मातीविना शेती

शेतातील पिके जमिनीवर उभ्या किंवा रांगत्या स्थितीत वाढताना दिसतात. त्यांची मुळे मात्र दिसत नाहीत, कारण ती मातीत रुतलेली असतात. माती पिकांच्या मुळांना आधार देते. त्याचबरोबर वनस्पतींना आणि त्यांच्या मुळांना वाढीसाठी लागणारे पोषक वातावरण व आवश्यक अन्नद्रव्ये पुरविते. पण हे घटक इतर कुठून मिळाले तर वनस्पती मातीशिवायही वाढू शकते. असे मातीविना वनस्पतींच्या वाढीचे तंत्र १९३० साली विकसित झाले. त्यास ‘हायड्रोपोनिक्स’ म्हणतात. हायड्रोपोनिक्स हा शब्दप्रयोग ग्रीक भाषेतील आहे. त्याचा अर्थ ‘पाण्याला काम करू द्या’ असा होतो.

मातीशिवाय शेतीचे तंत्र प्रामुख्याने हरितगृहात वापरले जाते. या तंत्रपद्धतीमुळे जेथे जमीन नाही तेथेदेखील शेती करता येते. नारळांच्या काथ्यापासून दोरी आणि तत्सम उद्योग बनविण्याच्या उद्योगातील कोकोपीट हा एक टाकाऊ घटक. या कोकोपीटच्या माध्यमात मुळांची चांगली वाढ होते. या पिकांना अन्नद्रव्याचा पुरवठा ठिबक सिंचनाने केला जातो. त्यास फर्टगेशिंन म्हणतात. यासाठी पाण्यात विद्राव्य रासायनिक क्षार वापरले जातात. पिकाचे रोगापासून रक्षण व्हावे म्हणून बुरशीनाशके फवारली जातात. हरितगृहातील आद्र्रतेचे व प्रकाशाचे नियंत्रण केले जाते. प्रामुख्याने फुलझाडे, विलायती भाज्या, कुंडय़ांतील शोभेची झाडे इत्यादींची लागवड करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग केला जातो.


बाजारपेठेच्या गरजेप्रमाणे अशी मातीविना शेती केली तर ती फायदेशीर होऊ शकते. शहरात गच्ची, बाल्कनीचा वापर करूनही अशी शेती करता येते. झाडे वाढविण्यासाठी मुळांना आधार व पोषक वातावरण मिळावे, म्हणून रसवंतीमधील ऊसाची टाकाऊ चिपाडे, नारळांच्या शहाळ्यांचे कवच इत्यादींचे बारीक तुकडे करून वापर करता येतो. हे बारीक तुकडे मोठय़ा कुंडय़ा, वाया गेलेली पिंपे यांमध्ये भरली असता झाडे वाढू शकतात. रासायनिक विद्राव्य क्षार पिकांचे अन्न म्हणून वापरता येतात. अशा पद्धतीने आपणास रोज लागणाऱ्या फळे आणि पालेभाज्या जसे, दुधी, दोडका, कारली, पालक, कोथिंबीर, कढीपत्ता, टोमॅटो, वांगी इत्यादींची लागवड सहज होऊ शकते. ही उत्पादने रोगमुक्त व विषारी औषधांचा वापर न करता घेतलेली असतात.

स्रोत

No comments:

Post a Comment