आठवणीतला आसमंत

अजूनही सागरगोटे हा शब्द प्रचलित आहे पण तो प्रकारच माहीत नाही अशी अस्वस्था बघायला मिळते. ‘बिट्टी’च्या झाडाच्या बिया म्हणजेच सागरगोटे’. बिट्टीचं झाड म्हणजेच आपल्या पांढऱ्या कण्हेरीच्या ऐपोसायनेसी कुटुंबातलं सदस्य असलेलं ‘यलो ओलीएॅडर’ असं इंग्रजी नाव असलेलं झाड आहे. गेल्या काही पिढय़ांच्या बालपणाचा अविभाज्य भाग असलेलं हे झाड भारतातलं नाही बरं का! दक्षिण अमेरिका आणि वेस्ट इंडिज या झाडाचं माहेर आहे. इंग्लंडमध्ये ‘एक्साइल ट्री’ किंवा ‘ट्रम्टपेट फ्लॉवर ट्री’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या झाडाचं वनस्पतिशास्त्रातलं नाव थेवेशिया पेरुव्हियाना. या नावात पण गंमत आहे. फ्रान्समध्ये आन्द्रे थेवेट नावाचे एक धर्मगुरू होते. या धर्मगुरूंच्या नावावरून थेवेशिया या झाडाचं हे जातिनाम तयार झालंय, नि पेरू देशात हे झाड पहिल्यांदा शोधलं गेलं म्हणून पेरुव्हियाना हे नाव. आहे ना मनोरंजक?

तसं पहिलं तर बिट्टीचं झाडाचं वर्णन करायची खूप गरज नाहीए. आपण पाहत असतोच की या झाडाला वर्षभर फुलं येतात नि पूर्ण वर्ष याची पानं हिरवीगार चकचकीत दिसतात. फनेल म्हणजे मराठीत नरसाळ्यासारखी दिसणारी पाच पाकळ्यांची मोठी पिवळी फुलं घोसाघोसाने येतात. आपल्याला जास्तीत जास्त या पिवळ्या रंगाचीच फुलं माहीत आहेत पण या झाडाला केशरी, पांढरी फुलंसुद्धा येतात. बिट्टीच्या फुलांना एक मंद कडसर वास असतो. याची फळं मजेशीर आकाराची असतात. कच्ची असताना ती हिरवी असतात आणि त्यात भरपूर पांढरा चीक असतो. पोटाकडे ढबूरकी नि टोकाकडे निमुळती झालेली ही फळं पोटात दोन-चार बिया घेऊन मोठी होतात. या बिया सुकल्या की काळ्या होतात. पूर्वीच्या काळी, मुली या बिया घेऊन सागरगोटे म्हणून खेळ खेळायच्या. या बियांपासून रुजवून झाडं बनवली जातात. एक तर हे झाड पटकन वाढतं, दोन-तीन मीटपर्यंत उंच होत नि खूप कचरासुद्धा करत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी याचा अ‍ॅव्हेन्यू ट्री म्हणून उपयोग होतो.


बिट्टीचं झाड भारतीय नसल्याने, आयुर्वेदाला याचा उपयोग ज्ञात नाही. हे झाड संपूर्ण विषारी समजलं जातं. याची पानं, फुलं, फळं, त्याचा चीक हे सगळंच विषारी असतं. बिट्टीचा चीक डोळ्यांत गेल्यास दृष्टिदोष होऊ शकतो. हे झाडं वाळवंट सोडून कुठेही मस्त जगतं. त्यामुळे आपल्या देशात बहुतेक सर्वत्र बिट्टी सुखाने नांदतेय. गंमत म्हणजे, या झाडावर पक्षी घरं करत नाहीत की किडेही राहत नाही. नवलच! अर्थात यामुळे बिट्टीचं झाड वाईट आहे असं अजिबात नाही. रखरखत्या सिमेंट क्राँक्रीटच्या जंगलात बिट्टीच्या झाडामुळे लहान सावलीची जागा बनते नि डोळ्याला मस्त वाटणारा हिरवा पिवळा रंग सतत दिसत राहतो हे काय कमी आहे? निसर्गात एक साधासा नियम असतो. ज्या फुलांना गोड वास नसतो, त्यांना आकर्षक रंग असतो. या रंगाने इतरांचं लक्ष फुलं स्वत:कडे खेचून घेतात.

