शहर शेती: झाडे लावण्याचे ‘माध्यम’

आपण झाडे वेगवेगळ्या माध्यमांतून लावू शकतो. माती, कोकोपीट, पालापाचोळा, घरातील भाज्यांचे अवशेष इ. आपण जास्त करून झाडे मातीतच लावतो. यातील मातीचा पोत, प्रकार पाहून मग त्यात मातीच्या गरजेनुसार त्यात सेंद्रिय खते, वाळू, अन्नद्रव्ये घालून तिच्यात झाडे लावली जातात.

आपल्याला जर मातीची निवड करण्याची संधी असेल तर, अशी माती निवडावी की जी पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे करते. अशी माती तपासण्याची सोपी पद्धत आहे. ओल्या मातीचा घट्ट दाबून लाडूसारखा आकार करावा व जमिनीवर सोडावा जर लाडू जमिनीवर पडून फुटला त मातीचा पोत पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे करणारा आहे आणि लाडू जर नुसता चेपला गेला तर त्यात चिकणमातीचे प्रमाण जास्त आहे असे समजावे. दुसऱ्या प्रकारच्या तपासणीत ओल्या मातीची रिबीनसारखी पट्टी करावी जर पट्टी तयार झाली व ती अखंड राहिली तर मातीची निचरा होण्याची क्षमता कमी आहे असे समजावे.जर मातीत पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होत असेल तर त्यात झाडे चांगल्या प्रकारे वाढतात. झाडांच्या मुळांच्या चांगल्या वाढीसाठी व मातीत असणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या वाढींसाठी मातीमध्ये ४५% खनिजे म्हणजे माती, ५% सेंद्रिय घटक व २५% हवा व २५% ओलावा (पाणी) आवश्यक असतो. जी पाण्याचा निचरा करते तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते.

साधारण लाल रंगाच्या मातीचा निचरा चांगला असतो, पण पोषणद्रव्ये कमी असतात. तर काळ्या रंगाच्या मातीत निचराक्षमता कमी असते, पण अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. लाल मातीत पाणी धरून ठेवण्याची व अन्नद्रव्याची गरज असते, तर काळ्या मातीत पाण्याचा निचरा वाढवण्यासाठी सेंद्रिय घटकांची आवश्यकता असते.
आपण जर लाल माती वापरणार असू तर अशा मातीत मातीचा किमान अर्धा भाग तरी कोणतेही सेंद्रिय खत उदा. शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत यांचे मिश्रण मातीत मिसळणे आवश्यक असते. तसेच जवळच्या नर्सरी किंवा कृषी केंद्रातून कोणत्याही ‘मील’ नावाचे खत उदा. स्टेरा मील, रॅली मील, बोनमील, गोदरजचे ‘विकास’ अशापैकी एखादे, कुंडीच्या आकारानुसार १०० ग्रॅम ते ५०० ग्रॅम मिसळावे. हे ‘मिल’ म्हणजे प्राणिजन्य खत असते किंवा एखाद्या पेंडी, कडुनिंबाची पेंड, करंज, एरंडाची पेंड यांपैकी कोणतीही पेंड २५० ग्रॅम मातीत मिसळावी. अशा प्रकारे मातीत आपण भरखत (सेंद्रिय-शेण, गांडूळ, कंपोस्ट खत) व जोरखत (पेंडप्रकार, ‘मील’ व विकास इ.) मिसळून त्या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता व अन्नद्रव्यांची व्यवस्था पूर्ण होऊ शकते.


जर काळी माती वापरणार असू तर त्यात अन्नद्रव्यांचे प्रमाण असते, पण पाण्याचा निचरा होण्यासाठी त्यात वाळू, लाकडाचा भुसा, भाताचे तूस, राख यांपैकी मिळेल ते मातीच्या पाव भाग मिसळावे. यामुळे मातीच्या कणांत पोकळी राहते व पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होऊ शकतो.

