शहर शेती : श्रावणातले वनस्पती संवर्धन

रावणातील निसर्गानुभव अतिशय आनंददायी असतो. अनेक साहित्यिक आणि कवींनी विविध प्रकारे त्याचे वर्णन केले आहे. ‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे’ ही कविता सर्वश्रुतच आहे. जूनमध्ये पावसाळा सुरुवात झाल्यानंतर श्रावण आणि भाद्रपद महिन्यापर्यंत निसर्गात विविध वनस्पती उगवितात. त्यातील अनेक वनस्पती विविध व्याधींमध्ये औषध म्हणून तसेच सकस आहार म्हणून उपयुक्त आहेत. या उपयुक्त वनस्पतींची माणसांना नीट ओळख व्हावी, पुढील पिढय़ांपर्यंत माहितीचा तो ठेवा संक्रमित व्हावा, या हेतूने विविध व्रतवैकल्ये आणि सणांमध्ये हटकून वनस्पतींचा वापर करण्यात आला आहे. व्रतवैकल्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व वनस्पती औषधी असणे हा निव्वळ योगायोग निश्चितच नाही. व्रतवैकल्यांच्या माध्यमातून वनस्पती संवर्धनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

श्रावण महिन्यातील मंगळागौर, हरतालिका तसेच गणपतीला ही विविध प्रकारची पत्री वाहिली जाते, ती दैनंदिन आयुष्यातील आरोग्य रक्षणासाठी उपयुक्त अशी आहे. आधुनिक औषधशास्त्राचा प्रसार होण्यापूर्वी माणसे आजूबाजूला आढळणाऱ्या याच वनस्पतींचाच औषध म्हणून वापर करीत असत. या वनस्पतींच्या वापराने शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. हरतालिकेची पूजा कुमारिकांना सांगण्यात आली आहे. या पूजेच्या निमित्ताने त्यांना आपोआप वनस्पतींची ओळख होत होती. या पूजेत वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये गवत, वेली, झुडूप, वृक्ष असे सर्व प्रकार आहेत. काही झाडांची पाने, फुले, फळे, तर काही झाडय़ांच्या साली तसेच मुळे आरोग्यरक्षक आणि वर्धक आहेत. त्यांच्या लागवडीमुळे वातावरण शुद्ध राहण्यास मदत होते. थोडक्यात आता आधुनिक युगात सर्वत्र प्रदूषणाचा प्रश्न आ वासून उभा असताना परंपरेने सांगण्यात आलेल्या या वनस्पती संवर्धनाची अधिक आवश्यकता आहे.


गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्रींमध्ये पिंपळ, देवदार, बेल, शमी, दुर्वा, धोत्रा, तुळस, माका, बोर, आघाडा, मंदार, अर्जुन, मारवा, केवडा, अगस्ती किंवा हदगा, कण्हेर (करवीर), मधुमालती, डोरली, डाळिंब, शंखपुष्पी, विष्णुकांता, जाई, चमेली यांचा समावेश आहे. मंगळागौरमध्ये उपरोक्त सर्व वनस्पतींबरोबरच आवळा, करंडा, ब्राह्मी यांची पत्री तर चाफा, केवडा, कण्हेर, बकुळ, कमळ, गुलाब, जास्वंद, मोगरा, अशोक या झाडांची पाने-फुले वाहिली जातात. त्यामुळे केवळ परंपरा म्हणून न पाहता जैवविविधता, पर्यावरणरक्षणाच्या दृष्टीने पाहून आपापल्या परिसरात या वृक्ष-वेलींची जोपासना करावी. पुढे आपल्या नित्य परिचयाच्या असणाऱ्या काही वनस्पतींच्या औषधी गुणांची माहिती दिली आहे.

* सीतेचा अशोक (सराका इंडिका) – गर्भाशय तसेच बीजाशयाविषयीच्या अनेक आजारांमध्ये उपयुक्त आहे. आंब्यासारख्या या डेरेदार वृक्षास झुबकेदार लाल फुले येतात. घराजवळ हा वृक्ष असणे शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे.
* जास्वंद- केसांच्या वाढीसाठी जास्वंद उपयुक्त आहे. फुले वाटून त्याचा रस डोक्याला लावला जातो. जास्वंदीचे तेलही उपयुक्त आहे.
* गुलाब- सौम्य, थंड व रक्त शुद्ध करणारी फुले. गुलाबाच्या पाकळ्या साखरेसह खाऊन वर पाणी प्यायल्याने पोट साफ होते. गुलकंद पित्तशमन आणि मलशुद्धीसाठी उत्तम असते.
* कमळ- सुगंधी, शीतल व रक्तदोष बरे करणारे गुण या वनस्पतीत आहेत. पांढऱ्या कमळाच्या पाकळ्या, खडीसाखर आणि ज्येष्ठमध यांचा काढा प्राशन केल्याने पित्तामुळे आलेला ताप बरा होतो.
* बकुळ- स्त्रियांच्या मासिक धर्माच्या समस्यांवर उपयुक्त. बकुळीच्या फुलांचा सुगंध घेतल्याने हृदयाची ताकद वाढते.
* मोगरा- मोगऱ्याची फुले थंड, सुखप्रद व पित्तशामक असतात. शरीरातील अतिरिक्त ऊर्जा घालविण्याचे काम या फुलांचा सुगंध करतो.

स्रोत

No comments:

Post a Comment