आसमंतात सध्या भरपूर घडामोडी घडताहेत. बहुतांश झाडांनी पानं-फुलं-फळं खेळ खेळायला सुरुवात केलीय. वसंत अवतरल्याने निसर्गातला बदल लक्षणीय जाणवतोय. बहुतांश झाडांवर कुठे कोवळी पालवी तर कुठे फुलांची नक्षी ठळकपणे नजरेत भरतेय. नवलाईची पालवी मिरवणाऱ्या बहुतांश नवथर झाडांच्या गर्दीत काही झाडं आपल्या जुन्या पानांचा आब राखत असताना दिसतात. शहर असो की गाव, आसमंतात मोठय़ा प्रमाणात काही झाडं आपलं अस्तित्व सध्या जाणवून देताहेत. बाभूळ आणि सुबाभुळीच्या मायमोसेसी कुटुंबातला एक सदस्य संध्याकाळ झाली की मंदधुंद वासाने वातावरण भारून टाकतोय. मनभावन सुगंध जाणवत तर असतो, पण कळत नाही की नक्की येतोय कुठुन?

शोधा म्हणजे सापडेल नियमाचं पालन केल्यावर या मंद सुगंधाचं उगम कळेल. सुगंध आणि याचाच? हे न पटणारं समीकरण निसर्ग चुटकीत सोडवतो. आपल्या देशाच्या पंचमहाभूतात सहिष्णुता ठासून भरलीय. म्हणूनच दूरदूरच्या खंडातून आलेल्या झाडांना आपला आसमंत सहजपणे स्वीकारतो नि सामावून घेतो.


विलायती चिंच म्हणजेच मनिला टॅमरिन्ड हे त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. मध्य अमेरिकेतून वेस्ट इंडीजमाग्रे सर्व उष्णकटिबंधीय देशांमध्ये स्थिरावलेला हा वृक्ष भारतीय नाही हे मन मानतच नाही. दोनेक शतकांपूर्वी भारतात दक्षिणेकडे सर्वप्रथम आणला गेलेला हा वृक्ष बघता बघता संपूर्ण देशभर स्थायिक झाला. विलायती चिंचेच्या वृक्षाला सदाहरित सदरात गणलं जातं. याची पानं विरळ असतात, पण कायम हिरवी असतात. मध्यम बांध्याचं हे झाड साधारण १५मीटर्सची उंची सहज गाठतं. अंगावर असलेल्या बारीक काटय़ांमुळे याच्या फळांना नसíगक संरक्षणच मिळतं जणू. वेडय़ावाकडय़ा पसरलेल्या फांद्या, अंगावर असलेले काटे यांमुळे, शेतबांध्यांवर कुंपण वृक्ष म्हणून याची लागवड केली जाते.

विलायती चिंच म्हटली की बहुतेकांचे डोळे लकाकतात. आठवण येते ती वळणावळणाच्या दुधाळ चवीच्या आकडय़ाची. शाळेबाहेरच्या बोरं-चिंचा-पेरू विकणाऱ्यांकडे वाटय़ात हमखास मिळणाऱ्या या चिंचा चाखल्या नसतील अशी व्यक्ती विरळाच. या चिंचांची चव, चिंच या नावाला बट्टय़ा लावणारी गोड, तुरट आणि दुधाळ चवीची असते. वसंताच्या आगमनाबरोबरच सूर्यास्तानंतर फुलणारी फुलं झाडावर दिसायला लागली की खारी, माकडं आणि पक्षी सुखावतात. कारण लवकरच आकडय़ासारख्या शेंगा येणार हे अनुभवाने त्यांना माहीत असतं. आणि या शेंगा म्हणजे त्यांच्यासाठी मेवाच असतो. कच्च्या असताना या शेंगांचे आकडे हिरवे असतात. पिकल्यावर या आकडय़ांचा रंग बदलून लालसर विटकरी होतो. दुधाळ गराच्या आत काळ्या रंगाच्या सहा सात बिया असतात. या झाडाचे आयुर्वेदिक उपयोग ज्ञात नसले तरीही इतर उपयोग भरपूर आहे. याचं मजबूत लाकूड शेतीची अवजारं, बलगाडय़ा बनवायला वापरात येतं. उष्मांक उत्तम असल्याने इंधन म्हणूनही हे लाकूड उत्तम समजलं जातं. याच जोडीला, याची पानं गुरांसाठी वर्धक खाद्य समजलं जातं. हिंदीमध्ये या झाडाला इतकं सुंदर नाव आहे की बास रे बस्स! ‘जंगल जलेबी’ या नावातच किती गोडवा आहे नं? पण वनस्पतिशास्त्रीय भाषेत मात्र हा गोडवा ‘पिथेकोलोबियम डल्स’ या नावात गायब होतो. ‘पिथेकोलोबियम’ म्हणजे माकडाच्या कानासारख्या दिसणाऱ्या आणि ‘डल्स’ म्हणजे गोड. ‘माकडाच्या कानासारख्या दिसणाऱ्या गोड’ या अर्थापेक्षा ते जंगल जलेबीच गोड वाटतं ना?

