निसर्ग : वृक्षोपनिषद २

ह्या लेखाचा पहिला भाग इथे

वृक्षांचे महत्त्व संतांनीही जाणले होते. प्राचीन काळी तपस्वी, ऋषी-मुनी घनदाट जंगलात आश्रम उभारून वास्तव्य करीत. त्यांना ‘तपोवन’ म्हणत. आपल्या संस्कृतीतही ‘वानप्रस्थाश्रम’ सांगितला आहे. वयाच्या ५० ते ७५ वर्षे कालावधीसाठी ज्यात अरण्यात वास करून राहण्याचा संदेश आहे. पुराणात तसेच महाभारतात काही त्या वेळची महावने उल्लेखलेली आहेत ज्यात श्रीकृष्णाने, पांडवांनी व अन्य महात्मे, संत, तपस्वी यांनी वास्तव्य केले होते. ही महावने राजेमहाराजे वन्यप्राणी शिकारीसाठी वापरत, तसेच वनविहारासाठी. स्वच्छ सूर्यप्रकाश नैसर्गिक कंदमुळे फळफळावळे, शुद्ध हवा, पाणी, निर्झरांचे झुळझुळ वाहणारे प्रवाह. पशुपक्ष्यांचे आवाज इ. इ.मुळे मन-तन प्रसन्न ताजेतवाने होत असे. वृक्षांची अमाप संख्या असलेली ही वने मानवाला वरदान होती. श्रीमद्भगवद्गीतेतील अध्याय १२ तला श्लोक १८ असा :-

"सम:शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयो:॥
शीतोष्णसुखदु:खेषु सम: सङ्गविवर्जित:॥"

अर्थ : "जो शत्रू मित्र आणि मान-अपमान यांविषयी समभाव बाळगतो, तसेच थंडी- ऊन, सुख-दु:ख इत्यादी द्वंदात ज्याची वृत्ती सारखीच राहते" असा स्थिर बुद्धीचा भक्तिमान परमेश्वराला (श्रीकृष्णाला) प्रिय असतो. यावरील भाष्यात ज्ञानेश्वरीत अ. १२, ओवी ९९ अशी आहे :-

"जो खांडावया घावो घाली।
कां लावणी जयाने केली।
दोघा एकचि साउली।
वृक्षु दे जैसा॥"

म्हणजे आपणास तोडण्यासाठी घाव घालणाऱ्यास तसेच आपली लागवड करणाऱ्यास, दोघांनाही वृक्ष/ झाड सारखीच सावली देते.

संत नामदेवांचाही असाच दृष्टिकोन त्यांच्या एका भजनात आहे. ते भजन असे :- (यात त्यांनी खऱ्या साधुसंतांची वृक्षाशी तुलना केली आहे.)

"जैसा वृक्ष नेणे मान- अपमान।
तैसे ते सज्जन वर्तताती।
येऊनियां पूजा प्राणी जे करिती।
त्याचे सुख चित्तीं तया नाही।
अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती।
तया न म्हणती छेदूं नका।
निंदास्तुति सम मानिती जे संत।
पूर्ण धैयवंत साधु ऐसे।
नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी।
जीवा शिवा गाठी पडुनी जाय॥"


देवांनाही वृक्ष प्रिय होते. भगवद्गीतेतल्या १५ व्या अध्यायात वृक्षाची उपमाच या संसाराला दिली आहे. संसाराला संसाररूप वृक्ष म्हटले आहे. तो श्लोक क्र. १ व २ असा आहे :

"उध्र्वमूलमध:शाखामश्वस्थं प्राहुरव्ययम्।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित॥१॥
अधश्चोध्र्व प्रसृतास्तस्य शाखा
गुणप्रवृद्धा विषयप्रवाला।
अधश्व मूलान्यनुसन्ततानि
कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके॥२॥"

अर्थ :- आदिपुरुष परमेश्वररूपी मूळ असलेल्या बह्मदेवरूपी मुख्य फांदी असलेल्या ज्या संसाररूप अश्वस्थवृक्षाला अविनाशी म्हणतात, तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली आहेत, त्या संसाररूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्त्वत: जाणतो, तो वेदाचे तात्पर्य जाणणारा आहे.॥१॥

त्या संसारवृक्षाच्या तिन्ही गुणरूप पाण्याने वाढलेल्या, तसेच विषयभोगरूप अंकुरांच्या, देव, मनुष्य आणि पशुपक्ष्यादी योनिरूप फांद्या खाली व वर सर्वत्र पसरल्या आहेत, तसेच मनुष्ययोनीत कर्मानुसार बांधणारी अहंता- ममता आणि वासनारूप मुळेही खाली आणि वर सर्व लोकांत व्यापून राहिली आहेत.॥२॥

