद्र यांनी सुरू केलं. हे क्लिनिक २० र्वष समर्थपणे चालवल्यावर पुण्यातील ‘निवारा’ या स्वयंसेवी संस्थेला देऊन त्यांनी मुलींच्या संगोपनाबरोबर ओल्या कचऱ्यातून सोनं पिकवण्याचं व्रत हाती घेतलं. निसर्गप्रेमाच्या संस्कारात वाढलेल्या दीपांकिता व नृपजा या त्यांच्या मुलींनी तर एक पाऊल पुढे टाकलंय. परदेशातील शेतकरी सेंद्रिय शेती कशी करतात हे शिकण्यासाठी नेटवर स्वत:च शोधाशोध करून ‘वुफ’ (wwoof) या संस्थेच्या माध्यमातून या दोघी इस्रायल व जपान येथील शेतकऱ्यांच्या घरात राहून महिना महिना त्यांच्या शेतात काम करून आल्यात.

भिडे कुटुंब राहात असलेली ‘२१ हार्मनी’ ही ५ मजली इमारत सुनील भिडे यांनीच उभी केली. बांधकाम करताना घराचं ग्रीन हाउस करण्यासाठी घ्यावी लागणारी सर्व दक्षता त्यांनी काटेकोरपणे घेतली. त्यानंतर सुरू झाला एक जल्लोश निसर्गाचा.. पालापाचोळ्यापासून सुपीक जमीन बनवण्याचा.. त्यावर आजूबाजूच्या काँक्रीटच्या जंगलात उठून दिसेल अशी हिरवी गच्ची फुलवण्याचा.

प्रिया भिडे म्हणाल्या, ‘‘आमच्या परिसरात आंबा, फणस, जांभूळ, वड, अशोक, रिठा, शिरीष, पर्जन्यवृक्ष, काटेसावर, महागोनी असे विविध जुने वृक्ष आहेत. नोव्हेंबर सुरू झाला की ही झाडं सुकलेल्या पानांचा भार खाली उतरवायला सुरुवात करतात. हे ‘वस्त्रहरण’ एप्रिलपर्यंत सुरू असतं. खाली पडलेली ढीगभर पानं एकतर जाळली जातात किंवा गोळा करून महानगरपालिकेच्या कचरापेटीत फेकली जातात. हे थांबवण्यासाठी मी आजूबाजूच्या सोसायटय़ांमध्ये, बंगल्यांमध्ये जाऊन हा सुक्या पानांचा कचरा साठवून ठेवण्याची विनंती केली. त्यासाठी त्यांना पोती नेऊन दिली. त्यांनी दिलेल्या सहकार्यातून उतराई होण्यासाठी केळी, दुधी, शेवग्याच्या शेंगा, अळू, टोमॅटो असं जे जे या कचऱ्यातून पिकलं ते ते आठवणीने नेऊन दिलं. माझ्या या कळकळीच्या प्रयत्नांना हळूहळू यश आलं. आता निरोप येतात, पोती भरून तयार आहेत, या. मी लगेच गाडी घेऊन जाते आणि तो मूल्यवान ऐवज घरी आणते. या देवघेवीमुळे नव्या मैत्रिणी मिळाल्या हा आणखी एक फायदा..’’ प्रिया भिडे म्हणाल्या की बागकामाची आवड आम्हा दोघांनाही होती/आहे. शिवाय वैज्ञानिक दृष्टीही. त्यातूनच सुनीलनी प्रयोग सुरू केले आणि त्या प्रयोगांना कृतीत उतरवण्याची जबाबदारी मी घेतली. एकूणच कुटुंब रंगलंय पर्यावरणप्रेमात..अशी स्थिती झाली.


