नाद "बागे"श्री - वन उपवन सम

ह्या लेखाचा पहिलातिसरा भाग

या घरात राहायला आलो तेंव्हा शरू लहान होती. मला फारसा वेळ नसायचा. त्यामुळे माझी १० X १२ ची बाल्कनी १-२ वर्ष ओसाड पडून राहिली. नाही म्हणायला ५- ६ कबुतरे विसाव्याला यायची.

तुळस, मनिप्लाण्ट, झेंडू अशा बाल पाउलांनी झाडांनी एन्ट्री घेतली. अलगद बहरत जाई, जुई, सायली, मोगरा, शेवंती, मधुमालती, करत करत गुलाबा पर्यंत मजल गेली. वेली चढवायला एक मांडव बांधला. त्याच्यावर बोगनवेलीच्या लाल, डाळिंबी, केशरी फुलांनी रंगांचा धिंगाणा घातला! बोगनवेली बरोबरच स्वस्तिक, सदाफुली, कण्हेरीच्या झाडांनी सतत बाग प्रफुल्लीत ठेवली. त्यात एक पांढऱ्या चाफ्याचे झाड होते. ते फारच मोठ झाल्यावर शेतावर नेउन लावलं.

त्या बाल पाउलांची गरुडझेप थेट जांभूळ, आंबा, बेल, नीम, औदुंबर, पिंपळ, वडापर्यंत गेली! त्याचं असे झालं … एका उन्हाळ्यात कचऱ्या पासून खत करण्याचा एक प्रयोग चालू होता. तेंव्हा कचऱ्या बरोबर जांभळाच्या बिया कुंडीत पडलेल्या. अचानक पावसाळ्यात इवली इवली रोपे आली. ती जांभळाची होती हे नंतरहून कळले. मग ती रोपे छोट्या छोट्या पिशव्यां मध्ये लावली. वर्षभरात मस्त ३-४ फुट उंच वाढली! पुढच्या पावसाळ्यात एका NGO ने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांतर्गत लावली.

बी फोडून नाजूक लुसलुशीत पाने जमिनीतून वर येतांना पाहणे ही काय मौज! निसर्गाचा सृजन सोहळाच तो! जन्मभर पुरेल असा आनंद देणारा! बहिणाबाईचे हे शब्द, मातीत काम करणाऱ्याच्या हृदयाला भिडतात.

माझ्यासाठी पांडुरंगा, तुझं गीता भागवत

पावसात सामावतं, माटीमंदी उगवतं।।ती ४-५ वर्ष वेड लागल्या सारखं ५०० तरी रोपे छोट्या बाल्कनीत वाढली. या रोपांनी माझी बाग हिरवीकच्च केली होती. रोपं मोठी होतील तशी काळजी लागायची, उपवर मुलीच्या बापा सारखी. “या झाडांना कोणी घर देईल का घर? एका वृक्षाला कोणी सावली देईल का, सावली?” असं कुठे कुठे विचारायचं. आणि मग एखाद्या संस्थेकडून होकार आला की खूप खूप आनंदाने, खूप खूप अभिष्टचिंतून, त्या रोपांना अलविदा करतांना नकळत डोळे पाणावयाचे.

रोपे दत्तक घेणारी संस्था मिळेना तेंव्हा हा खेळ थांबवावा लागला.


मधल्या काळात नरेंद्रने प्लास्टिकच्या बाटल्यां मध्ये छोटी शोभेची झाडे लावून hanging garden चा अभिनवप्रयोग केला. हा प्रयोग eco-friendly तर झालाच, पण नयनरम्य पण! त्याच्या देखभालीसाठी फार वेळ लागत असल्याने पुढे हे प्रकरण बंद पडले.