एकंदरीत फार पूर्वीपासून वृक्षमाहात्म्य आहे. देवदेवतांनाही वृक्ष प्रिय आहेत. विशिष्ट देवतांना / देवांना विशिष्ट वृक्ष प्रिय आहेत. त्यामुळे काही वृक्ष पूजनीय वंदनीय झाले आहेत. भगवान विष्णू पिंपळवृक्षात वास्तव्य करतात. शिवशंकराला बेलाची पाने प्रिय आहेत. रुई वृक्ष मारुतीला व शनीला प्रिय, अशोकवृक्ष कामदेवास प्रिय, आवळ्याचा वृक्ष विष्णूस प्रिय, औदुंबर दत्तास प्रिय, वटवृक्ष सौभाग्यकारक, ब्रह्मतेजप्रतीक पळसास मानतात. एका पौराणिक कथेनुसार पार्वतीच्या शापाने विष्णू ‘अश्वस्थ’, शंकर ‘वड’ तर ब्रह्मदेव ‘पळस’ झाले. ‘पळसाला पाने तीनच’ अशी म्हण प्रचलित आहे. मधल्या पानात विष्णू, डाव्या पानी ब्रह्म व उजव्या पानात शिव असतात. सर्व वृक्षांत पलाश वृक्ष (पळस वृक्ष) श्रेष्ठ आहे, म्हणून मौंजीत बटूला पलाश दंड देतात. तुळस विष्णूस प्रिय. चंदनाचे गंध देवांना प्रिय असल्यामुळे त्याशिवाय पूजा होतच नाही.

आपटय़ाच्या झाडावर/ वृक्षावर कुबेराने सुवर्णमोहोरांचा वर्षांव केला म्हणून दसऱ्याला आपटय़ाची पाने सोने म्हणून वाटतात. ही प्रथा अजून आहे. आम्रवृक्ष मंगल म्हणून त्याची पाने मंगल तोरणात व कलश पूजेत वापरतात. नारळ हा तर श्रीफल म्हणून अत्यावश्यक. आम्रमंजिरीही अशाच. त्या देवांना वाहण्यास वापरतात. सुपारी तर पूजेत व ओवाळणीत मानाच्या स्थानाची. सुपारीलाच गणपती म्हणूनही पूजतात. श्रीगणेशांना शमीपत्री प्रिय. मंदारवृक्ष म्हणजे गणेशउत्पत्तिस्थानच. असे सांगतात एकवीस वर्षांनंतर मंदारमुळाशी गणेशमूर्ती तयार होते त्यास मंदार गणेश म्हणतात. रुद्राक्ष तर सर्वत्र पूजनीय व धारण करण्यास सुयोग्य. हे रुद्राक्ष शिवभक्तांना जणू चिंतामणीच. हे जपमाळेत वापरतात. रुद्राक्षजपमाळ सर्वश्रेष्ठ मानतात. तुळशीची माळ वारकऱ्यांना/ वैष्णवांना प्रिय. अनेक प्रकार आहेत. हे वृक्ष उपयोगाचे वानगीदाखल थोडे वर्णन केले आहेत. सगळेच वृक्ष पूजनीय, वंदनीय, देवदेवताप्रिय नाहीत. त्यांच्यातही आवडते नावडते आहेतच.

देवदेवतांनाच नव्हे तर भूतपिशाच्च योनींनाही वृक्ष/ काही वृक्ष आवडतात व त्या त्यावर वास करतात असा समज आहे. कोकणात हे प्रमाण समजाचे अधिक आहेत. त्यातल्या त्यात त्यांना म्हणे असुर/ दानव व मानव सर्वाचेच आश्रयस्थान तसेच अन्य सजीव पशुपक्ष्यांचेही.