मागच्या गप्पांमध्ये मी माझ्या जंगलवारीचा उल्लेख केला होता. उन्हाळा सुरू झाला की पाण्याची कमतरता जंगलात जाणवायला लागते. मर्यादित ठिकाणी एकवटलेल्या पाणवठय़ांवर प्राण्यांचा ठरावीक वेळी असलेला राबता बघणं म्हणजे निव्वळ थरारकच असतं. मार्च महिन्याची सुरुवात झाली की हिमालयाव्यतिरिक्त देशाच्या बहुतेक सर्व जंगलांना उन्हाळा जाणवायला लागतो. जणू काही प्राणी निरीक्षणाचा योग्य काळ सुरू झालाय असं समजायला अजिबात हरकत नाही. अर्थात या सीझनची सुरुवात मी राधानगरी अभयारण्यात जाऊन केली. कोल्हापूरजवळील राधानगरी अभयारण्य तिथल्या गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. ‘द गौर’ किंवा ‘इंडियन बायसन’ म्हणून ओळखला जाणारा गवा म्हटलं की आपल्या नजरेसमोर रेडय़ासदृश प्राणी येतो आणि जंगलातल्या खूरवाल्या प्राण्यांमध्ये सर्वात ताकदवान नि वजनदार म्हणून गणल्या जाणाऱ्या या प्राण्याबद्दल आपण बऱ्यापकी अनभिज्ञ असतो ही जाणीवसुद्धा होते.

साधारणपणे पूर्ण वाढीचा म्हणजेच ‘माजलेला’ नर साडेसहा फुटापर्यंत वाढतो नि वजनाचा विचार करायचा तर एक टनापर्यंत असलेला हा ‘वजनी’ नग १०० टक्के शाकाहारी आहे हे सांगूनही अनेकांना पटत नाही. गंमत म्हणजे गवा हा आपल्या गाई, म्हशी, शेळ्या, मेंढय़ांच्या बोव्हिडी कुटुंबाचा सदस्य आहे. या गटात बहुतेक खूरवाल्या प्राण्यांना वरच्या जबडय़ात म्हणजेच पटाशीचे दात नसतात आणि मस्त शिंगे असतात. गव्याच्या शिंगांचा विचार करायचा झाला तर, नराला साधारण ४०-४५ इंचांपर्यंत अर्धचंद्राकृती शिंग असतात. मादीची शिंग त्यापेक्षा थोडी कमी लांबीची असतात. ही शिंग अर्थात कॅल्शियमची बनलेली असतात ज्यांचा रंग बहुतांश पिवळट हिरवट असतो नि टोकाला काळा असतो.


गवा हा शब्द जरी उच्चारला तर आपल्या नजरेसमोर त्याच बलदंड पीळदार शरीर येतं. प्रचंड पीळदार वाटणारा हा प्राणी तसा लाजाळू असतो. जन्मत: मातकट तपकिरी रंगाचे गवे वाढत्या वयाबरोबर तुकतुकीत काळे होत जातात. शरीराच्या मानाने यांच डोकं लहानच म्हणावं असं असतं. यांच्या डोक्यावर, म्हणजेच कपाळावर लहानसा पसरट खळगा असतो, ज्यापासून एक उभार सुरू होऊन मानेपर्यंत गेलेला असतो. गव्याचे कान हे मोठे असतात पण बहुतेक सर्व गाई गुरांप्रमाणे फार तीक्ष्ण नसतात. याची दृष्टीही तीव्र नसते. मात्र या कमतरतेला तीव्र गंधज्ञान भरून काढतं. गव्यांची घ्राणेंद्रिये फारच तीक्ष्ण असतात व वाऱ्याच्या लहानसहान झुळुकांबरोबर येणारा प्रत्येक गंध ते हुंगतात. या दांडगोबाचे पाय त्याच्या शरीराच्या मानाने बारीक वाटले तरी दणकट असतात. त्याच्या वजनी शरीराचा भार पेलायची भक्कम कामगिरी त्यांच्यावर सोपवलेली असते. या पायांचं वैशिष्टय़ म्हणजे हे गुडघ्यापर्यंत पांढरट रंगाचे असतात. जणू काही गव्याने पांढऱ्या रंगाचे मोजे घातले आहेत असेच. त्याच्या लहानसर शेपटीचा बहुतांश उपयोग गवत चरताना शरीरावर बसणाऱ्या किडय़ांना हाकलण्यासाठीच केला जातो.