या सगळ्याबरोबर ओल्या कचऱ्या पासून खत करायचे १०-१२ प्रयोग झाले. बरेचसे अपयशी. शेवटी एकदाची घडी बसली. मागच्या ५-६ वर्षात घरातून क्वचितच ओला कचरा बाहेर गेला. (दोन प्रयोगांच्या मधल्या काळात असे होत असे.) झाडांमुळे मातीशी मैत्री झालीच होती. पण खतांमुळे गांडूळाशी पण मैत्री झाली. एखादे गांडूळ बाहेर पडले तर हाताने उचलून परत कुंडीत टाकतांना किळस वाटेनाशी झाली. उलट बुचबुचित गांडूळांचा गुंता पहिलाकी “क्या बात है!” असे वाटू लागले!

गांडूळा बरोबर आणखीन काही नवीन मित्र मिळाले. खूप खूप पक्षी, प्राणी आणि कीटक! रोज सकाळी शिळी पोळी खायला येणारी खारुताई, चिऊताई आणि साळुंकी. फुलां मधला मध प्यायला येणाऱ्या मधमाशा आणि humming birds. राळा खायला येणारे डझन भर finches. जोडीने हजेरी लावणारे दह्याळ, सुतार, आणि robin. सध्या एका रातकिडयाने बिऱ्हाड मांडले आहे! जोरदार रियाज चालतो बेट्याचा!

या सगळ्यांची एक एक तऱ्हा! कबुतराची अतिमंद तऱ्हा तर कावळे एकदम हुशार! एका पाडव्याला feast म्हणून पक्ष्यांना पुरी ठेवली खायला. कावळ्याने एक पुरी छान बसून खाल्लीन. आणि दुसरी पुरी त्याने गच्चीतल्या एक बारीकशा फटीत ठेवली. २-४ बोगनवेलीची फुले तोडून समोर कोंबली, पुरी लपवायला! दुसऱ्या दिवशी स्वारीने फुले काढून टाकली आणि पुरी मटकावली!

या जंत्री मध्ये काही प्रमुख पाहुणे आहेत – एक आहे swallow चे जोडपे. civil engineer बांधू शकणार नाही इतके सुंदर मातीचे घर त्यांनी बनवले. त्यांची घरटे बांधतांनाची गडबड आणि मग पिल्लांना भरवण्याची धांदल! ३ पिल्ले पटापट मोठी झाली आणि सगळ कुटुंब भुर्रकन उडून पण गेलं! अजून एकदा एक सुंदर सरडा १५ दिवस राहून गेला. (गेला म्हणजे थेट वरतीच गेला :( ) अजून त्याचा तो चकचकीत काळा हिरवा रंग आठवतो.


हे सगळे प्राणी कमी पडतात म्हणून की काय आम्ही दोन ससे आणले. काळू आणि बाळू. त्याचं गोंडस दुडूदुडू पळणं, टुणूक टुणूक उड्या मारणे फारच लोभसवाणे होते. खूप लळा लावला या पिल्लांनी! कधीही फोन केला तर “meeting” मध्ये असणारा नरेन, दुपारी फोन करून “ससे काय करतायत?” असे विचारू लागला. शाळेतून एरवी “दमून” येणारी शरू सरळ बाल्कनीत जाऊन पिल्लांना मांडीवर घेऊन बसू लागली! आणि आमच्या घरी छोट्या मंडळींनी ससे पाहायला रीघ लावली.

सकाळी येणारी खारुताई मात्र या दोघांवार का खार खाऊन होती की! आली की आधी दोघांवर ची-ची करून रागे भरायची. हे दोघे (भित्रटच ते) तिला घाबरून लपून बसायचे. आणि मग ह्या ताई पोळी खाऊन जायच्या!

एक दिवस एक ससाणा बाल्कनीत आला. पहिल्यांदाच पहिला मी. चकचकीत, healthy, देखणा! पुण्यासारख्या concrete jungle मध्ये कसा काय बुवा हा जगतो याचे आश्चर्य वाटले! लवकरच “तो कसा काय बुवा जगतो” चे कोडे उलगडले. एका रात्री त्याने काळू-बाळूची शिकार साधली.

शरू गळ्यात पडून रडली. कितीतरी दिवस आम्हा तिघांना चैन नव्हते.

माझी बाग एक जंगल पण आहे याची कल्पनाच नव्हती.

स्रोत

No comments:

Post a Comment