भूतकाळाचे वर्तमान : घनदाट सावलीचे सौदागर!

लीकडे रोज नवीन नवीन उभी राहणारी गृहसंकुले, मॉल, टॉवर, तिथपर्यंत पोहोचणारे नवीन रस्ते, जुन्या रस्त्यांचे रुंदीकरण यात शेकडो वर्षे उभी असलेली झाडे व दुर्मीळ वृक्ष नामशेष होऊ लागले आहेत. ठाणे महानगरपालिकेने रस्त्याच्या दुतर्फा आता नवीन व भराभर वाढणारी विदेशी वृक्षांची लागवड करावयास सुरुवात केली आहे. त्यात लाल फुलांचा सडा सांडणारा गुलमोहर (मदागास्कर बेट), पिवळ्या फुलांचा सोनमोहर (सिलोन-अंदमान बेट), जांभळ्या निळ्या फुलांचा नीलमोहर-जॅकारंडा (ब्राझिल) इत्यादी रंगीबेरंगी फुलांनी बहरत असलेले परदेशी वृक्ष रस्त्याच्या दुतर्फा लावले जात आहेत. या वृक्षांमुळे रस्ता आणि सभोवतालच्या परिसराला एक वेगळीच झळाळी येते. राम मारुती रस्ता या वृक्षांमुळेच आता प्रसिद्ध होऊ लागला आहे. ठाणे नगरपालिकेने सुंदर ठाणे दिसण्यासाठी काही देशी फुलझाडांचाही उपयोग केलेला दिसतो. त्यात गुलाबी-लालसर व जांभळ्या रंगाच्या कांचन वृक्षाचा समावेश आहे. ठाण्यातील मासुंदा तलावपाळी परिसर व गोशाळा तलावाच्या ठाणे किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली कांचनाची झाडे लक्ष वेधून घेतात. या साऱ्या सुशोभीकरणात ठाण्यातील पुरातन वृक्षांकडे मात्र दुर्लक्ष होऊ लागले आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते.

एकेकाळी विविध वृक्ष-वेलींनी बहरलेले शांत रमणीय ठाणे ही ठाण्याची ओळख सर्वदूर होती. घंटाळी, टेकडी बंगला येथे बऱ्यापैकी झाडी होती. आमच्या शाळेची सहल घंटाळी मंदिरात गेल्याचे मला स्मरते आहे. ठाण्यात आमराया होत्या हे आज सांगूनही खरे वाटणार नाही, पण ही वस्तुस्थिती होती. कोलशेतचा कलमी आंबा खूप प्रसिद्ध होता. येऊर, वाघबीळ, वडवली, ओवळा, भायंदरपाडा येथून आलेल्या रायवळ, पायरी व बिटकी आंब्याच्या मधुर रसाने ठाणेकरांच्या जिव्हा तृप्त व्हायच्या. सोबत जांभळे, करवंदे, तोरणे, आळू, काजू हे सर्व दिमतीला होतेच. बोरांची झाडेही खूप होती. रस्त्यावर दाट सावली धरणारे सदाहरित वड, पिंपळ, आंबा, चिंच, जांभूळ किंवा लांब-रुंद जाडजूड बांध्याचा महाकाय बाओबा वृक्ष, याला गोरखचिंच किंवा कोरीचिंचही म्हणतात. सहज येता-जाता दिसणारी ही झाडे आता दुर्मीळ झाली आहेत. फेरफटका मारताना ठाण्यातील जुन्या इमारतीभोवती एखाद्दुसरे वृक्ष अंग चोरून उभे असलेले दिसतात. यामध्येच कैलाशपती या प्राचीन वृक्षाची नजरभेट होते. गोखले रोडवर एका गल्लीत हा कैलाशपती वृक्ष आपला जटाभार सांभाळीत उभा आहे. घंटाळीदेवी मंदिराच्या आवारातही हा वृक्ष आहे. ठाणे नगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण कार्यालयात याची नोंद असून पालिका हद्दीत २६२ कैलाशपती वृक्ष आहेत. या वृक्षावर जे फूल उमलते ते शंकराच्या पिंडीसारखे दिसते. त्याचा सुवास सर्वत्र दरवळतो. झाडाची पाने आणि बुंध्यापासून फांद्यापर्यंत शंकराच्या जटासारखे फुटलेल्या लहान लहान पारंब्या, यामुळे वृक्षाचे वेगळेपण आपल्याला आकर्षित करते. सध्याची स्थिती पाहता हा वृक्ष आता दुर्मीळ होत चालला आहे.


