नाद "बागे"श्री - अंगणी माझ्या मनाच्या

ह्या लेखाचा दुसरातिसरा भाग

काल माझ्या एका गोड मैत्रिणीकडे गेले होते. तिचं नाव पण दीपाली. तिचं नीटनेटकं, टापटीप घर पाहून मन प्रसन्न झालं. हॉल मध्ये प्रत्येक खुर्ची, टीपॉय, रिकामा. बेडशीटवर एकही सुरकुती नाही. कपाटात ठेवलेली कपड्यांची perfect आयाताकृती चळ. मुलीचे प्रोजेक्टचे सामान सुद्धा एकदम व्यवस्थित! बापरे! मला एकदम inferiority complex आला.

माझ्या हॉल मध्ये पसरलेले २-३ दिवसांचे पेपर, वाचायला सुरवात केलेली घरातील प्रत्येकाची ४-५ पुस्तके, चहाचे २-४ कप, माझ्या २-३ ओढण्या, पर्स, डब्याच्या पिशव्या, झालंच तर इस्त्रीच्या कपड्यांचा गठ्ठा, laptop, ipod, phone, असंख्य chargers, सगळं डोळ्यासमोर तरंगायला लागलं. हे सगळेजण कधी टीपॉयवर, कधी खुर्चीवर, तर कधी सोफ्यावर ठाण मांडून बसले असतात. ते माझ्या सोफ्याचे पोटभाडेकरू आहेत असा माझा दाट संशय आहे. कितीतरी वेळा घरात आलं की 'तशरीफ रखने के लिये' जागा सापडत नाही. मग सगळं सामान एका खुर्चीवर स्थलांतरित करून जागा करून बसायचं अशी आमच्या घरातली रीत आहे. आठवडाभर त्यांचं विस्थापितांचे जगणे पाहून कणव आली, की एकदाचं आवरून टाकायचं!

पूर्वी मी शनिवार रविवार ४-४ तास घर आवरत असे. मग त्यातला फोलपणा दिसायला लागला. एक तर कितीही आवरलं तरी संपत नाही. आणि दुसरं म्हणजे इतरांनी पसारा केला की जाम राग येतो. पसारा करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. जन्मसिद्ध. And, its a form of self expression. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणणे हे काही बरोबर नाही. म्हणून मी अविरतपणे घर आवरणं सोडून दिलं. मिळालेल्या वेळात चित्र काढणं सुरु केलं. आणि त्या पसाऱ्यात कुंचले, रंग, खोडरबर, पेंसिली, कागद अशी भर पडली.

नरेनने कधी मधी तक्रार केली सुद्धा. किती हा पसारा, थोडं तरी आवरत जा! तेंव्हा हा पसारा नसून कलाकाराच्या मनमोराचा पिसारा आहे अशी philosophy पाजळून, मी पसारा करायचा license मिळवला. तशी एक post facebook वर पण टाकली. माझ्या मैत्रिणींना ती philosophy आवडली, पण त्यांनी चाणाक्षपणे त्यांच्या मुलांपासून ती लपवून ठेवली. उगीच मनावर वाईट परिणाम नकोत म्हणून! बरोबरच आहे.


असो. दीपलीकडे जाऊन आल्यावर आपण सुद्धा घर कसं नीटनेटकं ठेवलं पाहिजे असं प्रकर्षाने जाणवलं.

आज सकाळी उठल्याबरोबर गॅलरी पासून साफ सफाई सुरु केली. कचरा कुंडीत जिरलेल्या कचऱ्याचं compost सगळ्या झाडांना घातलं. कण्हेरीच्या अस्ताव्यस्त फांद्या बांधल्या. मोगऱ्याला मांडवावर चढवलं. लिंबाचं झाड उंचावर ठेवलं. सगळी आयुधे - कात्री, खुरपं इत्यादी जागेवर ठेवलं. दोन रोपं आली होती, ती लावली. गॅलरी एकदम tip-top दिसायला लागली.

पण ह्या भानगडीत, सकाळच्या स्वयंपाकाला उशीर झाला. मग shortcut डबा आणि cornflakes नाश्ता करून शरू आणि नरेन आपापल्या कामाला गेले. मग मी लिखाण, वाचन, चित्र अशी कामं काढून बसले. आणि घर आवरायचं राहूनच गेलं. पुन्हा असा ताप आला की फक्त गॅलरीची तेवढी स्वच्छता होते. बाकी घरभर तो मनमोर पिसारा फुलवून नाचत असतो!

असंच होतं माझं. मी घरापेक्षा गॅलेरीतच जास्त राहते. म्हणजे माझ्या घराला गॅलरी नाही. माझ्या गॅलरीला घर आहे!

मागे एकदा शरूला मी लहानपणापासून कोण कोणत्या घरात राहिले ते सांगत होते - तर फक्त गॅलऱ्यांचे वर्णन करून सांगितलं होतं!


लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत बेळगावला आजीकडे जमायचो. आजीच्या बंगल्याला मोठी गच्ची होती. आम्ही सगळी मावस - मामे भावंडं संध्याकाळी गच्चीत खेळायचो, रात्री तिथेच जेवायचो आणि अंथरुणं घालून तिथेच निजायचो! शिवाय दुपारभर जिन्यात पत्ते खेळायचो. बहुतेक फक्त आन्हिके उरकायला घरात जात असू!

मी प्राथमिक शाळेत असेपर्यंत आम्ही अमरावतीला राहायचो. तिथल्या दुमजली घराला लागून मोठी गच्ची होती. तिने तीन चाकी सायकल भरधाव (?) चालवण्याचा छंद जोपासला. अमरावतीच्या उन्हाळ्यात आम्ही २-३ बिऱ्हाडे गच्चीत रात्री सतरंज्या टाकून झोपत असू, इतकी ती ऐसपैस होती. या गच्चीतून खालची बाग दिसायची. कुंपणावर पांढऱ्या रंगाचा गच्च फुललेला वेली गुलाब, मांडवावर जुईची वेल आणि परसात एक मोठं अवळ्याचं झाड. त्या झाडाखाली कितीतरी अवळी भोजन केली होती. आम्हा मैत्रिणींची सुटीच्या दिवशी, 'डबा party' पण त्या झाडाखाली होते असे.

त्या घराला मागे पण एक गॅलरी होती. तिथून मागचं विस्तीर्ण रानमाळ दिसायचं. सकाळी गॅलरीत उभं राहून दात घासतांना, तिथे हमखास भारद्वाज नाहीतर मुंगूस दिसायचं. उन्हाळ्यात त्या गॅलरीत आई पाण्याचा माठ भरून ठेवायची. रोज तहानलेली माकडं तिथे पाणी प्यायला यायची.

गच्च्या पुरत नाहीत म्हणून कि काय, चिमण्या घरात पण दाटी करायच्या. घरटी काय बांधायच्या. गवत काड्यांचा कचरा काय करायच्या. आणि दिवसभर नुसता चिवचिवाट करायच्या. त्यांच्या आवाजाने आई वैतागून जायची. मी मात्र त्यांच्याशी खूप बोलायचे! शाळेतून आल्यावर आईने दिलेला खाऊ त्यांना द्यायला त्यांच्या मागे धावायचे. असला सगळा वेडेपणा!

मी तिसरीत गेल्यावर, पापांची बदली पुण्याला झाली. लवकरच आम्ही सगळे पुण्यात आलो. या घराला एक लांबच लांब गॅलरी होती. त्या गॅलेरीतून समोरच्या मंदिरातल्या विठ्ठल-रखुमाईचे फार सुंदर दर्शन होत असे. माझ्या दोन्ही आजी-आजोबांना त्या दर्शनामुळे ते घर फार आवडत असे. त्या काळात मला विठ्ठल-रखुमाई देव नसून ज्ञानेश्वरांचे आई-वडील आहेत असा ठाम समज होता. चार-आठ हात नाहीत. हातात शस्त्र नाही. दागदागिन्यांचा चकचकाट नाही. इतका साधा कधी देव असतो का?

पुढे घर बदललं आणि "१० श्रीगणेश" असा "१० Downing Street" किंवा "दस जनपथ" सारखा पत्ता मिरवणाऱ्या घरात आम्ही राहायला आलो. ह्या घराला ३ गॅलऱ्या होत्या! सुख सुख म्हणतात ते हेच! घरा समोरचे चिंचेचे झाड गॅलरीतून आत डोकावून पाहत असे. डोळ्यासमोर चिंचा नाचवून वाकुल्या दाखवत असे. आम्ही मित्र-मैत्रिणींनी त्याच्या किती चिंचा मिटक्या मारत खाल्ल्या होत्या!

या चिंचेच्या मागे एका नवीन इमारतीचे काम सुरु झाले. तेंव्हा वाटलं की आता ते लोक हे झाड पाडणार. त्या लहान वयात काय करावं ते कळेना. कोणाला सांगावं? कोण ऐकेल? असं वाटत होते. तेंव्हा जवळच्या मारुतीला साकडं घातलं. १०८ प्रदक्षिणा घातल्या. "वाचावं रे बाबा ते झाड!", अशी कळकळीने प्रार्थना केली.

अजूनही तो भला थोरला वृक्ष दिसला की जुना मित्र भेटल्या सारखं वाटते. पुढे, शरूने पण त्या झाडाच्या चिंचा वेचून खाल्ल्या. काठीने पाडून, फ्रॉक मध्ये चिंचा गोळा करून आणणारी शरु ‘किती मोठा खजिना जिंकून आणलाय’ अशा अविर्भावात, आबांचे बोट धरून घरी यायची.

