झाडांची अभिवृद्धी

झाडांची अभिवृद्धी प्रामुख्याने बियांपासून, छाटकलमाने (फांदी लावून), गुटीकलमाद्वारे, भेट कलमाद्वारे, पाचर कलमाद्वारे, डोळा भरून किंवा पानाच्या तुकडय़ांची लागवड करून व कंदांपासून आणि सकर्सपासून होते. पण सर्वात नवीन प्रकार म्हणजे टिश्यू कल्चर, पण यासाठी मोठय़ा प्रयोगशाळेची आवश्यकता असते. यात झाडाच्या पेशींचे शेकडो तुकडे करून त्यांपासून झाडे बनवली जातात, जी एकाचप्रकारची व एकाच वयाची असतात.

सामान्यपणे सर्वच मोठय़ा झाडांची अभिवृद्धी बियांपासून होते. तसेच बऱ्याच फुलझाडांची नवीन रोपे बियांपासून सहजपणे करता येते. झाडावर फुले जुनी झाली किंवा सुकली की एक तर त्यांना फळे येतात ती कॅप्सूलसारखी असतात. परिपक्व झाल्यावर ही फळे बऱ्याच वेळा फुटतात व बी सर्वत्र पसरते. यामुळे त्यांचे बी जर आपणास गोळा करावयाचे असेल तर ती पिवळसर झाल्यावर त्यांना काढावे अथवा शेंगास्वरूपात असताना त्याला दोरा अथवा रबरबँडने गुंडाळून ठेवावे म्हणजे शेंगा फुटून ही इतरत्र पसरणार नाहीत. तर काहींच्या बिया फुलांच्या मधल्या भागात असतात. याची फुले पूर्णपणे सुकल्यावर त्यांचे बी गोळा करू शकतो. झेंडू, झीनीया, फ्लॉक्स, कॉसमॉस, बालसम (तेरडा) यांसारख्या फुलांच्या बिया त्यांच्या देठाजवळ असतात. त्या सहजपणे पडत नाहीत.

सर्वच बिया पेरताना उन्हात सुकवाव्यात व नंतर पेराव्यात. जास्त खोल पुरल्या गेल्या तर त्याची उगवण एक तर उशिरा होते किंवा होतच नाही. जास्त वरवर पेरल्या गेल्या तर त्यांचे आलेले अंकुर उन्हाने जळण्याची शक्यता असते. बिया पेरून झाल्यावर त्याला हलके पाणी द्यावे. बी पेरलेली जागा गवत, पेंढा यांनी झाकावी, म्हणजे जास्त पाणी एकदम मातीवर पडून बी उधळत नाही. त्याचप्रमाणे बी उगवण्यासाठी लागणारे तापमान व दमटपणा तेथे तयार होतो. तीन-चार दिवसांनी बी अंकुरून वर आल्यावर वरील अच्छादन काढावे.


अनेक झाडांच्या फांद्यांपासून झाडाची अभिवृद्धी करता येते. झाडांच्या जून फांद्या ज्या पेन्सीलपेक्षा जाड हिरवटपणा संपलेल्या फांद्या लागवडीसाठी वापरतात. झाडांची फांद्या कापताना त्या पिचणार नाहीत याची काळजी घेऊन हलकेच कापाव्यात. शक्य असल्यास काप तिरका द्यावा म्हणजे मुळे येण्यासाठी जास्त जागा मिळते. झाडापासून फांदी कापल्यावर तिची देठे ठेवून सर्व पाने कापून टाकावीत. पाने ठेवली तर फांदीला मुळे फुटण्यास लागणारे अन्नद्रव्य कमी प्रमाणात मिळते, पाने फांदीमधील अन्न वापरतात. ही पाने जगण्याची शक्यताच नसते, त्यामुळे ती काढून टाकलेलीच बरे. फांद्यांना चांगली मुळे येण्यासाठी, आवश्यक संजीवके मिळण्यासाठी, या फांद्यांना रुट हार्मोन्स (बाजारात कॅरडॅक्स नावाने मिळते)मध्ये काठीचे टोक बुडवून मग मातीत लावावे. रुट हार्मोन पावडर स्वरूपात मिळते, अर्धा चमचा कॅरडॅक्स पावडर कपभर पाण्यात मिसळून त्यात कापलेल्या फांदीचा, काडीचा खालचा भाग बुडवून नंतर ती काडी मातीत लावावी. पिशवीत कुंडीत जेथे आपल्याला कटिंग लावायची आहेत ती माती कोरडी असावी, ओल्या मातीत मुळे फुटण्यास आवश्यक उष्णता नसते किंवा वाफसा स्थिती मिळत नाही.

काही झाडांच्या फांद्या कापून मातीत लावल्या तर त्यांना मुळे येण्याची शक्यता कमी असते, अशा झाडांची ‘गुटीकलमे’ करून त्यांची अभिवृद्धी करतात. लिंबू, पेरू, दालचिनी, कवठी चाफा, डाळिंब, हायब्रीड जास्वंदी इ.ची अभिवृद्धी गुटीकलमाद्वारे करता येते. ते झाडावरच करतात. झाडाची परिपक्व फांदी निवडून तिच्या सालीवर पूर्णवर्तुळाकार चीर मारतात, दुसरी चीर पहिल्या चिरेजवळ साधारण १ सें.मी.वर मारतात. या दोन्हींच्या मधली फांदीची साल अलगद काढून टाकतात. त्या कापावर ‘कॅरेडॅक्स’ची पावडर लावतात व त्यावर मॉस ओले करून किंवा काळ्या मातीचा गोळा करून लावतात. त्यावर पोत्याचा तुकडा किंवा एखादा प्लास्टिक पेपर घट्ट गुंडाळतात, त्याच्या दोन्ही बाजू दोरीने घट्ट बांधतात. साधारण पंधरा-वीस दिवसात मुळे फुटू लागतात व महिन्याभरात ही गंडाळी घट्ट होते. त्यामधून आपल्याला मुळे दिसू लागतात. साधारण होळीनंतर वातावरणात आर्द्रता असताना करतात. जर गुटीकलम बांधलेल्या जागेचा ओलावा कमी झाल्यास एखाद्या जुन्या इंजेक्शनच्या सीरिंजमध्ये पाणी घेऊन ते इंजेक्ट करून ओलावा टिकवता येतो. हा गोळा घट्ट झाल्यावर व मुळे दिसू लागल्यावर ज्या फांदीला गुटी बांधली आहे तिच्या मुळाच्या खालच्या बाजूस जाडीच्या एक चतुर्थाश फांदीला कट देतात, आठवडय़ाने परत एकचतुर्थाश कट देतात व आठवडय़ाने गुटी झाडापासून अलग करून त्यावरील बांधलेले प्लास्टिक काढून टाकतात. मॉस काढण्याची गरज नसते. दोऱ्या कापून टाकतात व फांदीची कुंडीत लागवड करतात. अशा पद्धतीने जी अभिवृद्धी करतात त्याला ‘गुटीकलम’ असे म्हणतात. ही बनवायला सोपी असतात. काही झाडांच्या फांद्यांना मुळे येत नाहीत. त्यांची गुटी कलमेपण होत नाहीत. अशा झाडांची अभिवृद्धी भेटकलम, डोळे भरून किंवा पाचर मारून कलम करतात. आपल्याला झाडे वाढविण्यात जेवढा आनंद मिळतो त्यापेक्षा जास्त आनंद आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या झाडांची अभिवृद्धी करून मिळतो.

स्रोत

No comments:

Post a Comment