घरी तयार केलेल्या खताविषयी प्रश्नोत्तरे

काल गच्चीवरील मातीविरहित बाग ह्या फेसबुकवरील समूहामध्ये मी घरी तयार केलेल्या खताविषयीची पोस्ट शेअर केली होती, त्यावर अनेक सदस्यांनी पसंतीची दाद दिली व प्रश्नही विचारले आहेत. ते प्रश्न वाचल्यावर माझ्याही मनात काही प्रश्न निर्माण झाले. त्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देता यावीत म्हणून ही स्वतंत्र पोस्ट लिहीत आहे.

खतासाठी डबे कुठून घेतले?
ट्रस्टबास्केट डॉट कॉम नावाची एक वेबसाईट आहे, तिथे हे डबे विकत मिळतात. आपल्या कुटुंबाच्या संख्येप्रमाणे १, २ किंवा ३ असे डब्यांचे संच तयार केलेले आहेत. त्यातील हवा तो निवडू शकतो. सोबत खत निर्मितीसाठी आवश्यक ते साहित्यही दिलं जातं. डब्यांच्या किंमतीसकट संपूर्ण माहिती त्या वेबसाईटवर मिळू शकेल. मला दोन डब्यांचा संच पुरेसा होतो म्हणून मी तोच विकत घेतला.

हे डबे कसे वापरायचे?
डबा कसा वापरावा ह्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका सोबत मिळते. ती पुस्तिका मी इथेही डाऊनलोड करण्यासाठी ठेवली आहे. कृपया इथे क्लिक करा.

यासोबत खाली दिलेले दोन व्हिडिओ मार्गदर्शक ठरू शकतील.ह्या डब्यात कोणकोणता कचरा टाकता येईल?
कोणताही हिरवा कचरा टाकता येईल. ह्यासोबत निर्माल्य, चहाचा गाळ, हाडे, अंड्याची टरफलं टाकता येतात. अंड्यांची टरफलं चुरून टाकावीत. नारळाची किशी चालेल पण करवंट्या टाकू नयेत. तसंच ताक, आमटी, आंबलेलं वरण ह्यासारखे पूर्ण द्रवरूपी पदार्थ टाकू नयेत. कारण ते थेट जाळीतून खालीच जाणार. मग त्यांचा उपयोग काय!

मी ड्ब्यामध्ये हिरवा कचरा, अंड्यांची टरफलं व चहाचा गाळ टाकला होता. कलिंगडाची, केळ्याची सालं हा कचरा बारीक तुकडे करून टाकावा असं पुस्तिकेत लिहिलेलं आहे पण मी तुकडे न करताच साली टाकल्या होत्या.त्यांचंही व्यवस्थित विघटन झालं. अंड्यांची टरफल मात्र वेळ घेतात म्हणून चुरा करणंच योग्य!

ह्या कचऱ्याला वास येतो का?
अर्थातच येतो! शेवटी ही आंबवण्याची क्रिया आहे. इडलीचं एक दिवसाचं पीठ सुद्धा आंबलेलं असतं म्हणून त्याला वास येतो. आपण तर कचरा आंबवतो, मग त्याला वास हा येणारच (ही एकमेव गोष्ट ट्रस्टबास्केट साईटवाले नीट सांगत नाहीत). फक्त डब्याला झाकण लावलेलं असल्याने तो वास घरभर पसरत नाही. (डब्यात कचऱ्याच्या थरावर पांढरी कापसासारखी बुरशी दिसणं हे चांगलं लक्षण आहे. डबा वारंवार न उघडता फक्त कचरा टाकण्यापुरताच उघडल्यास कचरा लवकर आंबतो). डबा खतासाठी रिकामा करतानाही वास येतोच. मात्र १५ दिवसांनी खत तयार झालं कि त्याला अजिबात वास येत नाही.

असा डबा विकत न घेता घरच्याघरी तयार तयार करायचा झाला तर त्यासाठी प्रक्रिया काय असेल?
वर दिलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचा वापर करून साध्या कचऱ्याच्या डब्याचाही उपयोग खताच्या डब्यासारखा करता येऊ शकतो.
ह्या डब्याची रचना इडलीपात्र आणि पाण्याचा माठ/टाकी ह्या दोन्हींचं मिश्रण आहे. पाण्याच्या माठाला लावून मिळतो तसा नळ डब्याला तळाशीच लावून घ्यायचा. माठ, हंडा किंवा कळशीखाली जसा स्टेनलेस स्टीलचा गाडा ठेवतो तसा गाडा डब्याच्या आत ठेवून त्यावर स्टिलची चाळण डब्याच्या आत लागून बसेल अशी ठेवायची. जिथे गाडा ठेवला आहे तिथे अंदाजे २० ग्रॅम गूळ ठेवायचा. मग चाळण ठेवायची.

