पर्यावरणस्नेही टोपलीची दुहेरी करामत

ह्या लेखाचा पहिला भाग

शहरी विभागात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करायचे ही एक मोठी समस्या असून उपलब्ध असलेली डम्पिंग ग्राऊंड्स त्यासाठी अपुरी ठरू लागली आहेत. शहराच्या विविध भागांमधून दररोज गोळा होणाऱ्या शेकडो मेट्रिक टन कचऱ्यामुळे क्षेपणभूमींवर कचऱ्याचे अक्षरश: डोंगर उभे राहिले असून त्यातून पर्यावरण आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ठाण्यातील जयंत जोशी यांनी घरातच कचऱ्याचे विस्थापन करणाऱ्या सोप्या पद्धतीचा वापर करून या समस्येवर उत्तर शोधले आहे. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ असणाऱ्या जोशींनी घरातील सर्व ओल्या कचऱ्याचे व्यवस्थित विघटन होणारी प्लास्टिकची टोपली वापरण्यास सुरुवात केली असून ती त्यांच्या घरासाठी छोटय़ा डम्पिंग ग्राऊंडचे काम करते. या कामाबद्दल ती कोणताही मोबदला घेत नाहीच, शिवाय कचऱ्यापासून बनलेले उत्तम प्रकारचे दोन-अडीच किलो खत दरमहा त्यांना देते.

जयंत जोशी गेली सात वर्षे त्यांच्या स्वयंपाकघरात सर्व ओला कचरा फस्त करणारे हे छोटे डम्पिंग ग्राऊंड वापरत आहेत. या टोपलीत नारळाची करवंटी, आंब्याची बाटी, खजूर तसेच प्लास्टिक, धातूंचे तुकडे अशा वस्तूंचा अपवाद वगळता इतर सर्व ओल्या कचऱ्याचे कोणतीही दरुगधी न पसरवता विघटन होते आणि त्यापासून उत्तम खत निर्माण होते. त्यांच्या या शून्य कचरा मोहिमेमुळे प्रभावित झालेल्या अनेकांनी त्यांचे अनुकरण करण्यास सुरुवात केली आहे.
आतापर्यंत त्यांनी अशा प्रकारे तीन हजार टोपल्या तयार करून दिल्या आहेत. चौकातल्या कुंडीत, घंटागाडीत कचरा टाकणे म्हणजे व्यवस्थापन नव्हे. मात्र शहरात सध्या अशाच प्रकारे आपल्या दारातला कचरा उचलून दुसऱ्याच्या दारात टाकला जात आहे. अशा प्रकारची टोपली वापरण्यास सुरुवात केली की मुळात घरात फारसा कचराच उरत नाही. त्यामुळे घरोघरी या शून्य कचरा पद्धतीचे अनुकरण झाल्यास कचऱ्याची समस्या आपोआप मिटेल, असा विश्वास जयंत जोशी यांनी व्यक्त केला आहे.


सध्या मुंबई-ठाणे महापालिका प्रशासन कचरा व्यवस्थापनासाठी दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च करीत आहे. तरीही कचऱ्याचे नीट विघटन होत नाही. त्यामुळे डम्पिंग ग्राऊंडशेजारी राहणाऱ्यांना दरुगधी सहन करावी लागते. डम्पिंग ग्राऊंड्सची क्षमताही संपत आली आहे. शहराजवळ डम्पिंग ग्राऊंड्ससाठी फारशा मोकळ्या जागा नाहीत. शिवाय वस्त्यांजवळ डम्पिंग ग्राऊंड करण्यास नागरिक विरोध करतात. डम्पिंग ग्राऊंडसाठी लांबवरची जागा निवडल्यास वाहतूक खर्च वाढतो. वाहतूककरताना रस्त्यात ठिकठिकाणी कचरा सांडून शहर स्वच्छताही धोक्यात येते. त्यामुळे घरच्या घरीच कचऱ्याचे विघटन करणारी ही पद्धत शहरी भागात उपयुक्त ठरली आहे.

वार्षिक दोन कोटी कचऱ्यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज ६५० मेट्रिक टन कचरा गोळा केला जातो. साधारण एक टन कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी महापालिका प्रशासनास अडीच ते तीन हजार रुपये खर्च येतो. वर्षभरात कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी दोन कोटी रुपये खर्च केले जात असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टोपली अशी वापरावी कचरा फस्त करणाऱ्या या टोपलीत ओल्या कचऱ्याचे विघटन करणारे जिवाणू असतात. टोपली शक्यतो स्वयंपाकघरात कोरडय़ा जागी ठेवावी. त्याला पाणी लागू देऊ नये. स्वयंपाकघरातील ओल्या कचऱ्यामध्ये ५० ते ९० टक्के पाणी असते. जिवाणू त्या पाण्याचे बाष्पीभवन करतात. दोन महिन्यांनंतर टोपलीच्या खालच्या भागात काळेशार खत तयार होते. ते काढून बाल्कनी अथवा टेरेसमधील झाडांना वापरता येते. त्यानंतर दर महिन्याला दोन ते अडीच किलो कचरा या टोपलीतून निघतो. भरपूर जागा असली तरी ही टोपली बाहेर ठेवू नये. कारण उंदीर-घुशी टोपली कुरतडण्याची शक्यता असते. सेवानिवृत्त असलेले जयंत जोशी आता या पर्यावरणस्नेही घरगुती डम्पिंग ग्राऊंडविषयी ठिकठिकाणी विनामूल्य व्याख्यानेही देतात.

स्रोत

No comments:

Post a Comment