गृहवाटिका : गुलाब फुलेना

आकर्षक रंग आणि सुंदर मोठ फुल असलेलं गुलाबाचं झाड नर्सरीतून घरी आणल्यावर पहिल्यांदा २-३ फुले येतात आणि नंतर फुले येईनाशी होतात, हा अनुभव बरेच जणांचा आहे.

गुलाबाच्या फुलांचे आपण सर्वसाधारण ३ विभाग करूया.

१) आकर्षक रंग, मोठय़ा आणि जाड पाकळ्या, मोठ फुल असा ‘कलमी गुलाब’. (कलमी गुलाब हे आपण फक्त नाव दिलं आहे. खालील दोन्ही प्रकारचे गुलाब पण कलम करून वाढवता येतात.)
२) छान रंग, ‘कलमी’ गुलाबाच्या पाकळ्यांपेक्षा पातळ पाकळ्या आणि मध्यम आकाराची फुले असलेला ‘गावठी गुलाब’.
३) छान रंग, वरील दोन प्रकारच्या गुलाबांच्या मानाने बारीक पाकळ्या आणि पानं असलेला ‘मिनिएचर गुलाब’.
कलमी गुलाबाची रोपे ‘डोळा भरून’ म्हणजेच कलम करून केली जातात. डोळा भरणे ही झाडावर केलेली ‘शस्त्रक्रिया’ आहे. यासाठी जंगली गुलाबाच्या फांद्या आणि ज्या रंगाचा गुलाब पाहिजे त्याचा ‘डोळा’ वापरला जातो. ‘डोळा’ म्हणजे पानाजवळून नविन फूट ज्या ठिकाणाहून येते तो भाग.


गुलाबाला कलम करताना, जंगली गुलाबाच्या फांदीतला एक ‘डोळा’ छेद देऊन काढला जातो आणि त्या जागी मोठय़ा आकर्षक रंगाच्या गुलाबाच्या फांदीतला (उदा. पिवळ्या रंगाचा गुलाब) डोळा लावला जातो. पिवळ्या गुलाबाचा डोळा काढून, पुढे फांदी होऊन त्या फांदीला पिवळ्या गुलाबाचे फुल येते. मात्र, या एका फांदी व्यतिरिक्त, फांदीखालचा उरलेला झाडाचा भाग जंगली गुलाबाचा असतो. काही दिवसांनी या जंगली गुलाबाच्या भागातून जोमाने फूट येऊन फांदी लांब वाढते. आपलं लक्ष या नविन फांदीकडे असतं. पिवळ्या गुलाबाचं फुल फुलून गेलेली फांदी थोडी वाढते, एखादं फूलही येतं. मात्र पुढे ती फांदी व वाढता सुकून गेली तरी लक्षातसुद्धा येत नाही. कारण आपल लक्ष लांब वाढलेल्या फांदीकडे असतं. आणि ही लांब वाढलेली फांदी पिवळ्या गुलाबाची नसून जंगली गुलाबाची असते. त्यामुळे पिवळ्या गुलाबाची फांदी गेल्यानंतर उरतो तो जंगली गुलाब आणि त्याला लगेच फुल येणं अशक्य. आपल्याला मात्र वाटतं की आपण आणलेला पिवळा गुलाब वाढतोय छान, पण फुल काही येत नाही.

अशी फसगत न होण्यासाठी गुलाबाच्या झाडाचं निरीक्षण करा. नविन फुटलेली फांदी जर फुल आलेल्या फांदीतून किंवा फुल आलेल्याच फांदीच्या अगदी सुरुवातीच्या भागातून आली असेल तर ती पिवळ्या गुलाबाची असेल. मात्र पिवळं फुल आलेल्या फांदीच्या पेराच्या खालच्या भागातून अर्थात खालच्या पेरातून आली असेल तर ती नक्कीच जंगली गुलाबाची आहे. ही फांदी लगेच कापून टाका, तिला वाढू देऊ नका. आणखीन निरीक्षण केल्यास असं आढळेल की जंगली गुलाबाची पानं, पिवळ्या गुलाबाच्या पानांपेक्षा जरा अरुंद आणि लांबट आहेत.

जेव्हा जंगली गुलाब वाढू न देता फक्त पिवळ्या गुलाबाच्या फांद्याच वाढू दिल्या तर प्रश्न काहीसा सुटेल. मात्र कलमी गुलाबांना थंड आणि कोरडी हवा आवडते. त्यामुळे मुंबईसारखे दमट हवामान असेल तर हे गुलाब कमी फुलतात.

गुलाबाची फुलं झाडावर सतत हवी असल्यास मध्यम आकाराच्या फुलांचे ‘गावठी गुलाब’ (हे नाव या लेखापुरते वापरले आहे) किंवा ‘मिनीएचर गुलाब’ लावावेत. हे दोन्ही दमट हवामानातदेखील भरपूर फुलतात. ‘गावठी गुलाबांच्या’ पाकळ्या २-३ दिवसांनी गळून जातात. मात्र मिनीएचर गुलाबाच फुल १०-१५ दिवस झाडावर टिकतं आणि त्यांची विशेष काळजी घ्यावी लागत नाही. नेहमीच, फुल येऊन गेलं की फांदीचा पुढचा भाग लगेच कापावा.

स्रोत

No comments:

Post a Comment