रानहळदीचं रानफूल

रताच्या जीवसंपदेपैकी एक महत्त्वाची वनस्पती म्हणजे ‘हळद.’ हळद ही आपल्या देशाची सार्वभौम संपदा आहे. हजारो वर्षांपासून हळदीचे अनेक उपयोग इथे सर्वानाच माहीत आहेत. भारतात औषध म्हणून विविध प्रकारे हळदीचा उपयोग केला जातो. जखमेतील स्राव थांबवण्यासाठी पू होऊ नये म्हणून आणि खोकल्यावर दूध-हळद वापरणे हा तर जुना प्रघात आहे. तरुण मुली त्वचा गोरी करण्यासाठी तर स्वयंपाकघरात बायका पदार्थाची रुची आणि रंग वाढवण्यासाठी हळद वापरतात. देवळात आणि देव्हाऱ्यात तिची महती काय सांगावी. पण याच आपल्या हळदीचं पेटंट मात्र पहिल्यांदा दुसऱ्याची हाती पडलं.

१९९३ मध्ये अमेरिकेने या पेटंटसाठी अर्ज दाखल केला. १९९६ मध्ये हळदीच्या औषधी वापराबद्दल पेटंट दिलं गेलं. तेव्हा भारतात खूप खळबळ माजली. इथे परंपरागत ज्ञान आणि उपयोग याबद्दल लोकांच्यात माहिती असली तरी त्याचे लिखित पुरावे नाहीत. पुरेसे डॉक्युमेंटेशन नाही. ही माहिती, हे उपयोग अचूकपणे आणि स्पष्टपणे कुठेही नोंदवून ठेवलेले नाहीत. पण डॉक्टर माशेलकर यांनी पुढाकार घेऊन हळदीच्या पेटंटविरोधात दावा दाखल केला. त्यासाठी त्यांनी वेल्थ ऑफ इंडियामधील संदर्भ देऊन या पेटंटला आव्हान दिले. त्यांनी दिलेल्या ३२ पुराव्यांची दखल घेऊन, त्याची वैधता तपासून अखेरीस अमेरिकेला मिळालेले हे पेटंट रद्द करण्यात आले.

अशा या बहुगुणी आणि बहुचर्चित हळदीची एक रानबहीण म्हणजे रानहळद. ही रानहळद सध्या ‘येऊर’च्या जंगलात जागोजागी फुललेली दिसते. पाव फूट देठावरती उभ्या असणाऱ्या, वीतभर रुंदीच्या आणि हातभर लांबीच्या, कर्दळीसारख्या मोठय़ा हिरव्या पानातून उसळी मारून बाहेर आलेलं रानहळदीचं गुलाबी फूल आपलं लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही.


खरं तर ही गुलाबी फुलं नसून फुलांचे ब्रॅक्ट (फुलांच्या देठाशी असलेले लहानसे पान) आहेत. ते लांब आणि मांसल पाकळ्यांसारखे दिसतात आणि पाकळ्यांसारखेच आकर्षक असतात, म्हणूनच परागीभवन करणारे कीटक त्यांच्याकडे आकर्षित होतात. त्यातही तळाकडचे ब्रॅक्ट हिरव्या रंगाचे तर टोकाकडचे जांभळे-गुलाबी रंगाचे असतात. त्यांच्या तळाशी छोटी-छोटी खरी फुलं लपलेली असतात. या नरसाळ्यासारख्या आकाराच्या फुलाची पाकळी पिवळ्या रंगाची असते आणि कांगारूच्या पोटातून बाहेर डोकावणाऱ्या पिल्लासारखी एकटीच मान बाहेर काढून पाहात असते. या दोन सेंटिमीटरच्या पिवळ्या आणि खऱ्या फुलाला तेवढय़ाच लांबीची नळी असते आणि ती ब्रॅक्टच्या आत.

आणखीन दोन नवलाईच्या गोष्टी असतात, पण त्या सहजासहजी दिसत नाहीत. एक म्हणजे या मुलांच्या टोकाशी बदामासारख्या गुठळ्या असतात आणि दुसरी म्हणजे रानहळदीच्या पिवळ्या फुलांच्या आत गाईचं तोंड असत. त्याला मागे दोन शिंगासकट डोकंसुद्धा असत. पण ते पाहण्यासाठी जमिनीवर गुडघे टेकवून डोकं जमिनीला लावून निसर्गाला शरण जावं लागत. रानहळदीत असणाऱ्या कुक्र्युमाइन या पिवळ्या द्रव्यामुळे तिला कुरकुमा स्युडोमोंटाना हे शास्त्रीय नाव मिळालं आहे.

अशा या औषधी वनस्पतीला ‘गौरीची फुलं’ असंही म्हणतात. महादेवाला ही फुलं वाहण्याची प्रथा वर्षांनुवर्षे चालत आली आहे. गुलाबी रंगाच्या आकर्षक ब्रॅक्टमुळे भक्त अख्ख्या हर्बला फुलं समजतात आणि मुळापासून उमटतात. अशी ही भक्ती देवाला तरी आवडेल का? की जी पर्यावरणाचा आणि औषधी वनस्पतींचा नाश करेल. उलट त्या समजावून घेऊन त्यांचा अभ्यास करणं हीच खरी भक्ती.

स्रोत

No comments:

Post a Comment