समुद्रमंथनातून ‘कल्पवृक्ष’ निघाला असे पुराणे सांगतात. जे जे हवे ते ते देणारा आज पृथ्वीतलावर कोठेच नाही दिसत. तो देवलोकात नेला असे पुराणात आहे. मग पृथ्वीवरच कोठे नारळाला तर कोठे कडुनिंबाला कल्पतरू संज्ञा देतात. केरळमध्ये ‘रबर’ देणारे वृक्ष उपजीविकेचे साधन. चंदनवृक्ष देवपूजेसाठी गंधाकरता वापरतात त्याचे लाकूड. त्याचे खोड घासून गंध करतात म्हणून सज्जनांना/ सत्पुरुषांना आपण चंदनवृक्षाची उपमा देतो. अनेक प्रकारे समाजसेवा करणाऱ्या व आधार देणाऱ्या सज्जनास आधारवड म्हणतो ते या वृक्षाचे गुण प्रत्यक्ष आचरणारे म्हणूनच. हल्ली वृक्षांमध्येही संकरित करून वेगळ्या प्रकारचे गुणधर्माचे वृक्षनिर्मिती प्रयोग सुरू आहेत. त्यातून निष्पन्न काय? काळच ठरवेल. ‘‘कालाय तस्मै नम:॥’’

पंचांगातही जन्मनक्षत्रानुसार आराध्य वृक्ष दिले आहेत. यांना नक्षत्र वृक्ष म्हणतात. ते येणेप्रमाणे :-

१. अश्विनी - कुचला

२. भरणी - आवळी

३. कृत्तिका - उंबर

४. रोहिणी - जांभळी

५. मृग - खर

६. आर्द्रा - कृष्णागरु

७. पुनर्वसु - वेळू

८. पुष्य - पिंपळ

९. आश्लेषा - नागचाफा

१०. मघा - वट

११. पूर्वा - पळस

१२. उत्तरा - पायरी

१३. हस्त - जाई

१४. चित्रा - बेल

१५. स्वाती - अर्जुन

१६. विशाखा - नागकेशर

१७. अनुराधा - नागकेशर

१८. जेष्ठा - सांबर

१९. मूळ - राळ

२०. पूर्वाषाढा - वेत

२१. उत्तराषाढा - फणस

२२. श्रावण - रुई

२३. धनिष्ठा - शमी

२४. शततारका - कळंब

२५. पूर्वाभाद्रपदा - आम्र

२६. उत्तरभाद्रपदा - कडुनिंब

२७. रेवती - मोह

आजही श्रीकृष्णाचे वटपत्रावर अंगठा चोखत पडलेले बालरूपाचे चित्र पाहतो. वटपौर्णिमेला वडांना दोरा गुंडाळून महिलांच्या द्वारे पूजन पाहतो, आवळी भोजन पाहतो. आजही श्रीक्षेत्र आळंदी येथील सोनियाचा पिंपळ, अजानवृक्ष (ज्याखाली बसून ज्ञानेश्वरी वाचली तर अर्थ कळतो अशी लोकांची श्रद्धा आहे), गयेचा बोधीवृक्ष हे प्रसिद्ध आहेत.

पूर्वी माणसे आपल्या आयुष्यात काही फळवृक्ष लावून जात जे पुढील पिढीला ती तारुण्यात येई तेव्हा उपयोगी पडत (उदा. आंबा, फणस, इ. इ.). त्यांच्या जवळ दूरदृष्टी व कर्तव्यभावना होती आज परिस्थिती वेगळीच आहे. पूर्वी दंडकारण्य, खांडववन अशा महान वनराया/ वृक्षराजी होत्या. वृक्षांवर देव, संत यांनी प्रेम केले आहे. प्रेमी लोकसुद्धा भेटण्यासाठी वृक्षातळी वाट बघत. काही वृक्षांच्या सालीसुद्धा ग्रंथलेखनासाठी वापरल्या गेल्या आहेत. विविध प्रकारे हे वृक्ष मानवास ‘‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’’ उपयोगी पडत असतात.

