नाद "बागे"श्री - लेकुरवाळी

ह्या लेखाचा पहिला भागदुसरा भाग

एका सकाळी शरूने मोठ्यानं हाक मारली, "आई! पटकन ये! ही बघ, ही बघ खार आलीय गॅलरीत!" आमच्या आवाजाने आणि वर्दळीने ती पळून गेली ही बात अलग, पण खार आली होती. पहिलं आश्चर्य ओसरल्यावर आम्ही दोघींनी तेहेकीकात सुरु केली. ही बाया चौथ्या मजल्यावरच्या गॅलरीत आलीच कशी? त्या संशोधनाचा निष्कर्ष असा निघाला की – सर्वव्यापी केबलचे मायाजाल खारींवर प्रसन्न झालय, आणि त्याने खारींना हवं तेंव्हा, हवं तिथे प्रकट होण्याचा वर दिलाय! बुचाच्या उंच झाडावरून समोरच्या इमारतीच्या गच्चीत. तिथून केबल वरून शेजारच्या गच्चीत. तिथून वेगवेगळ्या केबल वरून उतरलं की हव्या त्या गॅलरीत बाई अवतरतात!

या भानगडीत आम्हाला खारींकडे बघत बसायचा छंदच लागला. त्यांचं निडरपणे उड्या मारत, बारीकशा तारेवर तुरुतुरु पळत, कधी लोंबकळत, कधी झेपावत फिरणं पाहण्यात फारच मौज वाटू लागली. त्यांच्या कसरती पाहून, खारी भारी आहेत असेही वाटू लागले. आमच्या गच्चीवरून समोरच्या गच्चीवर एक लांबच लांब केबल धावते. ती केबल एका मोठ्या औदुंबराच्या झाडाच्या वरून जाते. या खारी केबल वरून धावत औदुंबरावर आल्या की केबल सोडून ४-५ फूट खाली झाडावर उडी मारतात! पहिल्याने तर माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला! आता सवय झाली. आम्हाला सर्कस पाहायला कुठे जायची गरजच नाही! या ताईंचा दिवसभर फुकट खेळ चालतो!

पाहता पाहता ती खार आमची नियमित पाहुणी झाली. बरोबर सकाळी ६:३० ला, शिळ्या पोळीचे तुकडे दोन्ही हातात धरून खाणारी खार, आमच्या गॅलरीची regular feature झाली. कधी चुकून खाऊ ठेवायची राहिला तर आम्हाला हळहळ वाटायला लागली. पूर्वी खाऊ नसेल तर ती निमुटपणे निघून जायची, पण आता जर खाऊ ठेवायचा राहिला, तर तीच मोठमोठ्याने “भूक! भूक!” म्हणून सांगते!


हळूहळू या खारीची हिम्मत वाढली. गॅलरीत मनसोक्त हिंडून झाल्यावर, दारातून आत घरात येऊ लागली. एकदा मी हॉल मध्ये चित्र काढत बसले होते. आणि ही चिमुरडी, गॅलरीतून, बेडरूम मधून, मधल्या पॅसेज मधून एकदम माझ्या समोर येऊन थबकली! मला पाहून लगबगीने about turn करून पसार! बहुतेक मी खारीच्या शेपटीच्या केसांच्या ब्रशने चित्र रंगवते हे पाहून ती घाबरली असावी.

एक दिवस ही खार आपल्या दोन पिल्लांना घेऊन आली. आधीच ती खार गोड. तिची पिल्लं तर त्याहून गोड. चिंटी- चिंटी, फारसा अंदाज नसलेली, आणि आम्हाला फारसं न घाबरणारी पिल्लं, खूप वेळ गॅलरीत असायची. लवकरच ती आई येईनाशी झाली. काही दिवस दोन पिल्लं जोडीनं येत राहिली. आणि नंतर सोबतीची गरज वाटेना तसं एकएकटे येऊ लागली.