१०० टक्के शाकाहारी असलेले गवे मुख्यत्वे गवत, झाडांची पाने, कोवळे कोंब आणि रानफळे खाण्यासाठी दिवस रात्र जंगलात फिरतात. पहाटे आणि संध्याकाळी गवे चरायला बाहेर पडतात. पण मनुष्यवस्तीजवळच्या जंगलात मात्र गवे रात्री बाहेर पडतात. साधारणत: गवे दहा-बाराच्या कळपात दिसून येतात. हा कळप आकाराने मोठय़ा असलेल्या नराच्या आधिपत्याखाली असतो. ज्यात काही माद्या व पिल्ले असतात. मोठे झालेले नर आणि वयोवृद्ध नर एकेकटे फिरतात. प्रत्येक कळपाची आणि एकांडय़ा नराची स्वत: ची सत्तर-पंच्याहत्तरी किलोमीटर्स एवढी हद्द असते, ज्यात दुसरे गवे घुसत नाहीत. साधारण डिसेंबर ते जूनपर्यंत यांचा प्रजननाचा काळ समजला जातो. सर्वात ताकदवर, अर्थात आकाराने मोठा नर सर्वप्रथम कळपातील माद्यांबरोबर समागम करण्याचा अधिकार मिळवतो. समागमानंतर साधारण २७०ते २८० दिवसांच्या गर्भारपणानंतर मादी एकाच पिल्लाला जन्म देते. जन्मत: साधारण २५ किलो असलेल्या या पिल्लाची पुढील नऊ महिने आईकडून काळजी घेतली जाते. वयाच्या दोन ते तीन वर्षांत हे गवे प्रजननासाठी तयार होतात. मात्र माद्या दोन बाळंतपणांमध्ये साधारण दीड वर्षांचा खंड ठेवतात.

लाजाळू सदरात मोडत असले तरीही गवे चक्रमच म्हणावे असे वागतात. निसर्गत: २५-३० वर्षांचं आयुष्य जगणाऱ्या गव्यांना त्यांच्या आकार आणि ताकदीमुळे जंगलात शत्रू कमीच असतात. गव्याचे मुख्य शत्रू म्हणून वाघ, सुसरी आणि मनुष्यप्राण्याकडे बोट दाखवता येऊ शकते. जाताजाता सांगायची गोष्ट म्हणजे, हे गवे प्रजननाच्या काळात तोंडाने शीळ घातल्यासारखा मजेशीर आवाज काढतात. हा आवाज बऱ्याच दूपर्यंत ऐकायला जातो. या आवाजाव्यतिरिक्त गवे तोंडाने डुरकल्यासारखा काढतात जो कळपासाठी धोक्याचा किंवा एकत्र येण्याचा इशारा असतो.

गवे मुख्यत: डोंगराळ भागातील जंगले, गवताळ भागात आणि टेकडय़ांमध्ये आढळतात. दिवसेंदिवस कमी होत जाणाऱ्या निवासाच्या सुरक्षित जागा आणि अन्नासाठी करावी लागणारी भटकंती यामुळे गव्यांना धोका निर्माण होतोय. आपल्या देशात महाराष्ट्र, केरळ, कर्नाटकसारख्या राज्यांमध्ये यांच्यासाठी खास राखीव अभयारण्ये बनवली गेली आहेत. सुकत चाललेल्या उन्हाळी जंगलात, माळरानावर बसलेले हे गवे हलायला लागतात तेव्हा असं वाटतं की जणू काही माळरानावरचे काळेकभिन्न खडकच हलताहेत. उन्हाळ्यात यातल्या कुठल्या तरी एका जंगलात जाऊन हे हलते खडक पाहून यायला काय हरकत आहे?

स्रोत

2 comments:

  1. सागरगोटे ही वेगळी वनस्पती आहे.त्याचे कुबेरा क्ष असे नाव आहे लता करंज असेही म्हणतात.शिकेकाईच्या वेलीसारखी काटेरी वेल असते.वरची माहिती बरोबर आहे.पण कर्णाची बी म्हणजे सागरगोटे नव्हे.

    ReplyDelete