आधी टिश्श्यू पेपर किंवा वर्तमानपत्राच्या कागदाने चाळण पूर्ण झाकायची. मग रोजचा कचरा ह्या चाळणीवर टाकायचा म्हणजे पाणी असेल तर ते तळाशी जमा होत राहातं आणि गुळामुळे कचरा आंबण्याची क्रिया जलद होते. डब्याला झाकण असणं आवश्यक आहे. त्यामुळे घरात दुर्गंधी येत नाही व कचऱ्यावर माश्या बसत नाहीत.

डब्यात दोन इंच कचरा गोळा झाला कि त्यावर वाळलेला पालापाचोळा टाकून झाकता येतो. मग पुढचा कचऱ्याचा थर बसला कि हीच कृती करायची. अशाप्रकारे डबा चाळणीच्या वर तीन चतुर्थांश भरला कि तो तसाच आठवडाभर बंद राहू द्यायचा. ह्या काळात दुसरा डबा लावायचा. जो डबा आठवडाभर बंद ठेवला आहे, त्यात खाली कचऱ्यातलं पाणी, बाष्प गोळा होत राहातं. ते नळाद्वारे एका भांड्यात घेऊन त्यात आणखी तीन भाग पाणी मिसळून ते पाणी झाडांना घालावं. जर झाडांना घालायचं नसेल तर बाथरूम, शौचालय स्वच्छ करताना आधी ओतून टाकावं.

खताच्या शेवटच्या प्रक्रियेसाठी प्लास्टिकची टोपली वापरावी. ही धुवून ठेवायला सुटसुटीत पडते. प्लास्टिकच्या टोपलीत आधी कोरड्या मातीचा थर मग आंबवलेल्या खताचा थर असे एकामागून एक, सर्वात वर मातीचा थर येईल असे थर लावून घ्यावेत. मग ही टोपली वर्तमानपत्राच्या कागदाचं झाकण लावून एका कोपऱ्यात पंधरा दिवस राहू द्यावी. आजूबाजूला माश्या न फिरकतील हे पहावं.

थर लावायला फार माती लागत नाही. माझ्या दोन्ही डब्यांमधील कचऱ्याला मिळून फक्त एक किलो माती वापरावी लागली. तयार खत एक किलो मातीच्या किमान तिप्पट तरी आहेच.

ह्या खताचे गांडूळखतामध्ये रूपांतर करता येईल का?
होय. मात्र ह्यात गांडूळ सोडण्यापूर्वी किंवा आयतं वर्मिकल्चर मिसळण्यापूर्वी हे खत निदान चार-पाच दिवस उघड्यावर राहू द्यावं व दिवसातून दोन वेळा तरी ढवळून वरखाली करावं म्हणजे खतामध्ये असलेले विषारी वायू मोकळी हवा मिळाल्याने नाहीसे होतील. अन्यथा विषारी वायूंमुळे गांडूळ मरू शकतील.

काही महत्त्वाचे:
घरच्याघरी खत तयार केलेल्या अनेक पोस्ट्स मी पाहिल्या आहेत. प्रत्येक पोस्टमध्ये मला कोरडं खत तयार झालेलं दिसलं पण मी तयार केलेलं खत कोरडं नसून ते किंचीत दमट आहे.

ह्या खतावरही माश्या बसतात म्हणून मच्छरदाणीसारखी एक निळ्या रंगाची जाळी बाजारात मिळते, ती मी प्लास्टिकच्या टोपलीवर झाकणासारखी लावली आहे. ह्यामुळे माश्या खतावर बसून अंडी घालू शकत नाहीत.

ह्या कामासाठी मी जी माती वापरली ती स्थानिक नर्सरीमधून न आणता नर्सरी लाईव्ह ह्या वेबसाईटवरून मागवली होती. ह्या साईटचे लोक १-१ किलो मातीचे स्वतंत्र पुडे देतात. शिवाय ह्यात मोठमोठाले दगड टाकून उगाच वजन वाढवलेलं नसतं. त्यामुळे वापरायला सुटसुटीत पडतं आणि मोजलेल्या पैशांचंही चीज होतं.

आणखी काही नवीन प्रश्न आले तर त्यांचीही उत्तरे व मला काही नवीन आठवलं तर ती माहिती इथेच अद्ययावत करत जाईन.

टीप:
वरील लेखामध्ये दिलेल्या कुठल्याही वेबसाईटचं मी प्रतिनिधीत्व करत नाही अथवा जाहिरातही करत नाही. हा संपूर्ण लेख स्वानुभवावर आधारीत असल्याने आवश्यक तिथे संदर्भ म्हणून साईट्सची माहिती दिलेली आहे.

हा लेख Maha MTB येथे पुन:प्रकाशित करण्यात आला आहे.

माझा ब्लॉग व इतर साईट्स पाहण्यासाठी कृपया ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

- Kanchan Karai

No comments:

Post a Comment