धान्याच्या कोठ्या वा रबरी टायरचा वापर

गच्चीवर बाग फुलवण्यासाठी आपण अक्षरश मिळेल त्या साधनांचा वापर करून घेणार आहोत. तेलाचे डबे किंवा जुन्या ड्रमप्रमाणे लोखंडी संपुटे, जी पूर्वी रॉकेल वाटपासाठी शिधावाटप केंद्रांवर दिसून यायची. या संपुटासाठी उत्तम प्रकारचा जाड व गंजरोधक पत्रा वापरलेला असतो. या संपुटात भाजीपाला विशेषत वेलवर्गीय व फळझाडांची लागवड करता येते. या संपुटांना जमिनीच्या पृष्ठभागापासून थोडय़ा उंचीवर, विटांवर ठेवल्यास ती खूप दिवस टिकतात. जमिनीवरच ठेवल्यास या भांडय़ांचा तळ पाणी लागल्याने लवकर खराब होतो. अर्थात यांनाही पाण्याचा निचरा होण्यासाठी तळाजवळ भोकं पाडण्याची गरज आहेच.

या लोखंडी भांडय़ाप्रमाणे धान्य साठवण्यासाठीच्या कोठय़ाही झाडं लावायला उत्तम ठरू शकतात. यात आपण फळझाडांची लागवड करू शकतो. या कोठय़ांची खोली बऱ्यापकी असते. म्हणूनच यात रिपॉटिंग करणे तसे अवघड असते. मात्र गंजू नये म्हणून यांना आतून ऑइलपेंट देऊ नये. झाडांच्या आरोग्याला ते घातक ठरते.

याप्रमाणे रबरी टायरही झाडं उगवण्यासाठी स्वस्तातला मस्त पर्याय आहे. खासकरून उजाड माळरानावर आपल्याला फळझाडे व भाजीपाल्याची बाग फुलवायची असल्यास रबरी टायर हा सर्वोत्तम पर्याय आहे. अपेक्षित उंचीप्रमाणे दोन-तीन टायर एकमेकांवर रचावीत, त्यात मातीबरोबर पालापोचोळ्याचे पोषण भरता येतात. साधारण रिक्षा, स्कूटर, ओमनी या गाडय़ांपासून तर मोठय़ा चारचाकी गाडय़ांपर्यंतचे टाकाऊ टायर आपण बाग फुलवण्यासाठी करू शकतो.


याशिवाय दुसऱ्या प्रकारेही टायरचा वापर झाडं लावण्यासाठी करता येतो. टू व्हीलरच्या टायरचे समान तीन-चार तुकडे करावेत त्यास साखळ्या लावून ‘हँगिंग गार्डन’ साकारता येतात. हे टायर छानपणे विविध रंगवून घेता येतात. त्यावर नाजूक पानाफुलांच्या, वारली डिझाइनच्या कलाकृती साकारता येतात. टायरमध्ये फुलझाडांचे छान संगोपन होते.

विविध रंगांमुळे बागेच्या सौंदर्यात भरच पडते. निर्जीव, रिकामी भिंतही अशा टायरद्वारे सुशोभित करता येते.


टायर जाळून वायुप्रदूषणात भर टाकण्यापेक्षा त्यापासून कम्युनिटी गार्डन ही संकल्पना साकारता येते. अशा साधनांचा उपयोग पडीक जागा विकसनासाठी करता येण्यासारखा आहे. टायर हे वर्षांनुवर्षे टिकण्यासारखे असल्यामुळे यात झाडांची लागवड म्हणजे चांगली गुंतवणूक आहे, शिवाय ती कमी खर्चाची आहे.

स्रोत

No comments:

Post a Comment