त्या घरात आईने खूप झाडं लावली होती. त्यांना रोज पाणी घालणे हे तिच्या विरंगुळ्याचे आणि आनंदाचे काम असावं. वर्षातून एकदा ती आणि मी कुंड्यांना काव लावून रंगवायचो, माती बदलून, खत घालून झाडांचं cutting करायचो. आणि मग गॅलरी नवीन haricut करून, नटूनथटून बसल्या सारखी दिसायची.

मी कॉलेज मध्ये असतांना, त्या गॅलरीत माझ्या दुर्बिणीची भर पडली. IUCCA च्या एका Telescope Making workshop मध्ये तो telescope केला होता. त्या मधून रात्री-अपरात्री चंद्र, गुरु, शनी असे पाहण्यात आणि आकाशाशी दोस्ती करण्यात एक वर्ष मजेत निघून गेलं. एकदा पहाटे ३-३:३० वाजता M६ आणि M७ हे तारका समूह इतके भन्नाट दिसले, की घरात निजलेल्या सगळ्यांना उठवून उठवून गॅलरीत नेऊन दाखवले!

पुढे लग्नानंतर मी आणि नरेन एका मोठ्या गॅलरीच्या लहान घरात राहायला गेलो. नाकापेक्षा मोती जड असं होत ते घर! ६०० चौ. फूट गॅलरी आणि ५०० चौ. फूट घर! बेष्ट होतं एकदम. पण त्या घरात फार राहायचा योग नव्हता.

पुढे लगेच अमेरिकेत मिनियापोलीसला राहायला गेलो. त्या थंड प्रदेशातील लोकांना गॅलेरीची गरज भासली नसावी. तिथल्या घरांना गॅलेरीच नव्हती. आता वाटतंय की मी तिथे जगलेच कशी! पण त्याची भरपाई करायला घरा मागे एक मोठं तळं होतं. स्वच्छ, नितळ, निवांत तळं होत. थंडीत पूर्ण गोठल्यावर त्यावरून चालत पलीकडे जाता यायचं! आणि उन्हाळ्यात त्यात बदके पिले सुरेख पोहायची!

आणि आता या घरात, खूप प्रयोग करून झाडं, compost, पक्ष्यांचं गणित जमलेली गॅलरी आहे. ठराविक वेळेला येणारे पक्षी, खारी आमची दत्तक मुलं असल्यासारखे झाले आहेत. त्यांच्यासाठी वेळेवर खाऊ ठेवणे. मधून हळूच डोकावून आले की नाही ते पाहणे, असा वेडा छंद आम्हाला सगळ्यांना लागला आहे.

एकदा गॅलरीत बसून आम्ही तिघांनी शाडूचा गणपती केला होता. दर वर्षी घरच्या गणपतीचे विसर्जन गॅलेरीतच एका बादलीत करतो. दुसऱ्या दवशी ते पाणी झाडांना प्रसाद म्हणून मिळते.

शरू लहान असतांना गॅलेरीत दिवाळीचे किल्ले केले. कधी गॅलरीत बसून पणत्या रंगवल्या. दिवाळीच्या दिवसात दिव्यांच्या माळांनी, आकाश कंदिलानी गॅलरी खूप सुंदर होते. तुळशीच्या लग्नाला सजणारी तुळस, आणि पाडव्याची मोठी गुढी, गॅलरीची शोभा वाढवतात.

शरू आणि तिच्या मैत्रणी खूप आवडीने गॅलरीत बसून अभ्यास करतात. आणि आजकाल, बरं का, दिवसभराची gossip करायची असते तेंव्हा, शरू हळूच गॅलरीत जाऊन मैत्रिणीशी फोनवर गप्पा मारते!

मागे नरेनने एक कुंभाराचे चाक आणले होते. त्याचं बस्तान पण गॅलेरीतच होतं. त्यावर नरेनने खूप देखणे miniature pottery चे नमुने केले होते. ते कधी भट्टीत भाजले नाहीत आणि मग असेच फुटून गेले.

अशा गॅलरीवेड्या माझ्या सारख्याने, खरं तर अभ्यासाचा मेज गॅलेरीतच ठेवायला हवा. एक लहानसा मेज, चित्रांचं सामान, आणि एक छोटसं book-shelf ठेवलं, की तो घरातला पिसारा फुलवून नाचणारा मोर अंगणात येईल. आणि अगदी खरं सांगायचं तर, घर नीटनेटकं ठेवायचा तेवढा एकच उपाय राहिला आहे!

घरापेक्षा गॅलेरीतच जास्त राहणाऱ्या आणि घराला गॅलरी नाही, तर गॅलरीला घर आहे! असचं काहीसं मत असणाऱ्या आमच्या वाचकांसाठी घेऊन येत आहोत ही नवी लेखमाला 'नाद बागे"श्री'.. भेटत राहू दर गुरूवारी.. इथेच...

स्रोत

No comments:

Post a Comment