सुक्या पानांचा कचरा जिरवण्यासाठी भिडे दाम्पत्याने प्लॅस्टिकची / पत्र्यांची पिंप, मोठाले प्लॅस्टिकचे क्रेट, कुंडय़ा, रंगाचे डबे, बाटल्या, सिमेंटचे दोन विटांचे वाफे..अशा विविध साधनांचा उपयोग केलाय. जुन्या, वाया गेलेल्या सोलर पॅनेलचे आयताकृती कंटेनरही पोटात वाळकी पानं घेऊन गच्चीत विसावलेत. पुनर्वापर व पुननिर्मिती (Reuse & Recycle) हे तत्त्व. साठवलेल्या कोरडय़ा पाचोळ्यात भाजीवाल्यांकडून आणलेला खराब भाजीपाला व कोकोपीट (नारळाच्या शेंडय़ाचा भुगा) घालण्यात येतं. त्यावर शेणाचं पाणी शिंपडत राहायचं. शिवाय कृषी विद्यापीठाकडून मिळणारं कल्चर (विरजण), रॉक फॉस्फेट व घरचं गांडूळखत त्यात मिसळलं की होम मेड खत तयार. या खजिन्यातून भिडय़ांच्या गच्चीत आवळा, केळी, डाळिंब, चिकू, लिंबं, तुती, बकुळ अशी मोठमोठी झाडं बहरलीयत. शेपू, पालक, लेटय़ूस.. अशा पालेभाज्यांसाठीही एक वाफा सज्ज आहे. झालंच तर मिरची, भेंडी, वांगी, तोंडली, दुधी, दोडका, पापडी, घोसाळी..अशा भाज्या एकआड एक करून देता ‘घेशील किती दो कराने’ म्हणत पालनकर्त्यांच्या ओंजळीत भरभरून दान देताहेत.

मी जानेवारीच्या सुरुवातीला त्यांची बाग बघायला गेले तेव्हा घडानी लगडलेले लालबुंद टोमॅटो, तुकतुकीत जांभळ्या रंगाच्या वांग्यांचे सतेज गुच्छ, गुटगुटीत रताळी, दळदार लिंब, मोहरीच्या तजेलदार शेंगा..असा नजराणा बघून डोळ्यांचं पारणं फिटलं. प्रिया भिडे सांगत होत्या, ‘‘या वर्षी ३ वाटय़ा मोहरी मिळाली. त्याच्या जोडीला आवळे होतेच. मस्त लोणचं झालं..’ गेल्या वर्षी तर त्यांच्या केळीच्या एका घडाला तब्बल ८८ केळी लागली आणि भोपळ्याच्या नाजूकशा वेलीला ५० भोपळे लगडले. आवळा घेऊन कोहळा देणारी ही निसर्गाची माया बघताना / ऐकताना मन भरून आलं.

भिडय़ांनी एका भाजीवाल्याशी मैत्र जुळवलंय. तो दर २ ते ३ दिवसांनी फ्लॉवर/ केळीचा पाला, खराब टोमॅटो, वाया गेलेल्या पालेभाजी, कोथिंबिरीच्या गड्डय़ा, नारळाच्या शेंडय़ा..याचं पोतं घेऊन येतो आणि या अन्नपूर्णेकडून मधून-मधून मिळणारी हिरवी माया त्याच ममतेने लोकांना वाटून टाकतो. नारळाच्या शेंडय़ा व वाळक्या फांद्या या इंधनावर भिडय़ांची गच्चीतली चूल पेटते. एकदा तर भिडय़ांनी मासळी बाजारातून माशांची डोकी, शेपटय़ा, पर..असा ८०/८५ किलोचा फेकलेला माल आणला आणि पक्क्या शाकाहारी असलेल्या प्रियाताईंनी आपल्या बाळांचा तो खाऊ, अत्यंत प्रेमाने वाळक्या पानांवर पसरला.

सध्या तरी त्यांनी संपूर्ण गच्चीभर पालापाचोळ्यांचं आच्छादन घातलंय. त्यामुळे उन्हाने गच्ची तापणं बंद झालंय. गच्चीवरील झाडांना घातलेलं पाणी ही वाळकी पानं शोषून घेताहेत. त्या ओलाव्याने या ग्रीन सॉइलखालील गांडुळांची प्रजाही जोमाने वाढतेय. म्हणजे आंधळा मागतो एक डोळा.. असंच काहीसं. जास्तीची वाळलेल्या पानांची पोती भिडे आपल्या तळेगावच्या छोटय़ाशा फार्मवर नेतात. तिथल्या मुरमाच्या जमिनीने हे टॉनिक मिळाल्याने गेल्यावर्षी एक पोतभर आंबेमोहर पिकवलाय.

