गृहवाटिका : कुंडीतील झाडांची छाटणी

कुंडीतील झाड वाढल्यानंतर, फुलं यायला लागल्यानंतर निगा राखण्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे झाडांची छाटणी. झाडांच्या छाटणीमागे दोन-तीन प्रमुख कारणे असतात. एक-वाळलेला झाडाचा भाग काढून टाकण्यासाठी झाड छाटावं लागतं.

दोन- झाडांना छान आकार देण्यासाठी झाड छाटावं लागतं. मोठय़ा बागांमध्ये झाडांना छान छान आकार दिलेले आढळून येतात. आपल्या गृहवाटिकेतसुद्धा एखादे कुंडीतील झाड छान आकार दिलेले असावे. त्यासाठी लहान पाने असलेली झाडं वापरावीत. उदा. डय़ुरांडा. मिनिएचर तगर, मिनिएचर अेक्झोरा, इ. तसेच कुंडीचा आकार आणि झाडांचा आकार एकमेकांना साजेसा असावा. थोडक्यात छान आकार देण्यासाठी किंवा आकार मर्यादित ठेवण्यासाठी झाडांची छाटणी आवश्यक आहे.

तिसरं महत्त्वाचं म्हणजे झाडाला बहर येण्यासाठी झाडाला फुलं/फळं येऊन गेल्यावर लगेच या फांद्या कापाव्या. त्यामुळे झाडाचा आकार मर्यादित तर राहतोच, पण पुढचा बहर येण्यासाठी खूप मदत होते.
छाटणी कशी करावी?

यासाठी आपण झाडाच्या फांदीची रचना लक्षात घेऊ. पान फांदीला जिथे चिकटलेले असतं, त्या पॉइंटला पेर म्हणतात. त्या ठिकाणी ‘डोळा’ असतो. डोळ्यातून नवीन फूट येते. फांदी कापताना ती पानाच्या लगेच वर कापावी. त्यामुळे त्याखालील डोळ्यातून फूट येऊन नवीन फांदी वाढेल. फूल आल्यानंतर कापायच्या वेळी जर फांदीचे निरीक्षण केलं तर काही डोळे मोठे होऊन त्यातून फूट यायला सुरुवात झालेली दिसेल. तेव्हा ती नवीन फूट ठेवून त्यावरील फांदीचा भाग कापावा.


फांदी छाटलेल्या ठिकाणच्या खालचे डोळे मोठे होऊन तिथून नवीन फूट येते. हे लक्षात घेतले म्हणजे झाडाचा आकार चांगला दिसण्यासाठी फांदी कुठे कापली असता आकार चांगला दिसेल, हा विचार करणे शक्य होईल.

फांदी कापण्यासाठी सीकॅटर किंवा चांगली धार असलेल्या कात्रीचा उपयोग करावा. काही वेळा सूर्यप्रकाश भरपूर असूनही झाडांना फुले येत नाहीत. अशा वेळी झाडांचा ‘शेंडा खुडणे’ ही क्रिया उपयोगी पडते. फांदीचा पुढचा म्हणजे शेंडय़ाखालील भाग कोवळा असतो.

शेंडा खुडण्यासाठी आपल्या हाताच्या नखांचा वापर करावा. फांदीचा कोवळा शेंडा खुडला की त्याखालील पानांमधून फूट येते आणि त्या नवीन फुटलेल्या फाद्यांना लवकर फुले येतात. उदा. जास्वंद, शेवंती, इ. शेंडे खुडून आपण वेलींचेही झुडपात रूपांतर करू शकतो. वेलींचे शेंडे खुडल्यावर त्यांना वेलफांद्या फुटतात आणि लवकर फुले येतात.

छाटलेल्या फांद्यांचा उपयोग आपण नवीन झाड तयार करण्यासाठी करू शकतो. छाटलेली फांदी ही कंपोस्टोपयोगी आहे. त्यामुळे तिचे तुकडे करून झाड कापलेल्या कुंडीतच ते तुकडे परत टाकावेत, किंवा खत कुंडीत टाकावे. थोडक्यात त्याचा पुनर्वापर करावा. मात्र किडींमुळे खराब झालेली फांदी अथवा पाने घेऊ नयेत.

गृहवााटिका बहरण्यासाठी वेळोवेळी झाडांची छाटणी तसेच ‘शेंडा खुडणे’ या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत.

स्रोत

No comments:

Post a Comment