हिरवा कोपरा : नमन हिरवाईच्या मित्राला – संजीवक ऊर्जेला

एकवीस जून ते एकवीस डिसेंबर या सहा महिन्यांत दिनमान कमी होत गेले होते, पण सूर्याच्या मिळणाऱ्या ऊर्जेवर आपण आपली परसबाग फुलवली, बीज अंकुरले, रोपं तरारली, पाने, फुले, फळे धरली. या सगळ्या हिरवाईतून आपल्याला ऊर्जा मिळाली. त्यासाठी आपणही बागेत श्रमदान करून ऊर्जा वापरली. म्हणजे उर्जेचे चक्र आपल्या बागेत चालू होते. आज सकाळी बागेत काम करताना सहाव्या मजल्यावरून पूर्वेकडील लालिमा दिसत होता, अन् ललत रागातले पं. वसंतरावांचे सूर कानावर पडत होते. ‘तेजोनिधी लोहगोल’ अन् काही क्षणातच क्षितिजावरून वर आले तेज:पुंज सूर्यिबब. लवकरच हा मित्र मकर राशीत संक्रमण करेल. आपले संपूर्ण जीवन सूर्याभोवती फिरत आहे.

चराचराला ऊर्जा देणारा भास्कर २१ डिसेंबरपासून उत्तरेकडे सरकायला लागला आहे. आता तिळातिळाने दिनमान वाढेल अन् कणाकणाने वाढेल सूर्याकडून मिळणारी ऊर्जा. आपल्या बागेचा ऊर्जा स्रोत हा, त्याचे कोटी कोटी किरण झाडांवर पडतील अन् आंतरिक गुणाने झाडे त्याचे अमृतकण करतील. सृष्टीतील अणू रेणू या किरणांनी उजळून जातील. कोटय़वधी वर्षांपासून सूर्योदयाच्या तेजाचा नित्यनूतन आविष्कार सुरू आहे अन् सृष्टीच्या उत्पती-लयाचा, जीवन-मरणाचा व्यापसुद्धा निरंतर चालू आहे. याचा अनुभव आपल्या परसबागेत येतच असतो. ग्रहमंडलातील ही दिव्यमूर्ती दाहक असली तरी चतन्यदायी व संजीवक आहे. सूर्याची किरणप्रभा बल, आरोग्य देणारी आहे म्हणूनच यास तरुणारुण म्हटले आहे.


या व्योमराजाच्या तेजाने जीवनविकास होऊ दे, सृष्टी सुजलाम् सुफलाम् होऊ दे, तूच वसुंधरेची लाज राख हे जणू पसायदान बुवांनी मागितले आहे. या लालित्यपूर्ण आविष्काराला आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर सूर्याकडून पृथ्वीवर पोहोचणाऱ्या ऊर्जेस इन्सोलेशन (इन्सुलेशन नाही हं) म्हणतात. ही ऊर्जा पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रमाणात पोहोचते म्हणजे प्रत्येक भागाचे इन्सोलेशन वेगळे असते. आपण नशीबवान आपणास भरपूर ऊर्जा मिळते. बर्फाळ प्रदेश कमनशिबी. काही ऊर्जा पृथ्वीकडून परत फेकली जाते. यास अल्बिडो म्हणतात. पांढऱ्याशुभ्र बर्फावरून येणारी ऊर्जा परत फेकली जाते. तेथील अल्बिडो जास्त असतो. जंगल असलेल्या भागात अल्बिडोचे प्रमाण कमी असते, सौरऊर्जा वापरून झाडे अन्न बनवतात व ही ऊर्जा अन्नसाखळीत प्रवेश करते. म्हणून हिरवाई वाढवून ऊर्जा साठवणे महत्त्वाचे आहे.

आता हळूहळू तापमान वाढेल, त्याची दाहकता जाणवेल तेव्हा शहरात अनेक जण घरांच्या गच्चीवर पांढऱ्या रंगाचे लेपन करतील – अल्बिडो वाढविण्यासाठी, ऊर्जा परत फेकण्यासाठी. यामुळे घरातील तापमान वाढणारी नाही पण ऊर्जा वाया जाईल. वातावरणात फेकलेली उष्णता आपणच केलेल्या प्रदूषणाने हवेतच अडकेल अन् तापमान आणखी वाढेल. त्याऐवजी गच्चीवर हिरवाई करून ऊर्जेचे शाश्वत व्यवस्थापन करणे श्रेयस्कर ठरेल. भौतिकशास्त्रातील थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम सांगतो. ऊर्जा निर्माण होत नाही, नष्ट होत नाही तर एक रूपातून दुसऱ्या रूपात संक्रमित होते. एक चौरस फूट जागेतील सूर्य ऊर्जा एका दिवसात तीन ते चार ग्रॅम ग्लुकोज झाडात निर्माण करते. त्यामुळे जास्त सूर्यप्रकाशाने झाडांची जोरकस वाढ होऊन वसंतात सृष्टी बहरून जाईल.

दारव्हेकर बुवा, पं वसंतराव व पं. अभिषेकींच्या अलौकिक कलाकृतीतील जीवनमंत्र लक्षात घेऊन गगनराज सूर्याची ऊर्जा सर्जनशीलतेने, प्रयोगशीलतेने वापरू या!

पूर्वार्ध

स्रोत

No comments:

Post a Comment