आज मात्र विपरीत चित्र/ परिस्थिती आहे. पूर्वजांची दूरदृष्टी नाही- वृक्षलावणी व वृक्ष संगोपन, वर्धन याची. केवळ हव्यासापोटी मानवाने प्रचंड प्रमाणात वृक्षतोड केली. अनेक अरण्ये नष्ट झाली, होत आहेत. त्यामुळे पर्जन्यमान घटले, जमिनीची धूप प्रचंड प्रमाणात झाली जी वृक्षांमुळे थांबत असे. जमिनीचे वाळवंटात रूपांतर होऊ लागले. पर्यावरण तोल गेला. दुष्काळ पडू लागला. जनावरे, पक्षी यांचे आश्रयस्थान गेले. काही प्रजाती नष्ट झाल्या तर काही त्या वाटेवर आहेत. मानवाने आपल्या हाताने आपल्या पायावर आपणच कुऱ्हाड मारून घेतली. फार फार उशिराने हे लक्षात आले, आणि मग ‘‘वने वाचवा, वाढवा, लावा’’ अशी हाकाटी व क्रांतिपर्व सुरू झाले. पर्यावरण चळवळ जोर धरू लागली. ‘चिपको’सारखे आंदोलन उभे राहिले. अनेक चळवळी उभ्या राहिल्या व जोर धरू लागल्या. परिणामी नवे वनसंरक्षक, कायदे योजना सुरू झाल्या, पण हे उशिरा का होईना सुचलेले शहाणपण आहे. या सर्व योजना, कायदे यांचा वापर कसा केला जातो प्रभावीपणे हे एक प्रश्नचिन्ह. त्यामुळे त्या सर्वाचे फळ किती मिळते व त्यासाठी किती कालावधी लागेल याचे उत्तर मिळणे कठीण. शिवाय गरजा व उपलब्धता यांचे प्रमाण अति व्यस्त आहे ते एकदम कमी होणार नाही. कायदे योजना यांची भ्रष्टाचारामुळे अंमलबजावणी कितपत यशस्वी होईल व ती कितपत प्रभावी ठरेल याची शंका आहेच. जनमानसात वृक्षसंवर्धन, वृक्षारोपण व वृक्षपालन ही संस्कृती रुजली तरच हे शक्य आहे. नुसती जनजागृती नको तर सक्रिय जनसहभाग हवा तरच या योग्य गोष्टींचे/ उद्देशांचे फळ मिळेल. अन्यथा ‘‘बोलाचीच कढी, बोलाचाच भात’’ असेच चित्र दिसेल. आज काँक्रीट जंगल अधिवासी मानव वृक्षांचा मित्र खऱ्या अर्थाने कितपत होईल? ही कठीण गोष्ट आहे. कारण मानवाची शहरी जीवनप्रणाली वृक्षांविषयी उदासीनच आहे. केवळ वीकेण्डला पार्कमध्ये जाणे एवढेच त्यांच्या प्रवृत्तीत असते.

वृक्षांचे महत्त्व खेडोपाडीच्या लोकांना पटवून त्यांच्या सक्रिय सहभागानेच वृक्षवर्धन चळवळ जोर धरेल. वनराजीचा नाश केल्याने होणारे दूरगामी दुष्परिणाम पटवून देऊनच त्यांना वृक्षलागवडीसाठी प्रवृत्त करावे लागेल. कोणत्या प्रदेशात भौगोलिक परिस्थितीनुसार कोणते वृक्ष लावणे योग्य याचा (जमिनीचा पोत, पर्जन्यमान, हवामान) सम्यक अभ्यास करून तसे करणेच श्रेयस्कर.

वनराईचे वाढत्या शहरी आकाराने आकुंचन होत आहे, त्याला पर्याय शोधावा लागेल. तसेच कारखान्यांचे प्रदूषणही थांबवणे गरजेचे आहे. नवीन वनराया सुनियोजित पद्धतीने तयार कराव्या लागतील, तसेच जुन्या नष्ट झालेल्या व त्या मार्गाव्र असलेल्यांचे पुनरुज्जीवन करावे लागेल. नुसते वृक्षारोपण नव्हे तर त्याचे संवर्धन/ पालन व संरक्षण अमलात आणावे लागेल. निसर्गप्रेमी संस्था, पर्यावरणतज्ज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ, वृक्षप्रेमी यांनी एकत्र येणे व त्याचबरोबर सरकारनेही द्रव्यनिधी, भूखंड, मनुष्यबळ व अन्य सर्व मदत पुरविणे गरजेचे आहे. यासाठी एखादा मास्टर प्लॅन दीर्घ कालावधीचा करावा लागेल व त्याची सक्षम भ्रष्टाचारमुक्त कारवाई/कार्यवाही करावी लागेल तरच वने वाढतील, वृक्ष वाढतील, पर्यावरण तोल सावरेल व मानवी जीवन सुखी, समृद्ध होईल. लेखान्ती एवढेच म्हणेन ‘‘वृक्षांनी अंधकार संपून उष:काल येऊ घातलाय. लवकरच तो येवो, सूर्योदय होवो व परत पुन्हा घनदाट वनराया प्रफुल्ल स्वरूपात दिसोत, अरण्ये समृद्ध होवोत वृक्षराजीने’’ हा विश्वास व्यक्त करून हा लेख तुम्हाला व वनदेवतेला अर्पण करतो. इत्यलम्.

स्रोत

No comments:

Post a Comment