माती आणि सूर्यप्रकाश

कुंडीत झाड लावताना आणि त्याची निगा राखताना पुढील ४ गोष्टींचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. कुंडी, कुंडी ठेवण्याच्या जागी उपलब्ध असलेला सूर्यप्रकाश, माती आणि पाणी. गेल्या लेखात दिल्याप्रमाणे योग्य कुंडीची निवड केल्यानंतर झाड लावण्यासाठी पुढची गरज म्हणजे माती.

झाडाला माती जितकी चांगली मिळेल तितके ते सुदृढ राहील. झाड सुदृढ असलं की त्याची रोगप्रतिकारक शक्तीही चांगली राहते आणि त्यावर रोग, किडी यांचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यासाठी उपलब्ध असलेल्या मातीमध्ये १:१ (एकास एक ) या प्रमाणात कंपोस्ट मिसळावे. हे मिश्रण झाड लावण्यास वापरावे. पालापाचोळा, फुले, भाज्या किंवा फळे यांचा टाकाऊ भाग इत्यादी पदार्थ कुजल्यानंतर तयार होणारी माती म्हणजे कंपोस्ट. गृहवाटिकेत घरच्या घरी कंपोस्ट कसं तयार करायचं हे आपण पुढच्या लेखांमध्ये बघणार आहोत. शेणखत वापरायचं असल्यास माती आणि कंपोस्ट या मिश्रणाच्या एक अष्टमांश, इतकंच शेणखत त्यात मिसळावं. शेणखत जास्त झाल्यास, तयार होणाऱ्या उष्णतेमुळे झाडं मरण्याची शक्यता असते.

थोडक्यात, उपलब्ध मातीत, एकास एक या प्रमाणात कंपोस्ट आणि या मिश्रणाच्या एक अष्टमांश शेणखत मिसळलेली माती झाडं लावायला वापरावी. गृहवाटिकेसाठी याव्यतिरिक्त खतं वापरायची आवश्यकता नाही. कंपोस्ट तसेच शेणखत नसल्यास उपलब्ध मातीच झाड लावायला वापरावी. फक्त मातीतले वाटाण्यापेक्षा मोठय़ा आकाराचे दगड काढून टाकावे. माती चाळण्याची आवश्यकता नाही. या मातीची गुणवत्ता नेहमीच चांगली कशी राहील हे आपण ज्या पद्धतीने झाडांची निगा राखणार आहोत त्यावर अवलंबून आहे. पुढच्या लेखांमध्ये याचा उल्लेख येईल. या पद्धतीमुळे माती बदलण्याची किंवा माती उकरण्याची गरज भासत नाही.


‘माती जुनी झाली’ असं ऐकायला मिळतं. हा एक गैरसमज आहे. बरेच दिवस कुंडीत पडून राहिलेली माती वापरायची असल्यास, ती सगळी माती मोकळी करून २-३ दिवस उन्हात ठेवावी आणि मग त्याच्यात नवीन झाड लावावे. मातीमध्ये गांडुळे, आणि इतर अनेक प्रकारचे छोटे कीटक असतात की जे माती भुसभुशीत ठेवायला मदत करतात. झाडाप्रमाणेच, या सर्वाचेही, कुंडीतली माती आणि पर्यायाने कुंडी घरच आहे.

सूर्यप्रकाश
* घरात बाग करताना जी गोष्ट बरेच जण विचारात घेत नाहीत ती म्हणजे सूर्यप्रकाश. प्रत्येक झाडाला वाढीसाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो. फक्त झाडानुरूप त्याचं प्रमाण बदलतं. सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने झाडांची पानं, पाणी आणि हवेतील कार्बन डाय आक्साईड वापरून स्वत:साठी लागणारं अन्न तयार करतात. मातीतील सोडियम, पोटॅशियम, नायट्रोजन आणि इतर द्रव्ये झाडाच्या वाढीसाठी मदत करतात. झाडाचे अन्न हे आपल्याप्रमाणेच विविध पिष्ट व स्निग्ध पदार्थ या स्वरूपाचे असते. खत हे झाडाचे अन्न नव्हे.
* फूलझाडांना ४ ते ५ तास ऊन किंवा थेट सूर्यप्रकाश लागतो तर शोभेच्या झाडांना अर्धा तास पुरतो. यात सकाळी किंवा संध्याकाळी अशी विभागणी करण्याची आवश्यकता नाही. फूलझाडांना ऊन कमी मिळालं तरी झाडं जगतील, वाढतील पण खूप कमी फुलं येतील. तसेच फुलांचा रंग देखील गडद होणार नाही. ऊन कमी असेल तर कृष्णतुळशीची पाने देखील काळपट न होता हिरवीच राहतील.
* शोभिवंत झाडांना कमी सूर्यप्रकाश चालत असला तरी एरवी ती उजेडात असावीत. शोभिवंत झाडांची शोभा त्यांच्या पानांवरील विविध रंगांमुळे येते. ऊन आणि उजेड कमी पडल्यास रंगांमधील फरक कमी होतो आणि शोभा कमी होते.

स्रोत

No comments:

Post a Comment