बिंब राजवटीत ठाण्यात गावांचे लहान लहान पाडे होते. जसा नौपाडा, मनोहरपाडा तसेच ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलजवळ पिंपळपाडा आहे. हे नाव तेथे असलेल्या पुरातन पिंपळवृक्षामुळे पडले असावे. येथे पिंपळाच्या झाडाभोवती मोठा पार असून पारावर बलभीम मारुतीराया ठाण मांडून बसले आहेत. पिंपळाच्या झाडाचे वय किती असावे? श्रीलंकेतील पिंपळाचे एक झाड जवळजवळ २५०० वर्षे पुरातन आहे. जगातील जास्त आयुष्य असलेल्या वृक्षांपैकी पिंपळ हा एक वृक्ष होय. भारतात तो अतिशय पवित्र मानला जातो. त्यामुळे प्रामुख्याने देवळाच्या परिसरात जास्त करून पिंपळवृक्ष पाहायला मिळतो. गौतम बुद्धाला ज्या वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली तो बोधीवृक्ष म्हणजे पिंपळ होय. प्राच्य विद्या अभ्यासक व भारतातील थोर इतिहास संशोधक डॉ. डी. डी. कोसंबी यांनी त्यांच्या ‘कल्चर अँड सिव्हिलायझेशन ऑफ एन्शन्ट इंडिया इन् हिस्टॉरिकल आऊट लाइन’ या पुस्तकात पिंपळ वृक्षाविषयी बरीच मौलिक माहिती दिली आहे. अशा या प्राचीन पिंपळाच्या फांद्यांचा विस्तार मोठा असतो. पिंपळाचे पान हृदयाच्या आकाराचे असून त्यांना लांब निमुळते टोक असते, फळ अतिशय लहान पानाच्या देठाजवळ आणि फांद्यांवर खोडाला लागून उगवतात. पक्षी ही फळे खातात व न पचलेल्या बिया त्यांच्या विष्ठेबाहेर जिथे पडतात तेथेच उगवून त्याचे मोठे झाड होते. मग ती इमारतीची भिंत असो, माळावरचा कातळ असो किंवा ज्या झाडावर वाढतो त्या यजमान वृक्षालाच पिंपळ खाऊन टाकतो. पिंपळाच्या या विध्वंसक वृत्तीमुळे इमारतीजवळ कोणी पिंपळ लावत नाही.

ठाणे महानगरपालिकेतील वृक्ष प्राधिकरण समितीने केलेल्या गणनेनुसार ठाण्यात ६ हजार १३७ पिंपळ वृक्ष आहेत.
ठाणे नगरपालिकेच्या हद्दीत २ हजार ३३५ वटवृक्ष आहेत. हा विस्तीर्ण महाकाय वृक्ष त्याच्या पारंब्यांमुळे सर्व वृक्षांमध्ये वेगळा दिसतो. मूळचा भारतीय असलेल्या वटवृक्षाला वड आणि चिरंजीव वृक्ष म्हटले आहे. वडाच्या पारंब्या लोंबत जमिनीकडे धाव घेतात. जमिनीत रुजून पुन्हा त्यांचा वृक्ष होऊ लागतो. मूळ वडाचा विस्तार असा वाढत जातो. कोलकता येथील सीनपूर वनस्पती उद्यानातील वटवृक्ष ३५० वर्षांचा आहे. त्याला जवळजवळ ११०० जाडजूड पारंब्या आहेत. सातारा शहराजवळील एका वटवृक्षाचा परीघ ४८३ मीटर इतका आहे. ठाण्यात एअर फोर्स रस्त्यावर एकात एक गुंतलेल्या दाट पारंब्याचा वटवृक्ष आहे. वटवृक्षाची पाने रुंद अंडाकार, वरून गडद हिरव्या रंगाची आणि थोडी फिकट असतात. पिवळ्या लाल रंगाची फळे मार्च-एप्रिलमध्ये येतात. तेव्हा पक्ष्यांची ती खाण्यासाठी झुंबड उडते. वड सदाहरित वृक्ष असल्यामुळे रस्त्याच्या कडेला ती लावली जातात.

घोडबंदर रोडला तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या अलीकडे तीन महाकाय वृक्ष होते. रस्ता रुंदीकरणात तिन्ही झाडे तोडण्यात आली. झाडाचे नाव गोरखचिंच. आम्ही त्याला चोरीचिंच म्हणत असू. नारळाएवढे कठीण कवचाचे फळ त्याला येते. लांब-रुंद २०-२५ फुटांचा घेर असलेला हा वृक्ष म्हणजे ‘बोओबा वृक्ष’. ४०० वर्षांपूर्वी पोर्तुगीज आफ्रिकेवरून त्याला येथे घेऊन आले. बोआबा वृक्षाला इथले हवामान आवडले आणि तो कायमचा इथला रहिवासी झाला. ठाण्यात गडकरी रंगायतनसमोर, वडवली, ओवळा येथेही तो आहे. गोरखचिंच किवा बोओबा वृक्ष बघायचा असेल तर कापूरबावडी पोलीस स्टेशनला यावे लागेल. ३० फूट खोडाचा घेर, ६५ फूट उंच आणि झाडाभोवतीचा पार यामुळे त्याचे देखणे, भव्यरूप पाहातच राहावे असे आहे. हा वृक्ष पाहायला फार दुरून लोक येतात. नगरपालिकेतील हद्दीत अवघ्या ४२ वृक्षांची नोंद आहे. आपले हे सगेसोयरे वेळीच वाचवण्याची वेळ जवळ आली आहे.

स्रोत

No comments:

Post a Comment