गच्चीवरची बाग : उसाचे चिपाड आणि वाळलेल्या फांद्या

मातीबरोबर कुठल्या नैसर्गिक बाबींचा वापर आपण गच्चीवर बाग फुलवण्यासाठी करू शकतो, याविषयी आपण माहिती घेत आहोत. नारळाच्या शेंडय़ांप्रमाणेच उसाचे चिपाड हेही नैसर्गिकपणे उत्तम बाग फुलवण्याचे साधन ठरू शकते. रसवंतीगृहाबाहेर मुबलक प्रमाणात उसाचे चिपाड आढळून येते. मात्र उसाचे चिपाड हे वाळलेल्या स्वरूपातच वापरावे. ओले वापरू नयेत. त्यात अळ्या तयार होण्याचा संभव असतो. सुकलेले उसाचे चिपाड हे दीर्घकाळ संग्रही ठेवता येते. छोटय़ा कुंडय़ांमध्ये वापरावयाचे असल्याने त्याचे बारीक काप किंवा भुगा तयार करून घ्यावा. वाळलेल्या चिपाडाचा हातानेही भुगा होतो.

उसाच्या चिपाडाचा भुगा वा छोटे तुकडे हे कुंडी किंवा वाफ्यात तळाकडून दुसरा थरांत वापरावे. यात स्फुरद (पिकांना लागणाऱ्या महत्वाच्या पोषक द्रव्यांपैकी एक महत्त्वाचे मूलद्रव्य) व साखरेचे प्रमाण असल्यामुळे त्याचे उत्तम खत तयार होते. तसेच कुजलेले चिपाड हे गांडुळांचे आवडते खाद्य असल्याने, त्यांचे कुंडीत किंवा वाफ्यात ४ ते ६ महिन्यांत प्रक्रिया खत तयार होते. खत तयार होता होताच कुंडीत झाडांची मुळे त्याच गतीने विघटन करतात. यात झाडांच्या पांढऱ्या मुळ्या अधिक संख्येने व झपाटय़ाने वाढतात. पांढऱ्या मुळांची संख्या जेवढी जास्त तेवढे झाड फळधारणा करते.


उसाची ओली चिपाडे घेतल्यास त्याला मुंग्या लागतात. पण सुकवून घेतल्यावर त्यातली साखर ही घनपदार्थात रूपांतरित होते. त्यामुळे मुंग्या फिरकत नाहीत. उसाच्या चिपाडाप्रमाणे वाळलेल्या काडय़ा/फांद्या यांचाही वापर आपल्याला कुंडीत माती भरताना करता येईल.

कुंडी किंवा वाफा भरताना त्यात १ सेंमीपेक्षा कमीजाडीच्या काडय़ा, सुकलेल्या फांद्या यांचा तळाकडून तिसरा थर द्यावा. काडय़ा या कुंडी किंवा वाफ्यात पुरेशी जागा तयार करतात. त्यात हवा खेळती राहते. हवेचा पांढऱ्या मुळ्या वाढीस उपयोग होतो. ज्या काही काडय़ा वापरणार त्याचे बारीक तुकडे करून घेतल्यास उत्तम किंवा आहे तशाही वापरता येतात. यात कार्बनचे प्रमाण तयार होते. तसेच काही प्रमाणात ओलावा टिकवून ठेवतात. तुळस, गाजर गवत, बाजरी, मका, गहू यांची वाळलेली गवते, छोटी झुडुपे किंवा फांद्या यांचा काडय़ा म्हणून वापर करता येतो. याचेही प्रक्रियेत खत तयार होते व ते बागेतील झाडांना उपयुक्त ठरते.

स्रोत

No comments:

Post a Comment