गच्चीवरची बाग : भाताचे गवत, पालापाचोळा

नैसर्गिक संसाधने गच्चीवरची बाग फुलवण्यात मोलाची भूमिका बजावतात. भाताचे गवत हे त्यापैकीच एक.

आंब्याच्या पेटीत किंवा चिनी मातीच्या कुंडय़ा/शोभेच्या वस्तू वगैरेंच्या खोक्यांमध्ये हे गवत सहज पाहायला मिळते. भाताचे गवत खत म्हणून खूपच उत्तम असते. हे गवत भिजल्यावर त्याचे झपाटय़ाने खत तयार होते. यातून झाडांच्या पाढंऱ्या मुळांना उच्च प्रतीचे खत मिळाल्यामुळे कुंडीतील झाडांची वाढ झपाटय़ाने होते.

भाताच्या गवताचे बारीक तुकडे करून किंवा आहे तसेही ते कुंडीच्या तळाकडून चौथ्या थरात वापरावे. हे झाडांच्या वरील भागात आच्छादन म्हणूनही वापरता येते. कोरडय़ा स्थितीत हे गवत दीर्घकाळ संग्रही ठेवता येते. रिपॉटिंग करण्यासाठी याचा अवश्य वापर करावा. भाताचे गवत कुंडीत पर्यायी थर म्हणूनही वापरता येते.

या गवताप्रमाणेच, झाडांचा पालापाचोळा जो अगदी सहज उपलब्ध होतो, त्याचाही मोठय़ा प्रमाणावर खतनिर्मितीसाठी उपयोग करता येतो. अनेकदा पालापाचोळ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो जाळला जातो, त्यामुळे हवेचे प्रदूषण तर होतेच, शिवाय तापमानवाढीत त्यामुळे भर पडते. अन्यथा कचरा म्हणून तो डिम्पग ग्राऊंडवर टाकला जातो. खरे तर पालापाचोळा हा झाडांच्या वाढीसाठी उपयुक्तअसतो. त्यातून मोठय़ा प्रमाणात झाडांना नत्र पुरवठा होतो, पण त्यासोबत इतर अनेक सूक्ष्म घटकही मिळतात.


मात्र बागेत कुंडय़ा भरण्यासाठी पालापाचोळा वापरताना तो सुकवलेलाच वापरावा. कारण ओल्या कचऱ्यात उष्णता असते. त्याचे खत तयार होताना उष्णता बाहेर पडते व त्यातून झाडांच्या मुळांना हानी पोहचण्याची शक्यता असते. एखाद्या चौकोनी जाळीत ओला पालापाचोळा संग्रहित करून ठेवावा म्हणजे त्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन तो लवकर सुकतो. कुंडीच्या भरणपोषणासाठी पालापाचोळ्यात जितकी विविधता असेल तेवढी उत्तम. म्हणजे बागेतील कुंडय़ांतील झाडांना विविध प्रकारची सूक्ष्म जीवनसत्त्वं निरंतर मिळत राहतात. त्यातून पिकवलेला भाजीपालाही चांगला चवदार व पोषक तयार होतो. बदाम, निलगिरी, काजू, शेवगा, शेवरी, आंबा, जंगली झाडे- अशा कोणत्याही उपयोगी, निरुपयोगी झाडांचा पालापाचोळा उपयोगात आणता येतो.

स्रोत

No comments:

Post a Comment