गच्चीवरची बाग : ‘किचन वेस्ट’ची किमया

‘गारबेज टू गार्डन’ ही संकल्पना साकारणे तितकेसे अवघड नाही. प्रामुख्याने घरात दोन प्रकारचे किचन वेस्ट वा स्वयंपाकघरातील कचरा तयार होते- भाज्यांची हिरवी देठं, फळांची सालं, टरफलं इत्यादी. आणि खरकटे, शिजलेले पदार्थ.

हे गच्चीवर किंवा उपलब्ध जागेत सुकवून घ्यावेत. भाजीची देठं, फळांची सालं कात्रीने बारीक कापून घ्यावीत, म्हणजे त्यातील पाण्याचे काही तासांत बाष्पीभवन होते. असा वाळलेला कचरा हातात घेऊन चुरून पाहावा. पापड मोडल्यासारखा कुरुकुरु आवाज आल्यास ते उत्तम वाळले आहे असे समजावे. सुकलेला हिरवा कचरा दीर्घकाळ संग्रहित ठेवता येतो. तो कुंडीच्या वाफ्यात पाचव्या थरास देता येतो किंवा मातीच्या पृष्ठभागावरही आच्छादन म्हणून वापरता येतो. वाळलेला हिरवा कचरा हा पाणी धरून ठेवण्यास मदत करतो. ओला कचरा आहे तसा कुंडीत/ वाफ्यात टाकू नये. त्याने मुळांपाशी उष्णता तयार होते.


किचन वेस्टचा दुसरा घटक म्हणजे खरकटे किंवा शिजलेले पदार्थ. उदा. भात, पोळी,चहापत्ती, सुकी भाजी असे जिन्नस. हेदेखील सुकवून घ्यावेत. त्याचाही चुरा कुंडीच्या पाचव्या थरात वापरता येतो. त्याचाही खत म्हणून वापर करता येतो. सुकवलेल्या ‘किचन वेस्ट’मुळे सावकाश खतनिर्मिती होतो. त्यामुळे झाडे टवटवीत होतात. या कचऱ्यांत विविधता असल्यामुळे झाडांना अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो.

‘किचन वेस्ट’चा आणखी एक अविभाज्य घटक म्हणजे खरकटे पाणी. हे पाणी एका झाकणबंद कचरापेटीमध्ये जमा करावे. तीन-चार दिवस ते तसेच ठेवावे. ते आपोआप आंबायला लागते. त्यानंतर हे पाणी आपण हाताने ढवळून झाडांच्या मुळांशी टाकावे. या पाण्यात असंख्य उपयुक्त जिवाणू तयार होतात व ते झाडांच्या मुळांना पोषक द्रव्य पुरवतात. हे आंबट द्रव्य गांडुळांना खूप आवडते. त्यातील अन्नपदार्थ गांडूळ खातात व उपयुक्त माती तयार करतात. कचरापेटीची, व्यवस्था नसल्यास भात, पोळी हे वरण, ताक किंवा साध्या पाण्यात चुरून ते झाडांना लगेच देता येते. या खरकटय़ा पाण्याचा उपयोग सहसा जमिनीवरील बागेत करू नये. यातील अन्नकणांमुळे घुशी, उंदीर आकर्षति होतात व त्यांचा बागेला उपद्रव होण्याची भीती असते. हे पाणी वस्त्रगाळ करून घेतल्यास ते जमिनीवरील बागेस देता येते. हे पाणी दररोज वापरता येते, पण शक्यतो झाडांना सुरुवातील मोठा चमचाभर, कपभर, वाटीभर व नंतर मगभरून या क्रमाने द्यावे, कारण कुंडीतील मातीची ते पचवण्याची क्षमता हळूहळू वाढीस लागते. शिजलेल्या खरकटय़ा अन्नात मांसाहारी पदार्थाचे तुकडे वापरू नयेत. असे खरकटे पाणी हे कुंडीला द्रव्य स्वरूपात वरून द्यावे.

मुख्य म्हणजे देवपूजेनंतरचे कुंकवाचे पाणी झाडांना कधीच टाकू नये. कुंकू हा रासायनिक पद्धतीने तयार केलेला असल्याने त्याचा उपद्रवच होण्याची अधिक शक्यता असते.

स्रोत

No comments:

Post a Comment