काजू मोहोर संरक्षण कसे करावे?

काजू हे परदेशी चलन मिळवून देणारे महत्त्वाचे पीक आहे. ते खऱ्या अर्थाने योग्यच आहे. कारण काजूगराच्या निर्यातीमधून आपल्या देशाला मोठया प्रमाणात परकीय चलन मिळते.

काजू हे परदेशी चलन मिळवून देणारे महत्त्वाचे पीक आहे. ते ख-या अर्थाने योग्यच आहे. कारण काजूगराच्या निर्यातीमधून आपल्या देशाला मोठया प्रमाणात परकीय चलन मिळते. महाराष्ट्रामध्ये होणा-या फळबाग लागवडीखाली येणा-या क्षेत्राचा विचार करता काजू पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.

महाराष्ट्रात एकूण काजू लागवडीखालील क्षेत्र १.७५ लाख हेक्टर असून एकूण उत्पादकता १.५० लाख टन एवढी आहे. तथापि देशाच्या काजू उत्पादकतेचा विचार करता आपल्या देशाची सरासरी प्रति हेक्टर काजू उत्पादकता ही ८६५ किलो आहे. महाराष्ट्रात काजू पिकाचे सरासरी १.५ टन प्रति हेक्टरी एवढे उत्पादन मिळते. काजू पिकाच्या उत्पादन वाढीसाठी अनेक गोष्टी महत्त्वाच्या असून पीक संरक्षण ही एक महत्त्वाची बाब आहे.

काजू पिकाचा विचार क रता एकूण ६० किडींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. काजू पिकापासून जास्त उत्पादन मिळवण्यासाठी काजू मोहोराचे वेळीच संरक्षण करणे खूप महत्त्वाचे असून त्याकडे दुर्लक्ष केल्यास साधारणपणे ३० ते ५० टक्के काजू पिकाचे नुकसान होऊ शकते.

काही वेळा नुकसानीची पातळी १०० टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे या पिकाचे मोहोराचे वेळी कीड नियंत्रण करून मोहोर संरक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे. अन्यथा संपूर्ण पीक हातचे जाऊ शकते. शेतक-याला जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी काजू मोहोर संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. काजू माहोरावर येणा-या किडी व त्याचे नियंत्रण याबद्दल थोडक्यात माहिती पुढे दिली आहे:


१. काजूवरील ढेकण्या (टी मॉस्किटो): ही काजूवरील अतिशय महत्त्वाची कीड आहे. या किडीमुळे काजूच्या उत्पादनात ३० टक्के घट येऊ शकते व काही वेळा हे प्रमाण ५० ते ६० टक्केदेखील होऊ शकते. या किडीचा पूर्ण वाढलेला ढेकूण हा डासाच्या आकाराचा असतो. त्याच्या डोक्यावरील भाग बदामी तांबडा किंवा काळा असतो. पोटाचा पुढील भाग पांढरा असतो व बाकीचे शरीर काळया रंगाचे असते. पाठीवरील बारीक टाचणीसारखा भाग वर आलेला दिसतो.

जीवनक्रम: या किडीची मादी कोवळया पालवीच्या देठामध्ये तसेच पानांच्या दांडयांमध्ये सालीच्या आत अंडी घालते. अंडी १.५ ते २ मि.मी लांब असतात. एक मादी साधारणत: ५० अंडी घालते. ज्या ठिकाणी अंडी घातलेली असतात. त्या ठिकाणच्या सालीमधून दोन बारीक केसासारखे भाग वर आलेले दिसतात. अशा अंडयांमधून ६-७ दिवसांमध्ये तांबूस रंगाची मुंग्याप्रमाणे दिसणारी लहान लहान पिल्ले बाहेर पडतात. पिल्लांचे पूर्ण वाढलेल्या ढेकणात रूपांतर होण्यास १२ ते १५ दिवसांचा कालावधी लागतो. या किडीचा संपूर्ण जीवनक्रम पूर्ण होण्यास साधारणत: २५ दिवस लागतात.

नुकसानीचे प्रकार: या किडीचा प्रादुर्भाव ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कोवळी पालवी फुटू लागल्यानंतर सुरू होतो व जानेवारी महिन्यामध्ये मोठया प्रमाणावर आढळून येतो. या किडीची पिल्ले तसेच ढेकूण कोवळया पालवीतून, देठामधून, पानांमधून व कोवळया मेाहोरामधून रस शोषून घेतात व त्याच वेळेला विषारी पदार्थ सोंडेवाटे आत सोडतात. त्यामुळे प्रादुर्भित ठिकाणी प्रथम पांढरट ठिपके पडतात व नंतर ते वाढत जाऊन २४ तासांत प्रादुर्भित भाग काळा पडतो.

मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झाला असेल तर पालवी, मोहोर वाळून जातो. एक पूर्ण वाढलेले पिल्लू एका दिवसात ११४ ठिकाणी तर ढेकूण (प्रौढ) ९७ ठिकाणी काळे ठिपके पाडू शकतो. या किडीचा प्रादुर्भाव कोवळया फळांवरदेखील होतो. त्या वेळेला फळावर काळया रंगाचे गोलाकार खड्डे पडतात. कोवळया फळांची गळ होते. या किडीचा प्रादुर्भाव साधारणत: कोवळया पालवीवर २५ टक्के, मोहोरावर ३० टक्के, आणि कोवळया फळांवर १५ टक्के आढळून येतो.

नियंत्रणाचे उपाय: या किडीच्या नियंत्रणासाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले व अन्य संशोधन केंद्रावर झालेल्या संशोधनाच्या निष्कर्षावरून कीटकनाशकांच्या तीन फवारण्याची शिफारस करण्यात आली आहे. पहिली फवारणी ३६ टक्के प्रवाही मोनोक्रोटोफॉक्स १.५ मि.ली. किंवा ५ टक्के प्रवाह लॅम्बडा सायहॅलोथीन ०.६ मिली, किंवा ५० टक्के प्रवाही प्रोफे नोफॉस १ मिली प्रति लिटर पाण्यातून कोवळया पालवीवर तर दुसरी फवारणी ३५ टक्के प्रवाही एंडोसल्फान १.५ मि.ली. प्रति लिटर पाण्यातून मोहोरावर व तिसरी फवारणी फलधारणा सुरू झाल्यानंतर ५० टक्के कार्बारील २ ग्रॅम, किंवा ५ टक्के प्रवाही लॅम्बडा सायहॅलोथीन ०.६ मिली किंवा ५० टक्के प्रवाही प्रोफेनोफॉस १ मिली प्रति लिटर पाण्यातून करावी.

स्रोत

No comments:

Post a Comment