बागेला पाणी देण्याच्या पद्धती

बागेला पाणी देण्याच्या अनेक पद्धती आहेत. अर्थात त्याचे काही लांबचे, जवळचे फायदे तोटे आहेतच. कधी गरज, सोय असते तर कधी नाईलाजही असतो. खालील विस्तारानुसार आपण योग्य त्या पद्धतीचा अवलंब करावा. बागेला किंवा कुंडय़ांना आपण जसे पाण्याची सवय लावू त्याप्रमाणे झाडांना पाण्याचा वापर करण्याची सवय लागते. उपलब्ध पाणी किती व कसे मिळते यावर त्यांच्या बाष्पीभवनाचा वेग झाडे ठरवतात. त्यामुळे पाणी कसे व किती द्यावे हे बागेचे ठिकाण, वाऱ्याचा वेग याचा विचार करून ठरवणे योग्य असते.

बागेला (आपल्याकडे कोणत्या आकाराची आहे त्याप्रमाणे) नेहमी गरजेपुरते पाणी द्यावे. पाणी उपलब्ध आहे मग कितीही द्या असे करू नये. जमिनीवरील बागेत नियोजन करून किंवा झांडाच्या, बागेच्या गरजेचा विचार करून पाणी द्यावे अन्यथा अधिकच्या पाण्यामुळे माती सडते आणि नंतर ती अनुत्पादक होते. कुंडय़ांना पाणी देताना त्यात गरजेपुरता ओलावा राहील एवढेच पाणी द्यावे. कारण अधिकचे पाणी देण्याने कुंडीतील वाफ्यातील सूक्ष्म माती, खतातील सत्त्व हे पाण्याच्या रूपात वाहून जाण्याची दाट शक्यता असते. तसेच कुंडीतील लाल मातीचे डाग इमारतीवर ओघळलेल्या स्वरूपात दिसतात. तेव्हा गरज पडली तर दोन वेळा पाणी द्यावे पण ते गरजेपुरते देणे महत्त्वाचे आहे. जसे की उन्हाळ्यात दोन वेळेस पाणी द्यावे. हिवाळ्यात एक वेळेस पाणी द्यावे. तर पावसाळ्यात पावसाचा वेग, वेळ, प्रमाण लक्षात घेऊन पाणी द्यावे.


बरेचदा भूरभूर पडणारा पाऊस किंवा पावसाचे वातावरण असले तरी आपण बागेला पाणी देण्याचे टाळतो. पण अशा प्रकारचा पाऊस हा बागेतील, कुंडय़ाची वरवरची मातीच भिजवतो. झाडे मलूल झालेली दिसतात. अशा वेळेस बागेची पाहणी करून त्यास पाणी द्यावे. उन्हाळ्यात पाणी सूर्योदयापूर्वी द्यावे. उन्हाळ्यात वातावरणातील उष्मा लवकर जाणवतो अशा वेळेस झाडांच्या पृष्ठभागावरील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचा वेगही वाढतो. उशिरा दिलेले पाणी व वातावणातील उष्मा यांचे विषम प्रमाण झाल्यास कुंडय़ा, बाग वाफमय होते. वाफेमुळे झाडांच्या मुळांना वाफ लागून ती कोमेजून जातात. एखादे झाड कालपर्यंत टवटवीत होते आज अचानक मान टाकलेली दिसते. कारण रोपांच्या मुळांना, खोडाला वाफ लागून ते नाश पावतात असे होऊ नये म्हणून सकाळी लवकर पाणी द्यावे. हिवाळ्यात पाणी सायंकाळी द्यावे. सायंकाळी पाणी दिल्याने झाडे सावकाश पाणी ग्रहण करतात. वातावरणात गारवाही असतो.

स्रोत

ह्यासारखेच इतर काही: आहे पावसाळा तरीही

No comments:

Post a Comment