‘ऑरगॅनिक’ रानभाज्या

पावसाच्या एक-दोन जोरदार सरी पडून गेल्या की गावागावांमधले रस्त्याबाजूचे भाग, नदीकाठ, डोंगरउतार हिरवेगार होतात. ही हिरवाई शिवारा-खाचरांमध्येही पेरण्यासाठी सगळे हात कामाला लागतात. शेतीच्या मशागतीच्या कामांच्या या लगबगीच्या दरम्यानच, कोणतीही मशागत-मेहनत न करता आपोआप उगवलेला हिरवा रानमेवाही असतो. टाकळा, फोडशी, शेवळं, करटुली, कुरडू, भारंग, नालेभाजी, रानातलं अळू, गावठी सुरण, वेगवेगळे कंद आदी विविध प्रकारच्या भाज्या पावसाबरोबर जमिनीतून उगवून येतात आणि स्थानिक गावकऱ्यांच्या, आणि अपवादाने का होईना पण मुंबईकरांच्याही ताटात दिसू लागतात.