गॅलरीतला खारींचा आणि पक्ष्यांचा खेळ त्यांच्या नकळत छान पाहता यावा, आपल्याला त्यांचे मस्त फोटो काढता यावेत ही गरज लवकरच निर्माण झाली. एक दिवस शरू शाळेतून एक दांडगी कल्पना घेऊन आली – “आई, आपण एक ‘मचाण’ बांधू!” झालं! त्यावर आमची बरीच चर्चा सत्रे रंगली. कागदावर काय काय plan उतरले. आणि शेवटी स्वस्त आणि मस्त असा plan पास झाला. बेडरूम मध्ये दोन खुर्च्या टाकून बसायचे. गॅलेरीचे पडदे लावून मध्ये बारीक फटी ठेवायच्या. मग कधी फटीतून तर कधी periscope मधून निरीक्षण करायचे. अर्थात आमचे निरीक्षण कधीच खुर्चीत बसून झाले नाही. कधी बेडवर चढून, कधी खुर्चीवर उभे राहून, कधी फरशीवर लोळून मजेत निरीक्षण चालते.

असं सगळं छान चाललं होतं तर, अचानक एक संकट, आकाशातून कोसळलं. कबुतरांची नजर खारींच्या खाऊ वर पडली. आणि खारींचा खाऊ तेच फस्त करू लागले. बारक्या पक्ष्यांना पण खाऊ कडे फिरकू देत नसत. चिमण्या, बुलबुल, साळुंकी यांना पळवून, सगळा खाऊ लाटायचे. आता या दुष्ट कबुतरांचं निर्दालन कसं करायचं, हा प्रश्न निर्माण झाला.

शरु आणि नरेनने ४-५ प्रयोग करून दोन pegion-proof bird feeders तयार केले. एक feeder बारक्या पक्ष्यांसाठी आणि एक feeder खारुताईसाठी. या दोन्हीत कबुतरे जाऊ शकत नसल्यामुळे हे बारके जीव शांतपणे feeder मध्ये बसून खाऊ शकतात. पण आमची कसरतवीर खार तिच्या feeder मधला खाऊ तर खायचीच, शिवाय पक्ष्यांच्या feeder मध्ये उलटं लटकून, उडी मारून जायची आणि ते पण खायची! लवकरच बारके पक्षी आणि खारी गुण्यागोविंदाने एकाच ताटातून खाऊ लागले. आणि आमची 'कबुतर हटाओ' मोहीम फत्ते झाली!


दरम्यान शरुला शाळेत विज्ञानाचा एक प्रोजेक्ट करायचा होता. जुन्या सामानातून एक model तयार करायचे होते. तेंव्हा google वर ‘संशोधन’ करून, आम्ही दोघींनी एका जुन्या प्लास्टिकच्या बाटली पासून पक्ष्यांसाठी पाणपोई तयार केली. हवेच्या दाबावर चालणारी पाणपोई पक्ष्यांसाठी एक स्वच्छ पाण्याचा झरा झाला. हे water-station शरूच्या शाळेत तर आवडलेच पण पक्ष्यांनाही फार आवडले!

याच धरतीवर नंतर शरुने एक humming bird साठी honey-station केले. एका लहानशा बाटलीत पाण्याऐवजी साखरेचे पाणी घातले. ते फार सावकाश झिरपेल असे design केले. अधून मधून फुलांचा मध प्यायला येणाऱ्या humming birds ना लवकरच त्या बाटलीतून गोड पाक प्यायची सवय लागली.

आताशा या सगळ्या पक्ष्यांना गॅलरी त्यांच्या मालकीची आहे असे वाटायला लागले आहे. आम्हाला पण. गॅलरीत जातांना इकडे तिकडे पाहून कुठल्या पक्ष्याला आपण disturb तर करत नाहीये ना, अशी खात्री करून आम्ही हळूच गॅलरीत जातो आणि पट्कन काय असेल ते काम करून आत येतो.

