वसुंधरेचा इशारा

पाश्चात्य अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्स हिच्या आवाजातला हा व्हिडिओ पाहताना काय वाटतं ते तुमचं तुम्ही ठरवा. मला तर धडकी भरते. सृष्टी माता, जिला आपण पृथ्वी म्हणतो, ती आपल्याला काय संदेश देते ह्यावर आधारित हा व्हिडिओ आहे.

Conservation International ह्या जागतिक पर्यावरण स्नेही व मनुष्य कल्याण संस्थेने Nature is speaking (निसर्गाचे बोल) ह्या मालिकेअंतर्गत निसर्गाची निरनिराळी तत्व आपल्याशी संवाद साधत आहेत, अशा आशयाचे व्हिडीओज २०१४ साली प्रकाशित केले होते.

काही प्रसिद्ध पाश्चात्य कलाकारांनी त्या व्हिडीओजना आपला आवाज दिला आहे. निसर्गाची ही तत्वं त्यांचं मनोगत आपल्याला सांगतात. सृष्टीला वाचवण्यापेक्षा मनुष्य जातीला इथे तग धरून राहायचं असेल तर काय करावं लागेल ह्याचा इशारा देतात.

त्याच मालिकेतला हा एक व्हिडीओ.


माता वसुंधरा म्हणते,
"काही जण मला निसर्ग म्हणतात

तर काही म्हणतात सृष्टी माता.

मी इथे गेल्या साडे चार अब्ज वर्षांपासून आहे.

तुमच्यापेक्षा बावीस हजार पाचशे पट अधिक काळ मी इथे वास करतेय.

मला काही माणसांची गरज नाही पण माणसांना माझी गरज आहे.

हो, तुमचं भवितव्य माझ्यावर अवलंबून आहे.

जेव्हा माझी भरभराट होते, तेव्हा तुमचीही भरभराट होते.

जेव्हा मी अशक्त होते, तेव्हा तुम्हीही अशक्त होता... किंवा त्याहीपेक्षा वाईट.

पण मी इथे प्राचीन काळापासून आहे.

तुमच्यापेक्षा मोठ्या जातीचे जीव मी पोसले आहेत आणि उपाशीही मारले आहेत.

माझा महासागर, माझी माती, माझे प्रवाह, माझी अरण्ये...

हे सगळे तुमचा घास घेऊ शकतात किंवा जीवदानही देऊ शकतात.

रोज जगताना तुम्ही मला लक्षात ठेवता कि दुर्लक्ष करता ह्याने मला काहीच फरक पडत नाही.

ह्या किंवा त्या मार्गाने, तुमच्या कृतीवर ’तुमचं’ प्राक्तन निश्चित आहे, माझं नाही.

मी निसर्ग आहे. मी पुढे जातच राहीन.

मी मी उत्क्रांतीसाठी तयार आहे.

तुम्ही आहात?"

निसर्गावर आपण कितीही अत्याचार केले तरी तो दोन हातांनी आपल्याला देतच असतो पण त्याचा कोप झाला तर सुनामीसारखे परिणामही आपल्यालाच भोगावे लागतात. मनुष्यजात पृथ्वीवर अस्तित्वात येण्याच्या कैक वर्षे आधीपासून सृष्टीने डायनोसोर सारखे जीव पोसले आणि उपाशी मारले देखील.

मानवाइतका कृतघ्न प्राणी अवघ्या जगात कुठे सापडणार नाही. आपण य:कश्चित जीव पण आपले प्रमाद हिमालयाहून उंच. सृष्टीने वारंवार आपल्याला धोक्याची सूचना दिलेली असते, ती नाकारून आपण मनमानी करत राहातो पण ह्यात नुकसान आपलंच आहे, निसर्गाचं नाही, हे मात्र विसरतो.

निसर्ग आपल्या आधीही होता आणि नंतरही असेल, त्याला शरण जाऊन जगायचं कि त्याच्याविरूद्ध बंड करायचं, ह्यावर मनुष्यजातीचं प्राक्तन अवलंबून आहे.

भाषांतर | मजकूर: © Kanchan Karai

No comments:

Post a Comment