कुंडीत माती भरताना तिच्या तळाशी विटांचे बारीक तुकडे जे पाण्याचा निचरा करतात, पण ओलावा धरून ठेवतात. पण अधिक महत्त्वाचे म्हणजे तळातील भोकातून हवा आत येण्यासाठी विटांच्या तुकडय़ांचा उपयोग होतो. त्यावर झाडाच्या सुकलेल्या काडय़ा, नारळाच्या शेंडय़ा घालाव्यात व मग त्यावर आपण तयार केलेले मातीची मिश्रण भरावे. यात झाड लावल्यावर थोडे थोडे पाणी द्यावे. एवढेच पाणी घालावे जे कुंडीच्या तळातून बाहेर येणार नाही. भरपूर पाणी घातले तर ते वाहूनच जाईल त्याचा काही उपयोग नाही.

झाडे लावण्याच्या ‘माध्यमात’ माती ही जरी प्रामुख्याने आपण वापरत असलो तरी इतर अनेक गोष्टी झाड लावण्याचे ‘माध्यम’ म्हणून वापरू शकतो.

‘कोकोपिट’- नारळाच्या सोडणापासून (नारळाचा वरचा भाग) जेव्हा दोरखंड (काथ्या) बनवतात. तेव्हा काथ्याला ठोकून मोकळे करून लांब तूस, धागे वेगळे केले जातात. त्या वेळेस त्यांना चिकटलेले कण पावडर होऊन बाहेर पडतात त्यांना कोकोपीट असे म्हणतात. कोकोपीटमध्ये झाडे लावल्यास झाडांच्या मुळाची चांगली वाढ होते त्यांना योग्य हवा मिळते. त्याचबरोबर जास्तीच्या पाण्याचा निचरा होऊन योग्य ओलावा टिकून राहतो. हे हळूहळू होतो म्हणून सुरुवातीला अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा लागतो. हे कोकोपीट कृषी केंद्रात याचे तयार ब्लॉक्स विकत मिळतात. साधारण चार ते दहा किलोपर्यंत असतात. या विटा/ब्लॉक्स घरी आणून फोडून पाण्यात भिजत घातल्यास त्यांचे कण सुटे होतात व त्यांचे आकारमान वाढते. जास्तीचे पाणी काढून टाकावे व त्याचा जमिनीवर ढीग करावा व थोडय़ा वेळाने त्याच्या वजनाचा १० वा भाग कोणतेही सेंद्रिय जोरखत (रॅली मील, बोल मील इ.) घालावे किंवा २५ टक्के गांडूळ खत त्यात मिसळावे व हे मिश्रण कुंडीत भरून झाडे लावावीत. यात लावलेली झाडे चांगली व निरोगी वाढतात. आजकाल सर्व नर्सरीत बिया लावताना ट्रेमध्ये मातीच्या ऐवजी कोकोपीटचा वापर करतात. त्यामुळे रोपे तर चांगली उगवतात, तसेच ते वजनाला हलके होतात. ट्रान्स्पोर्टच्या दृष्टीने ते सोयीचे होते.

सुकलेल्या काडी कचऱ्याचा वापर करून आपण त्यातसुद्धा चांगल्या पद्धतीने झाडे वाढवू शकतो. सोसायटीच्या आवारात झाडांचा सुकलेला पालापाचोळा, बारीक फांद्या, काटक्या, जवळच्या गुऱ्हाळ्यात मिळणारे उसाचे पाचट, घरात आणलेल्या भाज्यांची साले, देठे इ. जेवढे हाताने बारीक करता येईल तेवढे बारीक करून कुंडीत विटांच्या थरावर दाबून दाबून बसवावे. तळाला शक्यतो जाड काडय़ा वापराव्यात. अगदी वरती साधारण उबीट मातीचा थर द्यावा. इथे मातीची अत्यल्प गरज असते. नंतर थोडे थोडे पाणी द्यावे.
काडी-कचऱ्यापासून खत करून ते झाडाला घालून झाड वाढवण्यापेक्षा, तोच पिशवीत भरून त्यात झाडे लावणे जास्त उपयुक्त असते. तसेच यामुळे घरातील किमान ५०% कचऱ्याचे व्यवस्थापन करू शकतो व झाडे लावण्याच्या छंदाबरोबर पर्यावरण सुधारण्याससुद्धा आपला हातभार लावू शकतो.

स्रोत

No comments:

Post a Comment