एका पक्ष्याच्या जोडीला तर गॅलरीच काय, घर पण आपलं वाटायला लागलय. त्या दोघांनी बेडरूमच्या माळ्यावर घरटे बांधले आहे. आणि आता त्यांना आमचे घर आतून बाहेरून माहित झालंय. कोणत्याही खिडकी दरवाज्यातून आत येतात, आणि थेट त्यांच्या बेडरूम मध्ये शिरतात! मागे एकदा एका कबुतराच्या जोडप्याने खिडकीत घरटे केले होते. तेंव्हा मी आणि शरू रोज त्यांची प्रगती बघायचो. त्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या होत्या – अंडी कधी घातली, कावळ्यांनी कसा त्रास दिला, किती दिवसांनी पिल्लं बाहेर आली, कसं उडायला शिकवले, पिल्लांना किती वेळा भरवले, कधी उडायला लागले या माहितीची ४-५ पानी जंत्री झाली. शरु तेंव्हा ‘Princess Dairies’ नावाचे पुस्तक वाचत असल्याने, या ५ पानी staple केलेल्या दस्तऐवजाचे नाव तिने - ‘Pegion Dairies’ ठेवले!

मागचा पावसाळा संपता संपता, २-४ पक्षी feeder मधे बसून न खाता, खाऊ चोचीत घेऊन उडून जात. असं का बरे? हे कळायला ऑक्टोबर महिना उजाडला. चिमणी, बुलबुल आपापल्या पिल्लाना बरोबर घेऊन येऊ लागले तेंव्हा. संपूर्ण वाढ झालेलं पिल्लू, फांदीवर बसून पूर्ण वेळ चिवचिव चिवचिव करत राही. आई किंवा बाबाने चोचीत घास भरवला की दोन क्षण शांतता. मग परत चिवचिव सुरु. एवढासा जीव आणि किती तो आवाज! कधी कधी बुलबुल पिल्लाला सोडून एकटाच निघून जाई. जातांना "कुठ्ठे जाऊ नकोस, आलोच!" असे सांगून जात असावा. आई-बाबा नसतांना मात्र ४-५ मिनिटं ते पिल्लू आवाज न करता शहाण्यासारखं थांबून राही.

चार दिवसांमागे गॅलरीत एका वेळी दोन खारी दिसल्या! मस्त बागडत होत्या! आणि दुसऱ्या दिवशी दुपारी चक्क चार खारी! एकमेकांमागे चीची करत पळ, शेपटी ओढ, पकडा पकडी, लपंडाव, विषामृत असले काय काय खेळ चालले होते. चांगला अर्धा पाऊण तास ३ खारींचा हा खेळ रंगला. शेवटी एका Mr. खारीने (की खाराने?) इतर दोन Mr. खारींना पळवून लावले. आणि जग जिंकल्याच्या अविर्भावात, हा सगळा खेळ royally ignore करणाऱ्या, Miss खारी समोर ठाकला. मग त्याने अगदी प्रेमाने तिला पोळीचा एक तुकडा भरवला! मला तर त्यानं घेतलेला उखाणा पण ऐकू आल्यासारखा वाटला! गोरज मुहूर्तावर, जुईच्या मांडवा खाली, फुला-पानांच्या साक्षीने दोघांचे लग्न झाले.

आता पुन्हा एकच खारुताई येतंय. ती गरोदर आहे असा आमचा अंदाज आहे. शरू खारीच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून आहे. नरेनने "तिच्यासाठी डिंकाचे लाडू कर" असा प्रेमळ सल्ला cum फर्माईश केली आहे. या आठवड्यात, लिंबाच्या झाडाखाली डोहाळ जेवण योजले आहे. मी आणि शरू आमच्या मचाणावर position घेऊन बसणार आहोत! पाहू आता खारुताई शेंगदाणा निवडते की चारोळी.

स्रोत

No comments:

Post a Comment