आपली गच्चीवरची बाग सुजलाम् सुफलाम् राहावी म्हणून सुनील भिडे यांचे सतत नवनवे प्रयोग सुरू असतात. प्रा. दाभोळकर यांच्या ‘विपुलात सृष्टी’ या पुस्तकात त्यांनी वाचलं की ‘कोणत्याही अंकुरात कमालीची सृजनशक्ती असते. बागेतील तणही याला अपवाद नाही. लगेचच आपल्या बागेतली तणामधली संहारकशक्ती ‘संजीवक’ बनवण्याचा त्यांनी प्रयोग केला. यासाठी ते तण १० दिवस पाण्यात कुजवलं आणि ते पाणी झाडांना दिलं. त्यामुळे सलायन मिळाल्यासारखी झाडं तरारली. वर बोनस म्हणजे बाकी लगादाही खताच्या कामी आला. वाया गेलेल्या पाण्याच्या अथवा ड्रेनेजच्या आडव्या पाइपमध्ये ओल्या खताची माती भरून प्रत्येक सांध्यातून रंगीबेरंगी फुलझाडांचा ताटवा फुलवण्याची कल्पनाही त्यांचीच.

त्यांच्या घरालगतल्या गल्ल्यांमधूनही अनेक चमत्कार बघायला मिळतात. ग्रीन कूलर नावाच्या रचनेत खालच्या गोलाकार टँकमध्ये मासे सोडलेत. त्यांच्या वावराने समृद्ध झालेलं पाणी मधल्या पाइपमधून वर चढून भोवतालच्या तीन बास्केटमधल्या शोभेच्या झाडांना सदाहरित ठेवतंय. शेजारच्या कुंडीतील मघई पानाची वेल अशी फोफावलीय की एकेका पानाचा आकार दोन तळहातांएवढा झालाय. भिडय़ांच्या या बागेत पक्ष्यांच्या चार पिढय़ा राहून गेल्यात. आम्हालाही पिटुकला सनवर्ड आणि तगडय़ा भारद्वाजने दर्शन देऊन उपकृत केलं.

प्रिया भिडे यांचं पर्यावरणप्रेम फक्त आपल्या कुटुंबापुरतंच मर्यादित नाही, तर आजूबाजूला राहणाऱ्या सुमिता काळे, सुषमा दाते, नीलिमा रानडे..अशा काही उच्चशिक्षित मैत्रिणींसह त्यांनी डेक्कन जिमखाना परिसर समितीची स्थापना केलीय. या समितीचा मोठा विजय म्हणजे कचऱ्याने अव्याहत वाहणाऱ्या डेक्कन जिमखाना कॉर्नरवरच्या दोन पेटय़ा त्यांच्या भगिरथ प्रयत्नांनी तिथून उठल्या आहेत. हा परिसर कचरामुक्त व्हावा म्हणून आजूबाजूच्या नागरिकांना ओल्या सुक्या कचऱ्याच्या वर्गीकरणाची पद्धत लावून देण्यासाठी सुखवस्तू महिलांनी जे श्रम घेतलेत त्याला तोड नाही. कचराकुंडय़ा उठल्यावरही पुढचे काही महिने त्यांची राखण सुरू होती.

समान आवडीमुळे आता या मैत्रिणींचा छान फेसबुक ग्रुप बनलाय. त्यातून एखाद्या रविवारी फग्र्युसन कॉलेज रोड, वेताळ टेकडी..इत्यादी प्रभागांची स्वच्छता, सणाच्या दिवशी चितळ्यांच्या दुकानापाशी उभं राहून, घरी जुन्या साडय़ा/ ओढण्यांपासून बनवलेल्या कापडी पिशव्या घेण्यासाठी ग्राहकांना उद्युक्त करणं..असे उपक्रम चालतात.

जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे.. हा भिडे दाम्पत्याचा मंत्र आहे. यासाठी त्यांनी शनिवारचा दिवस राखून ठेवलाय. ‘गच्चीवरील बाग वा कचऱ्यातून सोनं’ अशा विषयांवर बोलण्यासाठी त्यांना अनेक ठिकाणांहून आमंत्रणं येतात. संपूर्ण कुटुंबाची पर्यावरणविषयक आस्था त्यांच्या शब्दाशब्दांतून ऐकणाऱ्याच्या हृदयाचा ठाव घेते. वाटतं ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे..’ या संत तुकारामांच्या अभंगाचं तुम्ही-आम्ही गाणं केलंय तर भिडे कुटुंबाने जीवनगाणं!

प्रिया भिडे/ सुनील भिडे
०२०-२५६७४८३४/ ९९२२१४६५५५


स्रोत: लोकसत्ता

No comments:

Post a Comment