पाणी जपण्याची गोष्ट

पाण्याची आवश्यकता सर्वच क्षेत्रात जाणवत असताना त्या पाण्याविषयी प्रत्येकाच्या मनात कुतुहूल असणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. तरीदेखील पाण्याविषयी शास्त्रीय माहिती समाजात अभावानेच आढळते. पाणीसाठी वेगाने नष्ट होत असताना गरज आहे ती पाणीवापराबद्दलच्या प्रशिक्षणाची!

विज्ञान म्हणजे काहीतरी कठीण किंवा किचकट असते अशी अनेकांची शाळेतच समजूत झालेली असते. त्याचे कारण त्या विषयात फारसा रस निर्माण होऊ शकला नाही हेच असते. तो रस का निर्माण झाला नाही याची कारणे विविध असू शकतात. कदाचित आकलन ठीक झाले नसेल, पुस्तके उपलब्ध नसतील किंवा वर्गात विषय नीट शिकविला जात नसेल! पण म्हणून विज्ञान कधीच समजणार नाही असे मात्र अजिबात नसते. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी वय कधीच आडवे येत नाही. इच्छाशक्ती असेल तर आपण कोणत्याही वयात शिकू शकतो.

आता साध्या पाण्याचाच विषय घ्या. पाण्याला जीवन असे म्हटले जाते. म्हणजे पाणी जीवनासाठी आवश्यक असते हा त्याचा एक अर्थ झाला. पिण्यासाठी आपल्याला पाणी लागते. शरीर शुद्धीसाठी, आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी म्हणजेच अनेक नित्योपयोगी गोष्टींसाठी पाणी लागते. औद्योगिक क्षेत्रात पाण्याची आवश्यकता असते. ऊर्जानिर्मितीसाठी, मग ती जलऊर्जा असो किंवा औष्णिक वा अणुऊर्जा असो, त्यासाठी पाणी हेच माध्यम असते.

शेती क्षेत्रात तर पाण्याची गरज फार मोठी असते. पाण्याची आवश्यकता अशी सर्वच क्षेत्रात जाणवत असताना त्या पाण्याविषयी प्रत्येकाच्या मनात कुतुहूल असणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. तरीदेखील पाण्याविषयी शास्त्रीय माहिती समाजात अभावानेच आढळते. कोलंबसने जहाजावर अनेक दिवस सतत प्रवास करीत असताना म्हटले होते की ‘सगळीकडे पाणीच पाणी आहे, पण पिण्यासाठी मात्र एकही थेंब नाही!’ पाच महासागर व अनेक सागरांमध्ये जे खारे पाणी आहे त्याने पृथ्वीवरील एकूण ७२ टक्के भूभाग व्यापलेला आहे. एकूण पाण्याच्या साठ्यापैकी फक्त दोन टक्के पाणी गोडे आहे.


निसर्गात जलचक्र सतत सुरू असते. जसजशी लोकसंख्या वाढत आहे तसतशी पाण्याची गरज देखील वाढत आहे. त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम या जलचक्रावर होत असतो. जगातील सांडपाण्याचे प्रमाण वाढत असताना भूजलाची पातळी खाली जात आहे. वाढत्या शहरीकरणामुळे व त्यासाठी आवश्यक असलेल्या वाहतूकीच्या सुविधा पुरविण्यासाठी जे रस्ते बांधले जात आहेत त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण विलक्षण वेगाने कमी होत आहे.

जो पाऊस पडतो त्याचे पाणी वाहून जाते. त्याचा उपयोग आपल्याला करता येत नाही. पदार्थाच्या अविनाशित्वाचा नियम जरी पाण्यालाही लागू असला तरी उपलब्ध असलेले गोडे पाणी कमी होत चालले आहे. पाण्याच्या चक्रात अडथळे येऊन ते आता लडखडत चालत आहे. हा प्रकार असाच चालत राहिला तर पुढचे महायुद्ध पाण्यावरून लढले जाईल यात शंकाच नाही. आपल्या देशात राज्याराज्यांच्या मध्ये पाण्यावरून भांडणे होत आहेतच व त्यांची तीव्रता देखील वाढत चालली आहे.

पंधरा-वीस वर्षांपूर्वी जर आपल्या देशात कोणी भाकित केले असते की येथे पाण्याच्या बाटल्या विकल्या जातील तर त्याला विना चौकशी येरवड्याला धाडले असते. पण आता परिस्थिती मात्र झपाट्याने बदलली आहे. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी जीवाणूमुक्त राहाते हे विसरून आपण आता अधिकाधिक महाग व ऊर्जेवर अवलंबून असलेल्या पाणी शुद्धीकरण पद्धती वापरू लागलो आहोत.

शेवग्याच्या बिया वाळवून त्याची भुकटी केली व स्वच्छ फडक्यात बांधून जर नळाला अडकवली तरी आपल्याला जीवाणूमुक्त पाणी मिळू शकते. शिवाय अशी गाळणी अनेक महिने चालू शकते. सौर ऊर्जेवर पाणी गरम करून त्यावर आधारित पाणी शुद्धीकरणाची उपकरणे आता काळाची गरज झाली आहेत. पिण्याच्या पाण्याचे नियोजन हा आपल्यासाठी खरे तर अगदी जिव्हाळ्याचा विषय असायला हवा. पण शहरांमधून पिण्याचे आदल्या दिवशी भरून ठेवलेले पाणी बिनदिक्कतपणे ओतून दिले जाते.

प्रत्येक घरात आता संडासमध्ये पाण्याच्या १० ते १५ लिटरच्या टाक्या बसविलेल्या असतात व दर दिवशी व दर माणशी किमान ४-५ वेळा खटका ओढून त्या मोकळ्या केल्या जातात. इतके पाणी दर वेळी वापरणे आवश्यकही नसते. शिवाय हे पाणी पिण्याच्या गुणवत्तेचे असते! म्हणूनच यावर सर्व सामान्यांच्या घरातूनही नियंत्रण असणे आवश्यक झाले आहे. अशा टाक्यांचे आकारमान कमी ठेवणे हा साधा उपाय मदतीला येईल. यासाठी अशा टाक्यांमध्ये एक, दोन लिटरच्या तीन पाण्याच्या बाटल्या बुडवून ठेवल्या तर दर वेळी दोन ते तीन लिटर पाण्याची बचत सहजपणे होऊ शकते.

भांड्यातील तळाशी गेलेले पाणी वर आणण्यासाठी कावळ्याने त्यात जे दगड टाकले होते ती गोष्ट आठवा! स्वयंपाक घरातील व आंघोळीचे वापरलेले पाणी संडासच्या टाकीत कसे वापरले जाईल या दृष्टीनेही प्रयत्न व्हावयास हवेत. कॉलेजातील विशेषत: विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या प्रकल्पांची मांडणी करण्याचा प्रयत्न त्यांच्या उन्हाळी कार्यक्रमात केला पाहिजे. सागरी पाण्याचे पिण्याच्या पाण्यात रूपांतर करण्याच्या योजना आता प्रत्यक्षात राबविण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. भारतासारख्या देशाला एवढा मोठा सागरी किनारा असल्यामुळे हे सहज शक्य आहे. त्यासाठी मानसिकतेत मात्र बदल होणे गरजेचे आहे.

स्रोत

No comments:

Post a Comment