फळे काढणीनंतरचे काजू बागेचे व्यवस्थापन

कोकणातील हापूस आंब्यानंतरचे महत्त्वाचे पीक म्हणजे काजू होय. शेतक-याना परकीय चलन मिळवून देणा-या या काजू पिकावर यंदाच्या हंगामात मात्र बदलत्या हवामानामुळे विपरीत परिणाम झाला.

या हंगामात जास्त काळ कमी तापमान राहिल्याने मोहोर आलेल्या ठिकाणी सयुक्त फुलांचे प्रमाण क मी राहिले व नर फुलांचे प्रमाण जास्त राहिले. यामुळे अपेक्षित फळधारणा झाली नाही. असा मोहोर मोठया प्रमाणावर सुकून गेला.

यातून शिल्लक राहिलेल्या मोहोराचा काजू हंगाम अखेरच्या टप्यात आला आहे. सध्या वातावरणामध्ये तापमान वाढल्यामुळे फळांच्या पक्वतेवर लक्ष ठेवून फळांची काढणी करणे आवश्यक आहे. जास्त तापमानामुळे फळे तडकू नयेत यासाठी जमिनीवर आच्छादन करावे.

खोडा सभोवताली पालापाचोळा टाकल्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते आणि जास्त तापमानाचा फळांवर होणारा परिणाम आपण कमी करू शकतो अशी माहिती श्री. कोकाटे यांनी दिली. तसेच शक्य असल्यास १० ते १२ लिटर पाणी प्रती झाड प्रती दिवस देणे फायद्याचे ठरेल.

फळ काढणीनंतरचे व्यवस्थापन:
फळ काढणीनंतर काजू बागेमध्ये व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. बागेमध्ये शेतक-यानी काळजी न घेतल्यास एखादे झाड पूर्णपणे मृत होऊ शकते. खोडकीड, तसेच शेंडेमरसारख्या रोगाचा वेळीच बंदोबस्त न केल्यास संपूर्ण बागच या रोगाच्या प्रादुर्भावाने नष्ट होऊ शकते.

बागेमध्ये स्वच्छता ठेवणे अतिशय आवश्यक असून ज्या ठिकाणी खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून येईल अशा ठिकाणी खोडावरील साल धारदार हत्याराने काढावी व आतमध्ये असणा-या अळ्यांचा नाश करावा. अशा झाडांच्या बुंध्यांवर क्लोरोपायरिफॉस ४ मिली प्रती लिटर पाण्यासोबत द्रावण तयार करून प्रादुर्भाव झालेला भाग चांगला भिजवून घेण्याचा सल्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्लेचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. आर. साळवी यानी दिला आहे.


बोडरेमिश्रण परिणामकारक: झाडावरील सुकलेल्या फांद्या तोडून त्या जाळाव्यात म्हणजे शेंडेमरसारख्या रोगाचा बदोबस्त होण्यास मदत होईल. अशा भागावर १ टक्का बोडरेपेस्टचे द्रावण लावावे. छाटलेल्या फांद्यांच्या भागावर बोडरेपेस्ट लावावी तसेच १ टक्का बोडरे मिश्रणाची पूर्ण झाडावर फवारणी करावी. त्यामुळे रागाचा प्रादुर्भाव होणार नाही.

ज्या झाडांकडून अपेक्षित उत्पन्न मिळत नसेल अशा झाडांना वेगळ्या पद्धतीने व्यवस्थापन करून खताची अतिरिक्त मात्रा द्यावी. बागेमध्ये कुठेही काजूची लाकडे, इतर लाकडे ढीग करून रचून ठेवू नयेत त्यामुळे रोठयाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. आग लागून कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडू नयेत यासाठी आग प्रतिबंधक १० मीटर लांबीचा मोठा पट्टा प्रक्षेत्राच्या सभोवती काढावा.

पालवी येण्यास मदत होण्यासाठी शक्य असल्यास प्रती झाडाला पाणी द्यावे. जूनच्या पहिल्या पंधरवडयात खताचे व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे डॉ. साळवी यांनी सांगितले आहे. ५ घमेले शेणखत, २ किलो युरिया, ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, अर्धा किलो मिरॅटोपोटॅश अशा प्रमाणात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने खत देणे फायद्याचे ठरेल.

मित्रानो, हाताच्या बोटावर मोजता येतील असेच शेतकरी काजू बागेचे फळे काढणीनंतरचे व्यवस्थापन काटेकोरपणे करतात. आंबा काय किंवा काजू काय ही पिके आता सर्वस्वी वातावरणावर अवलंबून राहिली आहेत. निसर्ग बदलतोय त्यामुळे मानवानेसुद्धा या प्रतिकुल परिस्थितीमध्ये हातच्या पिकासाठी काही उपाययोजना कटाक्षाने करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

कमी खर्चात जास्त उत्पन्न व आंब्याच्या तुलनेत कमी मेहनतीत मिळणारे पीक म्हणून काजूकडे पाहिले जाते. काजू झाडांचे पर्यायाने काजू पिकाचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी तसेच पुढील हंगामामध्ये चांगल्या प्रकारे काजूचे उत्पादन येण्यासाठी तज्ज्ञानी सुचविलेल्या उपाययोजना काजू बागायतदार नक्कीच करतील अशी अपेक्षा!

स्रोत

No comments:

Post a Comment