घरी तयार केलेल्या खताविषयी प्रश्नोत्तरे

काल गच्चीवरील मातीविरहित बाग ह्या फेसबुकवरील समूहामध्ये मी घरी तयार केलेल्या खताविषयीची पोस्ट शेअर केली होती, त्यावर अनेक सदस्यांनी पसंतीची दाद दिली व प्रश्नही विचारले आहेत. ते प्रश्न वाचल्यावर माझ्याही मनात काही प्रश्न निर्माण झाले. त्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देता यावीत म्हणून ही स्वतंत्र पोस्ट लिहीत आहे.

घरी तयार केलेलं खत आणि आंब्याच्या रूजवलेल्या कोयी

प्रथमच घरच्या घरी खत तयार केलं. इडलीपात्राची रचना असते तसे प्लास्टिकचे आयते डबे विकत मिळतात. तसे दोन डबे आणले आहेत. ह्या डब्यांचा आकार आपल्या नेहमीच्या कचऱ्याच्या बालदीसारखाच असतो. तळापासून दोन इंच अंतर ठेवून जाळी लावलेली असते. डबा कसा वापरावा हे मार्गदर्शन करणारी पुस्तिक सोबत मिळते.

आपला नेहमीचा हिरवा कचरा, अंड्यांची टरफलं, चहाचा गाळ ह्यात टाकत राहायचा. ओलसर कचरा चालतो पण अगदी पाणी गळतंय असं काही टाकू नये. ओलसर कचऱ्यातलं पाणी खाली जाळीतून झिरपत तळाशी गोळा होतं. डब्याला एक नळ बसवलेला आहे, पाण्याच्या टाकीला असतो तसाच! त्यातून हे पाणी भांड्यात काढून घेता येतं. हे पाणी झाडांसाठी उत्तम!